कामगारांसाठी झालेल्या सुरक्षितता चित्रकला स्पर्धा उत्साहात
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 01:12 AM (IST)
सातारा, दि. 9 : राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाच्या निमित्ताने मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा व औद्योगिक सुरक्षा
व आरोग्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने कारखान्यातील कामगारांच्या इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या मुलांसाठी झालेल्या सुरक्षितता चित्रकला स्पर्धा महाराष्ट्र स्कूटर्स येथे उत्साहात पार पडल्या.
सातारा, कराड, वाई, फलटण, शिरवळ, पाचगणी या भागातील अनेक लहान-मोठ्या कारखान्यांनी या स्पर्धेसाठी प्रयोजन केले होते. स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. मुलांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर उपस्थित होते. त्यांनी मुलांच्या चित्रकलेची पाहणी केली व जागेवर त्यांचे कौतुक केले तसेच सुरक्षिततेविषयी व्यासपीठावरुन बोलताना सर्व लहान मुलांमध्ये जाणीव आहे याचा उल्लेख केला. मुलांकडून सुरक्षितता पालनासाठी त्यांच्या शब्दांमध्ये शपथ घेतली. तसेच मतिमंद मुलांविषयी बोलताना त्यांना मतिमंद हा शब्द न वापरता त्यांना इत:पर "विशेष विद्यार्थी' म्हणून संबोधण्यात यावे असे सूचविले. कार्यक्रमास औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक एस. एम. कारंडे, उपसंचालक राजन लाखे, मासचे अध्यक्ष शिरीष खुटाळे, उपाध्यक्ष वसंतराव फडतरे, महाराष्ट्र स्कूटर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक राजीव हावरे आणि विविध कंपन्यांतील मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते सुरक्षितता चित्रकला बक्षीसपात्र विद्यार्थी व जिल्हा घोषवाक्य विजेते कामगारांना प्रशस्तीपत्रे व मानचिन्हे प्रदान करण्यात आली.
कुलकर्णी चॅरिटेबल ट्रस्ट, कराड यांनी एड्सविषयी पालकांशी सरळ संवाद साधला व पालकांसाठी सुरक्षितता प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेवून विजेत्यांना तात्काळ बक्षिसे देण्यात आली. गट नं. 1 - प्रथम क्र. कु. रजत पंढरीनाथ शेलार, द्वितीय क्र. केतन गणेश निबंधे, तृतीय क्र. ओम मधुसूदन मोहिते, गट नं. 2 - प्रथम क्र. ऋतिक महेश टंकसाळे, द्वितीय क्र. सुश्रुषा संजय बारंगळे, तृतीय क्र. श्वेता भालचंद्र कारंडे - पाटील, गट नं. 5 - प्रथम क्र. सूरज सुदाम चव्हाण, द्वितीय क्र. सचिन शंकर शिरतोडे, तृतीय क्र. प्रदीप कदम. महाराष्ट्र स्कूटर्स व कूपर कार्पोरेशनच्या कामगार कर्मचाऱ्यांनी सुरक्षेविषयी विविध करमणुकीचे कार्यक्रम सादर
केले. मिलिंद कांबळे यांनी सूत्रसंचलन केले.