Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

जलद भरती प्रक्रिया हाच पर्याय
- भास्करराव मिसर,
Wednesday, March 10, 2010 AT 09:55 PM (IST)
Tags: stambha lekh
पोलीस भरतीसाठी लाखोंच्या संख्येने येणारे तरुण आणि त्यांच्यावर नियंत्रण न ठेवता आल्याने होणारा सावळागोंधळ ही नित्याची बाब झाली आहे. मात्र, त्यातून घडणाऱ्या दुर्घटना चिंताजनक आहेत. मुंबईत अलीकडेच भरती प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळात एकाला जीव गमवावा लागला तर अन्य जखमी झाले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी भरती प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुटसुटीत करणे हितावह ठरेल.
खासगीकरणाच्या धोरणामुळे औद्योगिकीकरणाला चालना मिळत असली तरी नोकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी बेकारी झपाट्याने कमी होत आहे, असे सांगितले जाते. वास्तवात मात्र बेकारीची समस्या अजूनही मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे दिसते. याची झलक यापूर्वी वेळोवेळी झालेल्या पोलीस भरतीच्या वेळी पहायला मिळाली. या भरतीसाठी लाखोंच्या संख्येने आलेल्या तरुणांना आवर घालणे कठीण होते आणि त्यातून गोंधळ निर्माण होतो. मग चेंगराचेंगरी, लाठीमार यासारख्या घटना घडतात. मुंबईतील कालिना येथील मैदानावर पोलीस भरतीचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका तरुणाचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले. अशाच प्रकारच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी यापूर्वीही घडल्या आहेत. पोलीस भरतीदरम्यान नेहमीच होणाऱ्या अशा गोंधळाचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
इच्छुकांची वाढती संख्या हे अशा भरतीप्रसंगी होणाऱ्या गर्दीपुढील खरे आव्हान आहे. पूर्वी पोलीस भरतीसाठी तरुण इतक्या मोठ्या संख्येने येत नसत. पोलीस किंवा सैन्य दलाचा विचार शेवटचा पर्याय म्हणून केला जात असे. महिला तर पूर्वी या भरतीकडे फिरकतही नव्हत्या. आता हे चित्र बरेच बदलले आहे. केवळ तरुणच नव्हे तर तरुणीही अशा भरतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसते. अर्थात वाढती बेकारी हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या भरतीसाठी विशिष्ट प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्यात विविध बाबींचा समावेश आहे. भरतीसाठी आलेल्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता ही प्रक्रिया पूर्ण होण्यास बराच वेळ लागणे स्वाभाविक आहे. त्याच वेळी या भरतीत आपली निवड होईल का नाही, अशी चिंता अनेकांना भेडसावत असते. त्यामुळे नाही म्हटले तरी त्यांच्यावर ताण असतोच. शिवाय नोकरीसाठी घरच्यांचा दबावही असतो. भरतीच्या प्रक्रियेत ताटकळत रहावे लागल्याने या सर्व ताणात भर पडते. त्यातून गोंधळ वाढू लागतो आणि नियंत्रण ठेवणे अवघड होते. परिणामी, असे दुर्दैवी प्रसंग निर्माण होतात.
गर्दीवर नियंत्रण
या पार्श्वभूमीवर भरतीसाठी येणाऱ्यांच्या संख्येवर योग्य नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी ठरत असेल तर सामाजिक संस्थांची किंवा अन्य संघटनांची मदत घेता येईल. त्यांच्या मदतीने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांना मदत करणे, भरतीसाठी एक-दोन दिवसांचा कालावधी लागणार असला तर आलेल्या तरुणांची निवास तसेच आहाराची योग्य व्यवस्था होते का हे पाहणे, त्या संदर्भात शक्य ती मदत करणे अशा स्वरूपाची कामे करवून घेता येतील. त्याद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवता येईलच शिवाय अशा दुर्घटनाही टाळता येतील.
काही वर्षांपूर्वी नोकर भरतीसाठी सेवायोजना कार्यालयाकडून संबंधितांना पत्रे पाठवण्यात येत असत. त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्यांच्या संख्येचा अगोदरच अंदाज येत असे. शिवाय सेवायोजन कार्यालयाकडून उमेदवारांना वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्याने एकाच दिवशी होणारी गर्दी टाळली जायची. पोलीस भरतीची प्रक्रियाही याच पध्दतीने पार पाडली जायला हवी. मात्र, अलीकडे बहुतांश वेळा थेट स्वरुपात भरती केली जाते. त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्यांचा अंदाज येत नाही. परिणामी त्यांची आगाऊ योग्य व्यवस्था लावणे कठीण होते. त्यातून मग गोंधळ निर्माण होतो आणि त्याची परिणती दुर्दैवी घटनांमध्ये होते. त्यामुळे पोलीस भरतीसाठी सेवायोजन कार्यालयाची मदत घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यावर विचार केला जावा अशी अपेक्षा आहे. शिवाय भरतीसाठी आलेल्यांची संख्या लक्षात घेता सर्वांना न्याय देणे अवघड आहे, हे वास्तवही लक्षात घ्यायला हवे. कारण प्रत्यक्षात जागांची संख्या  उमेदवारांच्या संख्येच्या मानाने बरीच कमी असते. राज्यभरात विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या भरतीसाठी लाखोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते. जागांची संख्या मात्र बरीच कमी होती. अर्थात कोणत्याही पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा आणणे कठीण आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत योग्य ते बदल करणे किंवा ती अधिक सुटसुटीत करणे या पर्यायांचा विचार आवश्यक ठरतो.
इंटरनेटचा वापर
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस भरतीसाठी शारीरिक तपासणी किंवा अन्य कौशल्ये गरजेची ठरतात. त्यामुळे अशा भरतीसाठी संबंधित उमेदवारांनी समक्ष हजर राहणे गरजेचे ठरते. अलीकडे कंपन्यांमध्ये अन्य ठिकाणी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यात इंटरनेटच्या माध्यमातून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जातात. शिवाय त्यांना लेखी परीक्षेला किंवा मुलाखतीला बोलवण्यासाठीही इंटरनेटचा आधार घेतला जातो. त्यामुळे भरतीसाठी प्रत्यक्ष हजर असणाऱ्यांच्या गर्दीवर आपोआप नियंत्रण ठेवता येते. मात्र, पोलीस भरतीसाठी अशी प्रक्रिया राबवणे शक्य नाही. त्यामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष हजर रहावे लागते. याचा विचार करून पोलीस भरती प्रक्रियेत इंटरनेटचा कसा आणि कितपत वापर करता येईल किंवा त्या दृष्टीने या प्रक्रियेत काय बदल करता येतील, यावरही विचार व्हायला हवा.
या साऱ्या बाबींचा विचार करून पावले टाकल्यास भरतीच्या वेळी निर्माण होणारा गोंधळ टाळता येईल. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या भरतीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांची संख्या मोठी असते. भरती असणाऱ्या शहरात त्यांचे कोणी नातलग, परिचित असतीलच असे नाही. अशा वेळी किमान त्यांच्या निवासाची योग्य व्यवस्था व्हायला हवी. दोन-तीन दिवस उघड्यावर रहावे लागल्यास त्यांचे मनस्वास्थ्य बिघडणे साहजिक आहे. त्यातून रांगेत तासन्‌तास तिष्ठत बसावे लागत असल्याने त्यांचा राग अनावर होतो आणि त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड जाते. एकाच वेळी राज्यातील विविध शहरात भरतीची प्रक्रिया राबवणे हा यावरील उत्तम उपाय ठरेल. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येची आपोआप विभागणी होईल. आणि मर्यादित संख्येवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. शिवाय संख्या कमी असल्याने भरतीची प्रक्रियाही फार काळ लांबणार नाही. आजकालच्या गतिमान जीवनशैलीत तासन्‌तास थांबण्यास कोणास वेळ नसतो किंवा तशी त्यांची मानसिकताही नसते. हे लक्षात घेऊन पोलीस भरतीची प्रक्रिया अधिक गतिमान करणे हाच एक समर्थ पर्याय ठरू शकेल असे वाटते.
महाराष्ट्रात पोलिसांच्या रिकाम्या असलेल्या पन्नास हजार जागांसाठी एकाच वेळी भरती सुरु करणे हेही अयोग्य आहे. जागा रिकाम्या होतील त्यानुसार दरवर्षीच ही भरती प्रक्रिया अंमलात आणल्यास हजार जागांसाठी तीस हजार उमेदवार अशी गर्दी होणार नाही. दररोज हजार-पंधराशे उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावल्यास हा गोंधळ टाळता येणे सहज शक्य आहे. सध्या प्रचंड बेकारी असल्यामुळे उच्च पदवीधरही पोलिसांच्या जागांसाठी अर्ज करतात, ही बाबही
गंभीर ठरते.
- भास्करराव मिसर,
माजी पोलीस महासंचालक
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: