Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोहम्मद युसूफ व युनूस खानवर आजन्म बंदी
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 10:22 PM (IST)
Tags: sports
कराची, दि. 10 (वृत्तसंस्था) : बेशिस्त क्रिकेटपटूंना वठणीवर आणण्यासाठी पाक क्रिकेट मंडळाने अभूतपूर्व कारवाई केली असून पाक कसोटी संघाचा कर्णधार मोहम्मद युसूफ व माजी कर्णधार युनूस खान यांच्यावर आजन्म बंदीच्या कारवाईचा बडगा उचलला आहे. त्याशिवाय माजी कर्णधार शोएब मलिक व अष्टपैलू राणा नावेद-अल-हसन यांना एक वर्षाची बंदी व जबर दंडाची शिक्षा केली आहे. कामरान व उमर या अकमल बंधूंना आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदी यांना प्रत्येकी 30 लाख रुपये दंड ठोठावला आहे.
भयस्वप्न ठरलेल्या दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाक संघाच्या कामगिरीची चौकशी करण्यासाठी पीसीबीने माजी कसोटीपटू वसिम बारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सहा सदस्यीय समितीने आपला अहवाल गेल्या आठवड्यात पीसीबीला सादर केला होता. या समितीच्या शिफारशींवरुन पीसीबीने अभूतपूर्व अशी कडक पावले उचलली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाकने कसोटी मालिका 3-0 ने गमावली होती. त्यानंतर झालेल्या वनडे मालिकेतही कांगारुंनी पाकला 5-0 असा व्हाईटवॉश दिला होता. ट्‌वेंटी-20 मधील जगज्जेते अशी बिरुदावली मिळवणाऱ्या पाक संघाला एकमेव ट्‌वेंटी-20 सामन्यातही कांगारुंनी खडे चारले होते.
काही खेळाडूंनी संघात गटबाजी पेरल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला. पीसीबीने केलेल्या या कडक कारवाईचे हेच मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले. या सर्वात कडक कारवाईमुळे पाकच्या ट्‌वेंटी-20 विश्वचषक संघ निवडीवर सावट पसरले आहे. याक्षणी या संघात कारवाई केलेल्या एकाही खेळाडूचा समावेश होईल, असे सांगता येत नाही.
युसूफ व युनूसवर आजन्म बंदी लादणाऱ्या पीसीबीने मलिक व नावेदला एक वर्षाच्या बंदीसह प्रत्येकी 20 लाख रुपये दंडही ठोठावला आहे. मलिक व नावेद यांनी या दौऱ्यात अनेक गैरकृत्ये केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय कामरान अकमल, उमर अकमल व शाहिद आफ्रिदी यांना प्रत्येकी 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्याशिवाय या त्रिकुटावर 6 महिने उमेदवारी (प्रोबेशन पिरीयड) करण्याची वेळ आली आहे.
सहा सदस्यीय समितीने आपला अहवाल पीसीबीचे चेअरमन एजाझ बट्ट यांना गेल्या आठवड्यात सादर केला होता. सोमवारी बट्ट यांनी निवड समितीची बैठक बोलावून चौकशी समितीने दिलेल्या अहवालातील तपशील दिला.
दरम्यान, या वरिष्ठ खेळाडूंवर केलेल्या कठोर कारवाईचे पीसीबीचे कायदेविषयक सल्लागार तफझुल रिझवी यांनी समर्थन केले. मोहम्मद युसूफ व युनूस खान यांच्यात सतत वाद होत असल्याने त्याचा संघातील इतर सदस्यांवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांच्यावरील आजन्म बंदी योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युसूफ व युनूस यांच्यातील भांडणामुळे संघाची कामगिरी खालावली. इतर खेळाडूंवर त्याचा गंभीर परिणाम झाला. त्यामुळे कोणत्याही फॉरमॅटमधील पाक संघात त्यांना स्थान देणे उचित ठरणार नाही, असे पीसीबीच्या पत्रकात म्हटले आहे.
रिझवी म्हणाले, याबाबत पीसीबीचा पवित्रा योग्यच आहे. शिस्त हा राष्ट्रीय संघासाठी सर्वात महत्त्वाचा गुण आहे. खेळाडू वरिष्ठ आहे की कनिष्ठ, याचा काहीएक संबंध नाही. युसूफ व युनूस यांच्यावरील कारवाईला "आजन्म बंदी' हे शब्द वापरण्यास त्यांनी नकार दिला. मात्र या खेळाडूंचा कोणत्याही फॉरमॅटसाठी यापुढे विचार होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
युसूफ व युनूस यांच्यावर आजन्म बंदी लादली, असे म्हणणे योग्य होणार नाही. आजन्म बंदी याचा अर्थ ते आंतरराष्ट्रीयच नव्हे तर देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळू शकणार नाहीत, असा होतो. मात्र आम्ही त्यांना त्यापासून रोखलेले नाही. ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि परदेशात कौंटी क्रिकेटही खेळू शकतात. मात्र या दोघांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
युसूफ व युनूस यांच्यातील भांडणांना पीसीबीचे सदस्य वैतागले होते. त्याशिवाय पाक संघाच्या कर्णधारपदासाठी सुरू असलेला संगीत खुर्चीचा खेळही वैताग वाढवणारा होता. तो संपवण्यासाठी पीसीबीने हे पाऊल उचलल्याची चर्चा पाकमध्ये आहे. गेल्या वर्षी मलिकला हटवून कर्णधारपदावर विराजमान झालेल्या युनूस खानने पाकला ट्‌वेंटी-20 विश्वचषक मिळवून दिला होता. त्यानंतर पाक संघाची कामगिरी न उंचावता खालावतच गेली होती. त्यातून युनूसने दोनदा कर्णधारपद सोडले होते. दोन्ही वेळा त्याच्या नेतृत्वाबद्दल खेळाडूंमध्ये असलेला असंतोष कारणीभूत होता. त्यानंतर युसूफने कर्णधारपद स्वीकारण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा मुहूर्त काढला होता. मात्र हा मुहूर्त त्याला अशुभ ठरला होता. त्या दौऱ्यात त्याला एकही सामना जिंकता आला नाही, पण शोएब मलिकशी त्याचा झालेला जाहीर वाद जगप्रसिध्द झाला होता.
शोएब मलिक व राणा नावेद यांच्यावरही शिस्तभंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर एक वर्षाची बंदी व 20 लाख रुपयांचा दंड अशी कारवाई करण्यात आली आहे. त्या मागील स्पष्ट कारणे व घटनांचातपशील मी देऊ शकणार नाही. कारण आम्ही गोपनीयतेची शपथ घेतली आहे. मात्र त्यांच्यावरील कारवाई प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर आणि ठोस माहिती असल्याने केल्याचे त्यांनी सांगितले.
अकमल बंधू व आफ्रिदी यांनाही बेशिस्तीचे परिणाम भोगायला लागले आहेत. ऑस्ट्रेलियात सिडनी कसोटीनंतर निवड समितीने यष्टिरक्षक कामरान अकमलला संघाबाहेर बसवण्याचे ठरवले होते. मात्र तिसऱ्या कसोटीसाठी आपली निवड होणारच आणि तीही यष्टिरक्षक-फलंदाज म्हणूनच, अशी दर्पोक्ती कामराने जाहीरपणे केली होती. त्याचवेळी भावावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी उमरला तिसऱ्या कसोटीत खेळायचे नव्हते. त्यासाठी त्याने दुखापतीची खोटी सबब पुढे केली होती. त्यामुळे त्यांना दंड केल्याचे रिझवी म्हणाले.
पर्थ येथील वनडे सामन्यात कर्णधारपद भूषविताना आफ्रिदीने चेंडू कुरतडला होता. त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर दोन सामन्यांच्या बंदीची कारवाई केली होती. त्या घटनेमुळे पाक क्रिकेटची अब्रू गेली म्हणून पीसीबीने त्याला दंडठोठावला आहे. त्याशिवाय या तिघांना पुढील सहा महिने उमेदवारी (प्रोबेशन) करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
पाक मंडळाने केलेल्या कारवाईला ठोस आधार आहे. मंडळाला जे योग्य वाटले ते केले. भावी काळात एक उदाहरण समोर ठेवण्याचा पीसीबीचा उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: