उत्तर प्रदेश
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 12:52 AM (IST)
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम आणि स्वत:चे शेकडो पुतळे, उद्याने उभारण्यावर पाच हजार कोटी रुपयांचा निधी उधळणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी आता, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. गेल्या आठवड्यात प्रतापगड जिल्ह्यातल्या मानगडमध्ये झालेल्या कृपालू महाराजांच्या आश्रमातील चेंगराचेंगरीत 63 जणांचे बळी गेले. शंभर स्त्री-पुरुष गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत मरण पावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यायलाही सरकारकडे काहीही पैसे नाहीत, असे मायावतींनी बेशरमपणे जाहीरपणे सांगून टाकले आहे. कोणत्याही राज्यात अशी दुर्घटना घडते तेव्हा राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत दिली जाते. पण, आपण गरीबांच्या तारणहार आहोत, असा डंका पिटणाऱ्या मायावतींच्याकडे आपत्तीत सापडलेल्या मदत करायलाही पैसा नाही.
ही दुर्घटना परमेश्वरी इच्छेमुळेच घडली, तिला परमेश्वरच जबाबदार आहे, व्यवस्थापनाचा काहीच संबंध नाही, असा पवित्रा घेत, कृपालू महाराजांच्या आश्रमाच्या व्यवस्थापकाने हात वर केले आहेत. परिणामी या दुर्घटनेतील पीडितांना काहीही आर्थिक मदत मिळालेली नाही. चार वर्षांपूर्वी सत्ता मिळताच, मायावतींनी विकासकामांपेक्षा आपली आणि काशीरामांची भव्य दिव्य स्मारके उभारायला अग्रक्रम दिला. राजधानी लखनौमध्ये दोन हजार कोटी रुपये खर्च करून आपले आणि काशीरामांचे शेकडो पुतळे उभारले. वाराणसी, अलाहाबाद, नोएडा, या शहरातही त्यांनी हजारो कोटी रुपये खर्चून धडाक्याने आपल्या आणि काशीरामांच्या पुतळ्यांची उद्याने उभारायचा धडाका लावला. सर्वोच्च न्यायालयाने या उद्यानातल्या पुतळ्यांच्या उभारणीला आणि बांधकामाला स्थगिती दिली, पण उभारलेल्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी मायावतींनी विशेष पोलीस दल स्थापन करायचा आदेश दिला आहे. या नव्या पुतळे सुरक्षा दलासाठी वार्षिक वीस कोटी रुपयांचा खर्च येईल. गरीबांच्या समस्या सोडवायसाठी मायावतींच्या सरकारकडे पैसा नाही.
बुंदेलखंड विभागातल्या सहा जिल्ह्यात गेली तीन वर्षे दुष्काळ असल्यामुळे, तिथल्या लाखो लोकांनी केवळ जगण्यासाठी स्थलांतर केले आहे. गावोगाव पिण्यासाठी पाणी नाही. लोकांनी राज्य सरकारकडे मागण्या करुनही काही उपयोग झाला नाही. केंद्र सरकारनेच दुष्काळ निवारणासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी वारंवार मायावतींनी केली. केंद्र सरकारने काही निधीही दिला. पण, तो अत्यंत अपुरा असल्याची मायावतींची तक्रार आहे.
रस्ते, पिण्याचे पाणी, दुष्काळ निवारण अशा मूलभूत समस्यांसाठी पैसा नाही, असे सांगणाऱ्या मायावतींनी राज्याच्या तिजोरीवर एक लाख कोटी रुपयांच्यापेक्षा अधिक कर्जाचा बोजा करून ठेवला. वाट्टेल तेवढे कर्ज झाले
तरी चालेल, पण राज्याच्या
सर्व शहरात आणि खेड्यात काशीराम आणि आपले पुतळे उभारलेच पाहिजेत, असा त्यांचा अट्टाहास आहे. रोम जळत असताना, फिडल वाजवत बसलेल्या "निरो'चा वारसा त्या असा चालवित आहेत.