Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

आंध्रप्रदेश
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 09:54 PM (IST)
Tags: vishesh lekh
तेलंगणा राज्याच्या स्थापनेसाठी आंध्र प्रदेशातल्या हिंसक आंदोलनात आता, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु झाल्याने, मुख्यमंत्री रोसय्या सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या तीन महिन्यात आंध्र प्रदेशातल्या तेलंगणा विभागातल्या हिंसक आंदोलनात हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीच अधिक भाग घेतला. विद्यापीठाचा परिसर वारंवार अशांत होऊ लागल्यामुळे, तेथे आता केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी ठेवण्यात आल्या आहेत. विद्यापीठातले हे विद्यार्थी संघटितपणे पोलिसांवरही वारंवार दगडफेक करतात. वाहनांना आगी लावतात. रस्ते रोखतात. या हिंसक विद्यार्थ्यांना पांगवायसाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागणे, ही आता नित्याची बाब झाली आहे. केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या हालचालीवर कडक नजर ठेवत असल्याने, सध्या तरी विद्यापीठाचा परिसर दंगलीपासून मुक्त आहे. पण, याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपले जीवनच संपवायच्या शेवटच्या टोकाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे सरकारला नवी डोकेदुखी सुरू झाली.
अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गाला शिकणारा पी. साईकुमार हा विद्यार्थी मंगळवारी सकाळी वर्गात उपस्थित होता. त्याने वसतिगृहात येताच, खोलीतच गळफास लावून आत्महत्या केली. आपण स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठीच जीवनाचा त्याग करीत आहोत, असे त्याने मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. साई कुमार ने गळफास लावून घेतल्याचे लक्षात येताच, तातडीने त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या विद्यापीठातल्या शेकडो विद्यार्थ्यांनी रुग्णालयासमोरच धरणे धरले. साईकुमारचे पार्थिव विद्यापीठाच्या आवारात नेण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी कडक बंदोबस्तात त्याचे पार्थिव तेथून हलवले. पण त्यामुळे शहरातील वातावरण तंग झाले.
गेल्या तीन महिन्यात स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आता चार झाली आहे. केंद्र सरकारने स्वतंत्र तेलंगणा राज्याची मागणी मान्य करावी, यासाठी तेलंगणा राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष राव यांनी बेमुदत उपोषण सुरु केल्यावर, हैद्राबादसह संपूर्ण तेलंगणा भागात हिंसक आंदोलनाचा भडका उडाला होता. आता केंद्राने ही मागणी मान्य केल्यावर, अखंड आंध्रासाठी नवे आंदोलन सुरू झाल्यामुळे, संपूर्ण राज्यच अशांत झाले आहे. या मागणीवर विचार करायसाठी केंद्राने नेमलेल्या मुखर्जी समितीवर, तेलंगणा समितीने बहिष्कार घालून, नव्याने आंदोलनाची हाक दिली. तर अखंड आंध्रासाठीही आंदोलन सुरू झाले. परिणामी या वारंवार होणाऱ्या हिंसक आणि बंद आंदोलनामुळे, आंध्र राज्यातल्या औद्योगिक उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. पर्यटकांची संख्याही निम्म्याने घटली आहे. या आंदोलनामुळे सरकारचे दहा हजार कोटी आणि उद्योग क्षेत्राचे पंधरा हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: