Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
धान्यापासून दारूनिर्मिती निर्णयाविरोधी व्यापक जनआंदोलन उभारणार ः जगताप
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:10 AM (IST)
Tags: regional
औंध, दि. 10 ः सहकारी पतसंस्था, बॅंकांमध्ये अडकलेल्या ठेवीची रक्कम परत मिळण्यासाठी व धान्यापासून दारूनिर्मितीचे  कारखाने काढण्याच्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ दि. 16 मार्चपासून आण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात व्यापक जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संदीप जगताप व खटाव तालुकाध्यक्ष अशोक थोरात यांनी पत्रकाद्वारे  दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, आपल्या घामाचा, कष्टाचा पैसा अनेक ठेवीदार, शेतकरी, शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्या महिला, लहान व्यावसायिकांनी सहकारी पतसंस्था, नागरी बॅंकामध्ये ठेवला आहे. तो त्यांना सहजा सहजी परत मिळत नाही. याबाबत सहकार आयुक्त, मंत्रालयीन पातळीवर बैठकाही झाल्या मात्र, आकडेमोड व आश्वासनांखेरीज ठेवीदारांच्या पदरी  काहीच पडलेले नाही.
दारिद्रयरेषेखालील परित्यक्ता, विधवा, ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या ठेवींच्या पोटी 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम तातडीने परत करण्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती मात्र, आजअखेर ही कार्यवाही झालेली नाही.
शासनाने राजकीय स्वार्थापोटी ज्वारी, बाजरी, मका यापासून दारू निर्मितीचे कारखाने काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शासनाला 4 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे; परंतु तरुण पिढीला व्यसनाधीन बनवण्याचे काम सरकारकडून होणार आहे हे कारखाने काढण्यामागे राजकीय स्वार्थ व सबसिडीची नफेखोरी दडली आहे हेच स्पष्ट होत असून कारखान्याची प्रत्येक दिवसाची उत्पादन क्षमता 60 हजार लिटर पासून 120 हजार लिटरपर्यंत आहे व लिटरला 10 रुपये कारखानदारांना मिळणार आहेत. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध हे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: