भारताचे पाच बॉक्सर अंतिम फेरीत
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 10:29 PM (IST)
नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : इराणमधील तेहरान येथे सुरू असलेल्या आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या पाच बॉक्सरनी अंतिम फेरी गाठली.
लाईट फ्लायवेट (48 किलो) गटात देवेंद्रोसिंग लैशरामने फिलिपाईन्सच्या एंगलबर्ट मोराल्ये याच्यावर 5-0 अशा गुणांनी विजय नोंदवला. 60 किलो गटात विकाश कृष्णनने चीनच्या फेई हेंगचा 9-0 असा धुव्वा उडवला.
75 किलो गटात सुमित सांगवानने थायलंडच्या सक्कारिह चूजितवर 2-0 अशी मात केली. लाईट हेवीवेट (81 किलो) गटात नवीनकुमारने उझबेकिस्तानच्या बेगालिएव सारदोरबेकवर थरारक विजय मिळवला. या लढतीच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये 2-2 अशी बरोबरी राहिली. मात्र काऊंटबॅकवर नवीनकुमारला विजयी घोषित करण्यात आले.
फीदरवेट (57 किलो) गटात वेंकट गिड्डी नागार्जुनने किरगिझस्तानच्या हर्सलतान पाझीलोववर 8-1 असा मोठा विजय मिळवला. मात्र अन्य चार गटांमध्ये भारतीय बॉक्सर पराभूत झाले. आता हे चौघे कांस्यपदकासाठी झुंजतील. 51 किलो गटात श्रीनिवास सुरबेटीला चीनच्या जियॉंग जियांगकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला. 64 किलो गटात हरपालसिंगला कझाकस्तानच्या मेईरिम हर्सुलतानोवने 10-1 असे हरवले. 91 किलो गटात मनोजकुमारच्या डोक्याला दुखापत झाली. त्यावेळी दुसऱ्या राऊंडमध्ये कझाकस्तानचा अस्कर कुपेनशेयेव हा आघाडीवर होता. मात्र पंचांना ही लढत थांबवणे भाग पडले. 91 किलोवरील गटात रजतला इराणच्या फरहादकडून 13-3 असा पराभव पत्करावा लागला.
फोटो गॅलरी