Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:21 AM (IST)
Tags: regional
पाटण, दि. 10 : येथील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्यावतीने श्रीमंत सरदार पाटणकर यांच्या ऐतिहासिक वाड्यातील श्रीराम मंदिरामध्ये 354 वा श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने मंगळवार, दि. 16 रोजी गुढीपाडव्यापासून ते बुधवार, दि. 24 मार्चपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्याचा लाभ परिसरातील लोकांनी घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर यांनी केले आहे.
येथील श्रीमंत सरदार चांदजीराव पाटणकर यांना समर्थ रामदास स्वामी यांनी इ. स. 1656 मध्ये प्रभू रामचंद्राची पंचधातूची पट्टाभिरामाची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. तेव्हापासून प्रभू रामचंद्राची ही मूर्ती सरदार पाटणकर घराण्याने बांधलेल्या श्रीराम मंदिरात असून तिच्या उपासनेची परंपरा घराण्यातील प्रत्येक पिढीने कायम ठेवली आहे.
श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत दैनंदिन पहाटे काकड आरती, आरती, भजन, करूणाष्टके, दुपारी चार ते सहा प्रवचन व भजनी मंडळाचे कार्यक्रम होणार असून जन्मोत्सवकाळात रोेज रात्री 9.30 ते 12 या वेळेत रहिमतपूर येथील कु. रोहिणी माने यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
24 मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम होत असून सकाळी 10.30 वाजता कीर्तन, दुपारी 12.37 वाजता श्रीराम जन्मकाळ, सुंठवडा व महाप्रसादाचे वाटप दुपारी 1 ते 3 या वेळेत होणार असून ज्यांना अभिषेक, देणगी द्यावयाची आहे त्यांनी श्रीराम देस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमंत अमरसिंह पाटणकर यांनी केले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: