औषध विक्रेते आणि वैद्यकीय प्रतिनिधींचा दि. 7 एप्रिल रोजी लाक्षणिक संपावर जाण्याचा इशारा
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 01:55 AM (IST)
सातारा, दि. 9 ः शासनाकडे अनेकवेळा मागण्या करूनही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी औषध विक्रेते आणि वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास दि. 7 एप्रिल रोजी लाक्षणिक संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात औषध विक्रेते आणि वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेतर्फे पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 1948 च्या कायद्यानुसार प्रत्येकाला 8 तास कामाची तरतूद असताना औषध विक्रेते आणि वैद्यकीय प्रतिनिधी कोणताही मोबदला न घेता 12 ते 14 तास काम करत आहेत. त्यामुळे इतरांप्रमाणे औषध विक्रेते आणि वैद्यकीय प्रतिनिधींचेही कामाचे 8 तासच निश्चित करावेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 8 तासांचा कार्यकाल निश्चित होण्यासाठीची कागदपत्रे शासनाकडे दिलेली असताना अद्याप शासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. मूळ पगार 10 हजार + 5 टक्के घरभाडे भत्ता मिळावा, एमएसएमआरए संघटनेमार्फत दिलेली ओळखपत्रे ही आयडेंटी कार्ड म्हणून घोषित करावीत.
वरील सर्व मागण्यांची पूर्तता न झाल्यास दि. 7 एप्रिल रोजी शासनाविरूद्ध लाक्षणिक संप करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे औषध विक्रेते आणि वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.