Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेतकरी प्रशिक्षण व वंध्यत्व निवारण शिबिराचा लाभ घ्यावा : ढेकळे
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:24 AM (IST)
Tags: regional
फलटण, दि. 10 : शेतकरी प्रशिक्षण आणि वंध्यत्व निवारण शिबिरासाठी तालुक्यातील एका गावाची निवड करताना या परिसरात असलेली जनावरांची मोठी संख्या विचारात घेवून तरडफ गावाची निवड करण्यात आली आहे. तरडफ आणि परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती रामभाऊ ढेकळे यांनी केले.
राज्य शासनाचे पशुसंवर्धन खाते, सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीचा पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला यांच्या संयुक्त सहभागाने तरडफ, ता. फलटण येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षण व वंध्यत्व निवारण शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसभापती सौ. विमलताई साळुंखे (पाटील) होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य पोपटराव काकडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर कोळी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.रवींद्र कांबळे, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रावसाहेब पताळे, गोविंद मिल्क ऍण्ड मिल्क प्रॉडक्टचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. गायकवाड, पशुधन विकास अधिकारी डॉ. देवेंद्र जाधव, सधन फार्माचे डॉ. देशमुख, डॉ. रवींद्र माळी, सरपंच रवींद्र पिसाळ (देशमुख), सोसायटीचे चेअरमन सोमनाथ गोडसे यांच्यासह परिसरातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.  अवेळी पाऊस, निसर्गातील बदल यामुळे शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून स्वीकारलेल्या दुग्ध व्यवसायाची  संपूर्ण तांत्रिक माहिती घेवून कमी खर्चात अधिक दूध उत्पादन मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता असून या शिबिराचा त्यासाठी निश्चित चांगला फायदा होईल, असा विश्वास ढेकळे यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिषदेने वंध्यत्व निवारणासाठी भाकड जनावरांची सोनोग्राफी करुन योग्य उपचार करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाला 2 सोनोग्राफी मशीन उपलब्ध करुन दिली असून त्याच्या वापराद्वारे या शिबिरात दाखल झालेल्या जनावरांच्या वंध्यत्व निवारणासंबंधी योग्य उपाययोजना वा औषधोपचार सुचविण्यात येतील. त्याचा लाभ घेण्याबरोबरच या शिबिरातील तज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पालकमंत्री ना.श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर यांच्याद्वारे शासनस्तरावरील तसेच श्रीमंत संजीवराजे यांच्याद्वारे  जिल्हा परिषद स्तरावरील विविध सोई-सवलती, सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून या भागासाठी सध्या कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जोडीला तरडफ अथवा उपळवे येथे आणखी एक पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करुन या भागात अधिक चांगली पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ढेकळे यांनी सांगितले. सुगीच्या कालावधीत हे शिबिर होत असले तरी शेतीला जोडधंदा म्हणून रुजलेल्या दुग्ध व्यवसायासाठी फायदेशीर ठरणाऱ्या या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा. शेतकरी नेहमी आपल्या मुलापेक्षाही जनावरांवर अधिक प्रेम करीत असल्याने त्या जनावराच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या या शिबिराचा तो निश्चित लाभ घेईल, असा विश्वास यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य पोपटराव काकडे यांनी व्यक्त केला. दुग्ध व्यवसायाच्या खाजगीकरणामुळे या भागातील सहकारी दूध सोसायट्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वास्तविक या सहकारी सोसायट्या आपल्या नफ्यातील काही भाग सभासद या नात्याने दूध उत्पादकांना देत असत. अलीकडे तालुक्यातील दुग्ध व्यवसाय खाजगी संस्थांच्या ताब्यात गेल्यामुळे त्या संस्था दूध उत्पादकाच्या नफा-तोट्याचा विचार करीत नाहीत आणि म्हणून सहकारी संस्थाच टिकविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा काकडे यांनी व्यक्त केली. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर कोळी यांनी शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल दूध उत्पादकांना धन्यवाद देवून शिबिरातील तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेवून प्रति जनावर दूध उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. देशाची लोकसंख्या 110 कोटी असताना देशातील जनावरांची संख्या मात्र सुमारे 300 कोटी असल्याचे सांंगून उत्पादित होणाऱ्या दुधाचे प्रमाण मात्र माणशी 171 ग्रॅम इतके अत्यल्प असल्याचे निदर्शनास आणून देतानाच प्रत्येकी किमान अडीचशे ग्रॅम दुधाची आवश्यकता असल्याने दूध उत्पादन वाढविण्याची आवश्यकता लक्षात घेवून केवळ जनावरांची संख्या वाढविण्यापेक्षा प्रति जनावर दूध उत्पादन वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांनी दुग्ध व्यवसायातील व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य आणि आहार यातील बदल समजावून घेवून त्याचा स्वीकार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे उपयुक्त आणि आवश्यक असल्याचे स्पष्ट करुन परंपरागत शेतीपेक्षा सुधारित तंत्रज्ञानाने केलेली शेती जशी फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे सुधारित तंत्रज्ञानाद्वारे केलेला दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत सर्वच वस्तूंची आयात-निर्यात क्रमप्राप्त आहे. आपल्या दुधाला परदेशी बाजारपेठ मिळविण्याबरोबरच येथील बाजारपेठेत येणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यामधील जिवाणू आणि विषाणूंची संख्या तपासूनच हे दूध बाजारपेठेत स्वीकारले जाणार असल्याने त्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.  पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. आझाद कादरभाई यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केल्यानंतर प्रास्ताविकात पशुपालनांतर्गत आहार व्यवस्थापन, मुक्त गोठा संचार पध्दती, वंध्यत्व निवारणासाठी सोनोग्राफी तंत्रज्ञानाची उपयुक्तता यासह दुग्ध व्यवसायातील नवीन सुधारित तंत्रज्ञान आणि सुधारित अत्याधुनिक औजाराविषयी या शिबिरातील तज्ञांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. त्याचा तरडफ आणि परिसरातील दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. सधन फार्माच्यावतीने
शिबिरात विविध औषधांची माहिती देण्यात आली. डॉ. आझार कादरभाई यांनी
आभार मानले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: