Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महिला विधेयक आता लोकसभेत
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 10:05 PM (IST)
Tags: main news

नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : महिला आरक्षण विधेयकाला कडाडून विरोध करीत, प्रचंड घोषणाबाजी आणि गदारोळ, गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज बुधवारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. आता राज्यसभेने मंजूर केलेले महिला आरक्षण विधेयक पुढच्या आठवड्यात 15 किंवा 16 मार्च रोजी लोकसभेत मांडण्याची तयारी सरकारने केली आहे.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच, महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सात दंगेखोर खासदारांचे निलंबन रद्द करावे, अशी मागणी करीत समाजवादी आणि राष्ट्रीय जनता दलाच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातला. सरकारच्या विरोधातही या पक्षांच्या खासदारांनी प्रचंड घोषणाबाजी करीत लोकसभेच्या सभापती मीराकुमार यांच्या आसनासमोर धाव घेतली. या सदस्यांचे निलंबन रद्द होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा आरडाओरडा मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव आणि शरद यादव यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी केला. मुस्लीम, दलित आणि मागासवर्गीयांसाठी या विधेयकात आरक्षणाची तरतूद झालीच पाहिजे, अशी मागणी या सदस्यांनी केली. या गोंधळातच सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
दरम्यान, या सात निलंबित खासदारांनी सभागृहाची माफी मागितल्यास त्यांचे निलंबन रद्द केले जाईल, अशी भूमिका सरकारने घेतली. पण, सरकारनेच आमची माफी मागितली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतल्यामुळे, लोकसभेच्या कामकाजात गुरुवारी (आज) पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता आहे.
लालूंची कोलांटी उडी
राज्यसभेत हे विधेयक मंजूर होताच, अंगाचा तिळपापड झालेल्या लालू प्रसाद यादवांनी आपण सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी लोकसभेत अविश्वास ठराव मांडणार असल्याचे सांगितले होते. पण, बुधवारी मात्र लालू आणि मुलायम सिंग यांनी कोलांटी उडी घेत असा कोणताही ठराव आपण मांडणार नसल्याचे सांगितले. पण, आहे त्या स्वरुपात या विधेयकाला आपला विरोध सुरूच राहील, असे त्यांनी जाहीर केले.
राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकाच्या मतदानावर बहिष्कार घालणाऱ्या सत्ताधारी आघाडीतल्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आपला या विधेयकाला विरोध नसल्याचे सांगितले. आपले म्हणणे समजून घेण्याचे आश्वासन सरकारने दिल्यामुळे आपण समाधानी आहोत, असेही त्या म्हणाल्या.
विधेयक लोकसभेत
कोणत्याही परिस्थितीत महिला विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच मंजूर करुन घेण्याचा निर्धार सरकारने केला असल्याने 15 किंवा 16 मार्चच्या दरम्यान हे विधेयक लोकसभेत मांडले जाईल, असे केंद्रीय कायदा मंत्री विरप्पा मोईली यांनी सांगितले.
महिला आरक्षण विधेयकाला संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी आपला विरोध कायम ठेवला असला, तरी या विधेयकाला पक्षाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाठिंबा जाहीर केल्याने, या पक्षातला अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला. याच मुद्द्यावरुन नितीश कुमार स्वतंत्र पक्षाची स्थापना करतील अशा वावड्या बिहारमध्ये उठल्या होत्या. त्याचा इन्कार करुन नितीश कुमार यांनी, या मुद्द्यावर पक्षात मतभेद असले तरी आपण कोणताही नवा पक्ष स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले.
केंद्रातल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा मागे घेतल्याचे पत्र लालू प्रसाद यादवांनी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांना दिले. या पक्षाचे लोकसभेत अवघे 4 खासदार आहेत. सरकार खेचायसाठी तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असे भारतीय जनता पक्षाचे नेते यशवंत सिन्हा यांनी लालू प्रसादांना सांगितले. मुलायम सिंग यादव यांनीही सरकारचा पाठिंबा मागे घेणार असल्याची धमकी दिली आहे.
हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी आपण कोणतीही जोखीम स्वीकारायची तयारी केली होती. त्यामुळे सरकार अस्थिर होण्याचा प्रश्नही उद्‌भवत नाही.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: