Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ः सौ. वेदांतिकाराजे
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 10:56 PM (IST)
Tags: local news
सातारा, दि. 11 ः महिला या कुटुंबाचा कणा असल्याने त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील महिला निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी व उत्साही राहण्यास मदत होईल, असे उद्‌गार श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी काढले.
शनिवार पेठ नवरात्रोत्सव मंडळ व मयुरेश्वर शिवजयंती मंडळाने आयोजित केलेल्या महिला आरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. वैशाली सप्रे, डॉ. सुजाता देशपांडे, विजय मांडके, गुजराथी अर्बन संस्थेचे विनोद कुलकर्णी, पोपट मोरे, सुरेखा रानडे, डॉ. अच्युत गोडबोले, रवींद्र झुटींग उपस्थित होते.
सौ. वेदांतिकाराजे पुढे म्हणाल्या, महिलांचे आपल्या आहारावर लक्ष नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून या मंडळाने चांगला उपक्रम राबवला आहे.
रवींद्र झुटींग म्हणाले, मंडळाने उत्सवापुरते मर्यादित न राहता परिसरातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठांसाठी नवनवीन उपक्रम राबवून परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचे काम केले आहे. यासाठी पेठेतील अनेक नागरिकांचे सहकार्य लाभत आहे. भविष्यात देखील हे मंडळ विविध उपक्रम राबवणार आहे.
या शिबिरात सुमारे 200 महिला सहभागी झाल्या होत्या. या महिलांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करून औषधे देण्यात आली. यावेळी डॉ. वैशाली सप्रे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. डॉ. अच्युत गोडबोले, डॉ. सुजाता देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश मराठे यांनी प्रास्ताविक केले. पोपट मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. अलका जाधव, सौ. संध्या कीर्दत, संतोष गाडे, राहुल शिंदे, आनंद मायणे, अभिजीत कचरे, शुभम बल्लाळ, देवदास मोरे, विनायक जोग यांनी परिश्रम घेतले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: