असमाधानाचे फळ
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 10:58 PM (IST)
एका बाईच्या शेजारी दुसरी एक श्रीमंत बाई राहत होती. पैसा असल्याने ती श्रीमंत बाई नेहमी काही ना काही खरेदी करीत असे. गरीब बाईला या तिच्या श्रीमंतीचा फार हेवा वाटत असे. एकदा त्या श्रीमंत बाईने नवीन नक्षीच्या सोन्याच्या बांगड्या करवून घेतल्या. तिने सहज त्या शेजारच्या गरीब बाईला दाखवल्या. तिनेही "छान आहेत' असे म्हटले. पण मनात मात्र जळजळ सुरू झाली. आपणही अशाच बांगड्या बनवून घ्यायच्या व या शेजारणीला दाखवायच्या, असे तिने मनाशी ठरवले. पण एवढे पैसे आणणार कुठून? तिच्याकडे तिच्या आईने दिलेली एक सोन्याची पाटली होती. तीच मोडून त्या गरीब बाईने त्याच्या नवीन बांगड्या बनवून घेतल्या व ऐटीत शेजारणीला दाखवल्या. पुढे काही दिवसांनी त्या श्रीमंत बाईने गळ्यातला हार बनवला तर तिनेही तसाच हार बनवून घेतला. पण त्यासाठी तिला बांगड्या मोडाव्या लागल्या. पण दर खेपेस असा दागिना मोडून नवा केल्याने सोन्याला कसच राहिला नाही. पुढच्या दागिन्याच्या वेळी सोनाराने सांगितले, "या तुमच्या पूर्वीच्या दागिन्यात सोन्यापेक्षा हीणकसच जास्त आहे. याचं आता काही करता येणार नाही. पूर्वीच्या शंभर नंबरी सोन्याऐवजी तिच्या हातात आता शंभर नंबरी तांब्याचाच दागिना शिल्लक राहिला होता! तात्पर्य : दुसऱ्याची बरोबरी करू पाहणाऱ्याला नवीन तर काही मिळत नाहीच. पण स्वत:जवळ असलेलेही गमावण्याची वेळ येते.