|
|
|
बारा बलुतेदार संघटनेच्या विकासासाठी कटिबध्द राहू
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:09 AM (IST)
मसूर, दि. 10ः समाजात क्रांती घडवणाऱ्या बारा बलुतेदारांचे महत्व मोठे असून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही आ. बाळासाहेब पाटील यांनी दिली. शिरवडे, ता. कराड येथील बारा बलुतेदार संघटनेच्या- वतीने विजयाची हॅटट्रीक केल्याबद्दल आ. बाळासाहेबपाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी रामचंद्र लोहार होते. याप्रसंगी कराड मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष मानसिंगराव जगदाळे, जिल्हा परिषदेचे सदस्य मारूती बुधे, सरपंच सौ. अनिता कुष्टे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रभाकर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. पाटील म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. पी. डी. पाटील यांच्या विचारांचा वारसा असलेल्या मतदार संघावर दक्षिणेतील धनदाडग्यांनी उमेदवारी मिळवून अतिक्रमण केले. सह्याद्रीचे कार्यक्षेत्र असणारा मतदारसंघ चार तालुक्यात विखुरला असून वंचित भागाला झुकते माप देवून प्रत्येक गाव विकासाने परिपूर्ण करण्याचा आपला ध्यास आहे. जनतेने गट-तट विसरून एकत्रित राहण्याचे आवाहन आ. पाटील यांनी केले. मानसिंगराव जगदाळे म्हणाले, बारा बलुतेदारांचा पाठिंबा फार मोलाचा असतो. त्यांचा एकोपा अनेक राजकीय संकटे थोपवू शकतो. इतिहासकालिन शिरवडे म्हणून या गावाची नोंद आहे. येथील समस्या सोडवण्यास आ. पाटील यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. कराड मार्केट कमिटीचे माजी सभापती बी. के. जगदाळे यांनी काम करणाऱ्या नेत्याला विक्रमी मतांनी विजयी करून पैसा, अफवा, दहशत याला बळी न पडता शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधणाऱ्या आ. पाटील यांच्या गळ्यात जनतेने विजयाची माळ घातली. पिंटू संदे यांनी नवीन गावठाणात प्लॉट मंजूर आहेत. पण त्याचा ताबा मिळाला नसल्याचे सांगून दारिद्र्यरेषेत अनेकांचा समावेश नाही तसेच घरकुल, रोजगार, रस्ता, पाणी पुरवठा याबाबत आ. पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी प्रास्ताविकात केली. संचालक संजय जगदाळे, अंकुश माकळ यांची भाषणे झाली. अनिल कुष्टे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्जेराव थोरात, उपसरपंच पै. रामचंद्र जगदाळे, चेअरमन अनिल जगदाळे, रामचंद्र गुरव, दिलीप भोई, सुरेश ठोंबरे, संजय जाविर, जगन्नाथ माळवदे, प्रकाश लोहार, बापूराव माळी, प्रभाकर माने, सखाराम कुंभार, अन्सार मुलाणी, इम्रान संदे, सुरेश कांबळे, महिपतराव चव्हाण, शांताराम जाधव, मारूती गायकवाड, नानासाहेब गुरव, विजय बोराटे, कृष्णत नाईगडे, नरसू देशमुख, कृष्णत वाघमारे, यासह सर्व संचालक, दुर्गामाता व्यंकटेश व नवबौध्द मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.
फोटो गॅलरी
|