|
|
|
लेक वाचवा अभियानात महिलांनी सहभागी व्हावे : सौ. ज्योती जाधव
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:11 AM (IST)
महाबळेश्वर, दि. 10 : नैसर्गिक समतोल टिकविण्यासाठी स्त्री-पुरुष हे दोन घटक महत्वाचे आहेत. मात्र मुलीची जन्माला येण्यापूर्वीच हत्त्या केली जाते. दिवसें दिवस हे प्रमाण वाढत असून ती एक गंभीर समस्या आहे. याबाबत समाजात जागृती होणे गरजेचे आहे. या उद्देशाने सातारा जिल्हा परिषदेतर्फे लेक वाचवा अभियान राबविण्यात येत असून त्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होवून समाज प्रबोधनाचे काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. ज्योती जाधव यांनी केले. जागतिक महिलादिनानिमित्त महाबळेश्वर तालुका विधी सेवा समिती व महाबळेश्वर तालुका वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने येथील पालिका सभागृहात घेण्यात आलेल्या महिला मेळावा व विधी साक्षरता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी महाबळेश्वरचे न्यायाधिश दिलीप कोलते, महाबळेश्वर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. विजय दस्तुरे, उपाध्यक्ष ऍड. मल्हारी होळकर, गटविकास अधिकारी जी. व्ही. बैरागी, पंचायत समितीच्या उपसभापती सौ. मनीषा आंब्राळे उपस्थित होत्या. न्या. कोलते म्हणाले, पूर्वी चूल आणि मुल एवढेच सांभाळणाऱ्या स्त्रीने आज शिक्षणाच्या जोरावर अभ्यासपूर्वक प्रगती केली आहे. मात्र तरीही समाजाला हुंड्यासारख्या रोगाने ग्रासले आहे. स्त्रीची जन्मा-पूर्वीच हत्त्या केली जात आहे. स्त्रीभ्रूण हत्त्या वाढत आहे. मात्र या अनिष्ट चालीच्या विरोधात स्त्री संरक्षणार्थ अनेक कायदे आहेत. त्यांची माहिती महिलांनी घ्यायला हवी. घरातील पहिली संस्कार करणारी व्यक्ती म्हणजे आई असते. आई ही मनुष्याची पहिली गुरु आहे. महिलांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन झाले. ऍड. दस्तुरे यांनी महिला मेळाव्यामागचा उद्देश विषद केला. ऍड. वैशाली लोखंडे यांनी घरगुती हिंसाचाराचा कायदा, ऍड. राधा मुक्कावर, ऍड. मल्हारराव होळकर यांनी हिंदू वारसा कायद्याबद्दल माहिती दिली. ज्येष्ठ महिला व महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. लीलाताई शिंदे, प्रसिध्द साहित्यिक नीता भिसे यांचे भाषण झाले. ऍड. संजय जंगम यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. अश्पाक वारुणकर व ऍड. प्रभाकर हिरवे यांनी आभार मानले. कार्यक्रमास तालुक्यातील सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधी, नगरसेविका, महिला मंडळाच्या प्रतिनिधी, सदस्या, विविध बचतगटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.
फोटो गॅलरी
|