Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बरडच्या शेतकऱ्याची आत्महत्या
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:03 AM (IST)
Tags: regional
राजुरी, दि. 10 : थकीत कर्ज परतफेडीच्या धास्तीने शिवाजी महादेव काशीद (वय 55, रा. बरड, ता. फलटण) या अल्पभूधारक शेतकरी व व्यावसायिकाने मंगळवारी रात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची नोंद बरड पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे.
याबाबत पोलीस यंत्रणा आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी काशीद यांनी घरगुती व व्यावसायिक कारणासाठी भैरवनाथ पतसंस्थेतून मार्च 2005 मध्ये 15 टक्के व्याजदराने 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांनी आपले राहते घर व अत्यल्प क्षेत्र असलेली शेतजमीन तारण ठेवली होती. या कर्जापैकी ऑगस्ट 2009 मध्ये 500 आणि फेब्रुवारी 2010 मध्ये 5 हजार रुपयांचा भरणा त्यांनी केला. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी पतसंस्थेने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण यांच्याकडे रितसर अर्ज केल्यानंतर त्यांनी दिलेल्या निवाड्यानुसार 3 लाख 92 हजार 79 रुपये व त्यावरील 1/7/2009 पासूनचे व्याज अशा वसुलीस मान्यता दिली. त्यानुसार पतसंस्थेने शिवाजी काशीद यांच्याकडे कर्जवसुलीसाठी प्रयत्न केले. या कर्जाला तारण असलेल्या मालमत्तेची जप्ती का करु नये,  अशी विचारणा करणारी नोटीसही पाठविली असल्याचे समजते.
शिवाजी काशीद यांनी या कर्जातून मिठाई व दुग्ध व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये त्यांना यश न आल्याने थकीत कर्जाची परतफेड ते करु शकले नाहीत. परतफेडीच्या विवंचनेत असलेल्या काशीद यांनी मंगळवारी रात्री आपल्या कुटुंबियांसमवेत जेवण केले व त्यानंतर त्यांच्यासह सर्व कुटुंबीय झोपी गेले. दरम्यान, रात्री  त्यांनी घरातच गळफास घेवून आत्महत्या केली असावी असा संशय पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई काशीद यांनी व्यक्त केला आहे. तथापि निश्चित माहिती त्या देवू शकल्या नाहीत.
काशीद यांच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी सापडली असून त्यावरुन कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. तथापि प्रत्यक्ष चिठ्ठी वा त्यावरील मजकूर पाहण्यास मिळू शकला नाही. काशीद यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी असून दोन्ही  मुले परगावी स्वत:चा व्यवसाय करत असल्याचे समजते. काशीद यांच्या निधनाने बरड व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बरड पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमोडे तपास करीत आहेत.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: