Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
साखर कारखान्यांनी वीजनिर्मितीद्वारे उसाला जादा दर द्यावा : ना. अशोक चव्हाण
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 10:07 PM (IST)
Tags: regional

पाटण, दि. 10 : साखर कारखानदारी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली असली तरी शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव देण्यासाठी कारखान्यांनी वीजनिर्मिती क्षेत्रात पदार्पण केले पाहिजे. वीजनिर्मिती करू इच्छिणाऱ्या कारखान्यांना शासनाकडून सर्व ती मदत दिली जाईल. कारखान्यांना ताकद देण्याचे काम शासन करणार आहे, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी केले.
लोकनेते बाळासाहेब देसाई जन्मशताब्दी महोत्सव समितीच्यावतीने येथील शैक्षणिक संकुलात उभारलेल्या मेघडंबरी स्मारकाचे उद्‌घाटन व लोकनेत्यांच्या तैलचित्राचे अनावरण आणि मान्यवरांचा सत्कार अशा प्रमुख कार्यक्रमात ना. चव्हाण बोलत होते. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव डावखरे, आ. विलासराव पाटील, आ. जयकुमार गोरे, माजी आ. सदाशिव सपकाळ, पुणे विभागाचे आयुक्त दिलीप बंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. चव्हाण पुढे म्हणाले, गरीबांच्या हिताचे निर्णय आघाडी शासनाने घेतले असून राज्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांना गुणवत्ताप्राप्त वैद्यकीय सेवा मिळावी, हृदयशस्त्रक्रियेसारख्या खर्चिक उपचारासाठी राज्य शासन प्रत्येक दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीचा 2 लाख रुपयांचा विमा उतरून त्याच्या शस्त्रक्रियेची तरतूद करण्याबरोबर सर्व खर्च करणार आहे. स्व. शंकरराव चव्हाण व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे अत्यंत प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध होते. या नेत्यांमधील कार्यपध्दतीत बरेच साम्य होते. प्रशासनावर त्यांचा दरारा होता. लोकनेत्यांनी दिलेला आदेश हा अंतिम असायचा. अधिकाऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा केला जात आहे, हे राज्याला भूषणावह असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, मंत्रिमंडळात एकविचाराने काम करणारे मंत्री आहेत आणि तरूण आमदारही आमच्यासमवेत आहेत. व्यासपीठावरील आम्हा सर्वांची नाळ एक आहे. आमच्या एकत्रित प्रवाहापासून काही काळ विशिष्ट परिस्थितीमुळे आमचे मित्र शंभूराज देसाई हे दूर गेले असले तरी ते नेहमी आमच्याबरोबर आहेत असेच आम्हाला वाटते. त्यांनी चांगल्या कामासाठी आम्हाला साथ केली आहे, हे आम्ही विसरणार नाही. आता त्यांनी कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन करुन ना. चव्हाण म्हणाले, आपले घर कॉंग्रेसचेच आहे, मुहूर्त चांगला आहे, अनेक महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, इमारत भक्कम आहे. फक्त त्यावर कळस चढवून जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. शंभूराज देसाई यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात पाटण तालुक्याचे प्रश्न, मतदारसंघाच्या हिताचे प्रश्न हिरीरीने विधानसभेत मांडले. त्याचा पाठपुरावा केला. याचा मी साक्षीदार असून आपण लोकांची कामे करत राहिला असल्यामुळेच लोकांनी आपली साथ सोडली नाही, असेही त्यांनी सांगितले.
नुकतेच महिला आरक्षणाचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले असून या क्रांतिकारक निर्णयाची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर राहील, अशी ग्वाही देऊन ना. चव्हाण म्हणाले, आता हा कायदा अंमलात आल्यावर महिलांना राजकीय, सहकार व सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
प्रारंभी शंभूराज देसाई यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार, शाल, स्मृतिचिन्ह व चांदीचे श्रीफळ देवून स्वागत केले.
ते म्हणाले, लोकनेत्यांच्या कार्यामुळेच पाटण तालुक्याची राष्ट्राच्या नकाशावर ओळख झाली. पाटण तालुका विकासाच्याबाबतीत पुढे नेण्याची व पाटण तालुक्याचे नंदनवनाचे स्वप्न त्यांनी पाहिले. प्रतिकूल परिस्थिती व खडतर मार्ग यावर मात करत एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोकनेत्यांनी संकटाला धैर्याने तोंड देत आपले उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला. तरूण पिढीला लोकनेते, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांनी तालुक्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याची ओळख व्हावी म्हणून हा जयंती महोत्सव साजरा करून आम्ही आमचे उद्दिष्ट साध्य केले आहे. लोकनेत्यांच्या लोकसेवेचा वसा आपण पुढे चालविण्याचा निर्धार केला असून तालुक्याच्या विकासासाठी अखेरपर्यंत लढत राहण्याचा निर्धार केला आहे.
ना. हर्षवर्धन पाटील म्हणाले, लोकनेत्यांची कारकीर्द ही सदा सर्वकाळ स्मरणात राहणारी आहे. पोलादी पुरूष, कणखर प्रशासक, सच्चा दिलाचा मित्र व सर्वसामान्य जनतेचा समाजसेवक ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची रूपे उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेली आहेत. लोकनेत्यांनी राज्य उभे करण्याचे काम केले. देसाई घराण्याने राज्यातील जनतेची मनोभावे सेवा केली म्हणूनच शंभूराज देसाई यांनी देखील मूळघरात परत यावे. पश्चिम महाराष्ट्र कॉंग्रेसच्या विचारांनी बांधलेला आहे. कॉंग्रेसची परंपरा, संस्कार, विचार लोकनेत्यांनी जोपासला असून या विचारांची आपली देखील बांधिलकी आहे.
ना. विखे-पाटील म्हणाले, लोकनेते स्वकर्तृृत्वाने महत्तम पदाला पोहोचल्यामुळे त्यांनी स्वत: त्यांची आगळीवेगळी ओळख संपूर्ण राज्याला दिली. लोकनेते विशाल दृष्टीकोनाचे महामानव होते. त्यांच्या सानिध्यात काहीकाळ घालविल्याने ते आमचे प्रेरणास्त्रोत बनले. आमच्या पिढीला त्यांचे विचार व कार्य मार्गदर्शक ठरले. या महापुरूषाची वाटचाल कार्यकर्तृत्व जनतेला समजावे म्हणून जन्मशताब्दी महोत्सव साजरा केला जात आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. या दृष्ट्या नेतृत्वाने संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांची कर्तबगारी अवर्णनीय आहे. त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार राज्य शासनाने देवून त्यांच्या कार्याचा गौरव करावा.
डावखरे म्हणाले, महिना 10 रुपयाला पेपर वाटणारा एक मुलगा विधानसभेचा सभापती होतो हे भाग्य मला केवळ लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामुळेच लाभले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई, स्व. शंकरराव चव्हाण, स्व. बाळासाहेब सावंत यांच्यामुळेच आपण राजकारणाचे टप्पे पार करू शकलो. वर्तमानपत्रातून मला खरे बाळासाहेब समजले. त्यांच्या आशिर्वादाने मोठा झालो. त्यामुळेच माझे राजकीय भविष्य उज्ज्वल बनले.
आ. विलासराव पाटील म्हणाले, सातारा जिल्हा डोंगरी, दुर्गम तसा दुष्काळीपण आहे. या जिल्ह्याचे प्रश्न वेगळे आहेत. भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करून त्यावर निर्णय प्रक्रिया राबविली गेली पाहिजे. अलीकडे शेतकरी व विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे, ही गंभीर अवस्था आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सक्षम माणसांना एकत्र आणण्याचे कार्य करावे लागणार आहे. कॉंग्रेस पक्षाला 110 वर्षांची परंपरा असून कॉंग्रेसची चळवळ पुढे नेण्यासाठी संघटनात्मक कार्य बळकट करून लोकनेत्यांच्याप्रमाणे गरीबांचे अश्रू पुसण्याचे काम भविष्यकाळात करावे लागेल.
कारखान्याचे उपाध्यक्ष ऍड. बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले. ऍड. डी. पी. जाधव यांनी सूत्रसंचलन केले.
या समारंभास बाबुलाल काकडे, रविराज देसाई, मुख्य अभियंता दीपक मोडक, जिल्हाधिकारी विकास देशमुख, मिलिंद पाटील, अशोकराव पाटील, ज्ञानदेव शिर्के, डॉ. दिलीपराव चव्हाण, सौ. भारती देसाई, सौ. सुवर्णा जाधव, सौ. अंजली कदम, सौ. आयेशा सय्यद, बशीर खोंदू, जयवंतराव शेलार यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी प्रचंड संख्येने उपस्थित होते.
लोकनेेते बाळासाहेब देसाई जन्मशताब्दी महोत्सव समितीने लोकनेत्यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे, हस्तलिखितांचे व चित्रफितींचे प्रदर्शन उभे केले असून कायमस्वरूपी कलादालन उभे करण्याचा संकल्प सोडला आहे. यासाठी 2 कोटी रुपये निधी उभारण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने या दालनासाठी 25 लाख रुपयांचा निधी आपण जाहीर करत असून यापेक्षाही अधिक निधी लागला तरी तो उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

लोकनेते बाळासाहेब देसाई जन्मशताब्दी महोत्सव समितीच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकनेत्यांच्या कुटुंबातील त्यांचे कनिष्ठ बंधू तानाजीराव देसाई, त्यांच्या वहिनी श्रीमती वत्सलाताई शिवराम देसाई, सुपुत्र अरूणराव दौलतराव देसाई, कन्या सौ. मंगलाताई मुरारराव थोरात, स्नुषा श्रीमती विजयादेवी शिवाजीराव देसाई, श्रीमती रेखाताई शरदराव देसाई यांना स्मृतिचिन्ह, शाल, चांदीचे श्रीफळ व पुष्पहार देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्व उपस्थित जनसमुदाय सद्‌गदीत झाला होता. लोकनेत्यांच्या कुटुंबियांना एकाचवेळी एका व्यासपीठावर पाहण्याचा योग त्यानिमित्ताने आला.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकनायक या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर मेघडंबरीचे शिल्पकार रवींद्र शेलार व मेघडंबरी उभारणारे बांधकाम व्यावसायिक मनोहर शेलार यांचा ना. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, मेघडंबरीचे उद्‌घाटन झाल्यावर लोकनेत्यांना आदरांजली म्हणून 21 तोफांची सलामी देण्यात आली.
शंभूराज देसाई यांनी कॉंग्रेसच्या मूळ प्रवाहापासून अधिक काळ बाजूला न राहता कॉंग्रेस पक्षात सहभागी व्हावे. आमची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी करू, अशी ग्वाही देत उपस्थित जनसमुदायाला हा निर्णय मान्य आहे का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला असता जनसमुदायाने हात उंचावून त्याला प्रतिसाद दिला.

फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: