Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वृत्तवाहिन्यांची गरज नाही : ललित मोदी
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 10:30 PM (IST)
Tags: sports

मुंबई, दि. 10 (वृत्तसंस्था) : वृत्तवाहिन्यांनी केलेली मॅच फुटेजची मागणी फेटाळून लावत आयपीएलचे आयुक्त ललित मोदी यांनी आयपीएलला वृत्तवाहिन्यांची गरज नाही, असे मस्तवाल उत्तर नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशन (एनबीए) ला दिले आहे.
आयपीएलबाबत सध्याच्या पेचप्रसंगाला एनबीएलाच दोषी धरत वृत्तवाहिन्यांच्या आयपीएलवरील बहिष्कारा-मुळे आयपीएलचे अधिकृत प्रक्षेपक सोनी टीव्हीलाच फायदा होईल, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, एनबीएच्या बहिष्कारामुळे सोनी टीव्हीचा टीआरपी निश्चित वाढेल. आम्हाला उच्च रेटिंगची अपेक्षा आहे. जे लोक टीव्ही पाहतात ते सोनी वाहिनीकडे वळतील. ते काही क्षण का होईना या मॅचेस पाहतील.
आम्हाला काळजी करायचे कारण नाही. त्याउलट वृत्त वाहिन्यांनी सकारात्मक पावले उचलली तर ते चांगलेच, पण त्यांनी प्रस्तावित केलेल्या अटींवर नाही. त्यांच्या मागण्या आम्हाला मान्य नाहीत. आयपीएलच्या कार्यकारी परिषदेने घातलेल्या अटींमध्ये फेरफार होणार नाही हे मी त्यांना कळविले आहे.
एनबीएची स्थिती विचित्रच आहे. त्यांनी दिलेल्या कागदपत्रांवर सह्या करुन आम्ही करार केला होता. त्यानंतर कार्यकारी परिषदेची मान्यता घेण्यात आली.
आमची तयारी जोरात आहे. त्यात कोणताही अडथळा नाही. शुभारंभाच्या रात्रीचा जोरदार कार्यक्रम तयार आहे. त्यात लेसर शो आणि फटाक्यांची तुफानी आतषबाजी होणार आहे. एनबीएची केस खूप विचित्र आहे. त्यांनी दोन रात्रींपूर्वी नव्या प्रस्तावावर सह्या केल्या असल्या तरी त्यांचा बहिष्कार सुरूच आहे, असे मोदी यांनी सांगितले.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: