लांडग्यापुढे टाकीन
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 12:56 AM (IST)
एका जंगलात एक पारधी आपल्या बायको-मुलांसह राहत होता. एके दिवशी नेहमीसारखा सकाळी उठून शिकारीसाठी म्हणून निघाला तर त्याच्या एकुलत्या एक मुलाने त्याच्याबरोबर जाण्याचा हट्ट चालविला. पारध्याने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण मुलगा ऐकायला तयार होईना. शेवटी त्याने मुलाला बायको जवळ दिले व पारधी शिकारीसाठी निघून गेला. इकडे मुलाने रडून रडून झोपडी डोक्यावर घेतली. त्याची आई तर अगदी वैतागून गेली. तिने पोराला एक चापट मारली नि म्हणाली, "आता गप्प नाही झाल्यास तर लांडग्यापुढं टाकीन.' त्याच वेळी एक लांडगा झोपडीजवळून जात होता. त्याने ते शब्द ऐकले नि तो आशाळभूतपणे तिथेच आडोशाला थांबला. पोराचे रडणे काही थांबण्याची चिन्हे दिसेनात. पोराला आपल्यापुढं टाकतील म्हणून लांडगा आतुरतेने वाट पाहत राहिला. तास-दोन तास झाले, दुपार उलटली, संध्याकाळी पारधी परत येण्याची वेळ झाली. पण त्या पोराच्या आईने त्या मुलाला झोपडीबाहेर काढले नाही! उलट आपल्या मुलाशी ती लाडात बोलत होती. "आता बाबा आले की त्यांना लांडग्याला मारून टाकायला सांगू'
हे ऐकून लांडगा चिडला. आपलं अंग झटकन मनाशी म्हणाला, "या माणसांच्या बोलण्याचं काही खरं नाही. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणाच!' तात्पर्य : कानावर आलेल्या प्रत्येक शब्दावर कधीही विश्वास ठेवू नये. त्यातून आपली फसगत होण्याचीच शक्यता असते.