|
|
|
सचिन भारतीय खेळाडूंमधील सर्वोत्कृष्ठ व्यक्तिमत्व
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 01:45 AM (IST)
मुंबई, दि. 9 (वृत्तसंस्था) : विक्रमांचा बादशहा "विक्रमादित्य' सचिन तेंडुलकर हे भारतीय खेळाडूं-मधील सर्वोत्कृष्ठ व्यक्तिमत्व आहे, हे सांगायला आता कोणा ज्योतिषाची गरज उरलेली नाही. पण, स्पोर्टस् इलस्ट्रेटेडने जाहीर केलेल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वांच्या वार्षिक सूचीमध्ये खेळाशी निगडित 50 व्यक्तिमत्वांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे तो अर्थातच, सचिन तेंडुलकर! सचिननंतर आयपीएलचे अध्यक्ष ललित मोदी यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे तर फोर्स इंडियाचे सर्वेसर्वा आणि मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या यांना तिसऱ्या क्रमांकावर पसंती देण्यात आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री आणि आयसीसीचे भावी अध्यक्ष शरद पवार चौथ्या, टिम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पाचव्या आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांना सहाव्या क्रमांकाची पसंती या यादीमध्ये देण्यात आली आहे. भारतीय खेळातील या 50 प्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी काही जणांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सचिन तेंडुलकर, टेनिस स्टार सानिया मिर्झा (यादीत 50 व्या स्थानावर), बीजिंग ऑलिंपिकचा सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा (41 वा), चर्चिल ब्रदर्स संघाचे मालक चर्चिल आलेमाओ (48 वे) आणि डेम्पो स्पोर्टसचे मालक श्रीनिवास डेम्पो (49 वे) उपस्थित होते. तेंडुलकरने याबाबत सांगितले की, मी देशासाठी मनापासून खेळू इच्छित होतो. त्यानुसार सध्या मी आपल्या स्वप्नात जगतो आहे तसेच मी दोन-तीन पिढ्यांबरोबर खेळतो आहे. मी संघाचा खास सदस्य बनू इच्छित होतो आणि तसे घडले आहे. तो म्हणाला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी केल्यानंतर मला आजपर्यत शुभेच्छांचे संदेश येत आहेत. ही द्विशतकी खेळी करण्यासाठी मला अनेक वर्षे लागली आणि आता त्यानंतर येणाऱ्या शुभेच्छा संदेशांमुळे मी आणखीनच प्रेरित झालो आहे. ऑलिंपिक खेळातील पहिले सुवर्णपदक मिळवल्यानंतर तू इतका कसा शांत आणि एकाग्र राहू शकतो, हे विचारल्यावर बिंद्राने सांगितले की, मी यासाठी 16 वर्षे प्रतीक्षा केली आहे. मनगटाला दुखापत झाली असली तरी ही दुखापत आता बरी होत असून मी लवकरच राष्ट्रमंडल खेळांच्या तयारीला लागणार असल्याची प्रतिक्रिया सानिया मिर्झा हिने दिली. माझी दुखापत आता पूर्णपणे बरी होण्याच्या मार्गावर असून येत्या काही आठवड्यात मी पुन्हा टेनिसमध्ये आगमन करणार आहे. यावेळी आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सर्वेसर्वा प्रीती झिंटाला क्रिकेटमधील एक चेंडू भेट देण्यात आला. प्रीतीला या यादीमध्ये 23 व्या स्थानावर पसंती देण्यात आली आहे.
फोटो गॅलरी
|