Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

महाभारत घडून राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 01:39 AM (IST)
Tags: main

नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : अर्धी दुनिया ज्याची आतुरतेने वाट पहात आहे, ते ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक महाभारत घडून आज मंगळवारी राज्यसभेत दोन तृतियांश बहुमताने मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने एकूण 233 सदस्यांपैकी 186 सदस्यांनी मतदान केले. एका सदस्याने विधेयकाच्या विरोधात मत नोंदविले.
तृणमूल कॉंग्रेसने मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला तर बसपाने मतदानावर बहिष्कार टाकला. आता राज्यसभेत हे विधायक मंजूर झाल्यामुळे विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या 14 वर्षांपासून हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले. पण विविध कारणांमुळे ते मंजूर होत नव्हते. विधेयक मांडण्याचा निर्णय युपीए आघाडीने घेतल्यानंतर विधेयकाच्या विरोधात असलेल्या राजद, समाजवादी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणले. तरीही सुमारे साडेतीन तास या विधेयकावर चर्चा झाली. सर्वपक्षीय सदस्यांनी त्यात भाग घेतला. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तरे दिली. पंतप्रधानांच्या उत्तरानंतर राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी विधेयकावर मतदान घेतले. त्यात दोन तृतियांश उमेदवारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले.
संसद आणि विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या विधेयकावर आता लोकसभेत चर्चा आणि मतदान होईल. तिथे विधेयक मंजूर झाल्यास ते राष्ट्रपतींकडे जाईल आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: