Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आंदोलनाची खिल्ली उडवाल तर तीव्र आंदोलन छेडू : गृहमंत्र्यांना महालक्ष्मीच्या भाविकांचा इशारा
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 01:22 AM (IST)
Tags: local
सातारा, दि. 9 :  26 नोव्हेंबर 2008 साली मुंबई येथे झालेला अतिरेकी हल्ला आणि पुणे येथील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे आपण महाराष्ट्राचे कर्तबगार गृहमंत्री आहात हे सिध्द झाले आहे. या घटनांचा जाब गृहखात्याला विचारायचे सोडून लोकशाही व कायद्याच्या चौकटीत राहून केलेल्या आंदोलनाची आपण खिल्ली उडवत असाल तर महालक्ष्मी देवीचे हजारो भाविक यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा ग्रामस्थ व महालक्ष्मी भक्तांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कोण दिल्लीला जातो, कोण बारामतीला जातो आणि कोण मातोश्रीवर जातो, त्याचे आम्हाला काही देणे-घेणे नाही. आम्ही मात्र भुईंजच्या श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जातो, असे स्पष्ट करुन निवेदनात पुढे म्हटले आहे की, भुईंज येथील श्री दुर्गादेवी मंदिरातून दोन महिन्यांपूर्वी देवीचे मंगळसूत्र चोरीस गेले होते. त्याची रितसर फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर दि. 15 फेब्रुवारी 2010 रोजी भरदिवसा श्री महालक्ष्मी देवळातील कुलूप-कोयंडा तोडून देवीचा देवळातील सुमारे 100 वर्षे पुरातन चांदीचा मुखवटा व सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. त्यावेळी लोकांच्या भावनांचा उद्रेक होवून शेकडो ग्रामस्थांनी भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मात्र आश्वासन देवूनही ही चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना अपयश आले. त्यामुळे दि. 7 मार्च पूर्वी चोरीचा तपास न लागल्यास लोकशाही पध्दतीने गृहखात्याचा निषेध नोंदवणार असल्याचे लेखी पत्र ग्रामस्थांनी  दिले होते. त्याची लेखी पोहोच आमच्याकडे आहे. गृहमंत्र्यांनी आमच्या गावात आल्यानंतर या चोरीच्या घटनेविषयी दोन शब्द तरी बोलायला हवे होते. मात्र तसे न करता गृहखात्याची अब्रू झाकण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या भावनांची आपण खिल्ली उडवली. याउलट गृहमंत्री आमच्याच गावात येणार असल्याने नैतिकता म्हणून मोर्चाचे नियोजन आम्ही स्थगित केले.
त्याचीही दखल आपण घेतली नाही. त्यामुळे आमच्या देवीचा अपमान झाल्याची भावना आम्हा भाविकांत निर्माण झाली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: