Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

धर्माचे रहस्य
ऐक्य समूह
Tuesday, March 09, 2010 AT 01:18 AM (IST)
Tags: vachnamrut
रोख धर्माचे रहस्य हे आहे, की साऱ्या राष्ट्राचा आत्मा आपलाच आत्मा आहे, असे जाणले पाहिजे. या धर्माचे हे रहस्य ज्या राष्ट्रांमध्ये जाणून अमलात आणले आहे त्यांची उन्नती झाली आहे. ज्या राष्ट्रांमध्ये हे रहस्य नाही, ती अवनत दशेला गेली आहेत. आमच्या देशासंबंधी एक गोष्ट मोठ्या दु:खाने सांगितली पाहिजे. सध्या हॉंगकॉंग येथे शीख लोकांची पलटण आहे. त्यापूर्वी तेथे पठाणांची फौज होती. हॉंगकॉंगमध्ये शीख शिपायांना प्रत्येकी अदमासे एक पौंड (15 रुपये) पगार मिळतो व दुसऱ्या शिपायांना त्याहून कमी म्हणजे महिना अदमासे दहा रुपये मिळतात. पण हॉंगकॉंग मध्ये पठाणांना गोऱ्यांबरोबर प्रत्येकी दोन तीन पौंड मिळत असत. चिनी युध्दाच्या वेळी जेव्हा शीख लोक येथे गेले, तेव्हा पठाणांना आपल्याहून तिप्पट पगार मिळतो हे त्यांना खपले नाही व त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटला अर्ज पाठविला, की पठाणांना जे तीन तीन पौंड मिळतात, ते त्यांच्या जागी आमचा 2/3 पौंड पगार एक पौंड करून आमच्या लोकांची भरती काय म्हणून करीत नाही? हा अर्ज होत आणि फॉरिन गव्हर्नमेंटमध्ये विचाराकरिता फिरत असता पठाणांना विचारण्यात आले, की तीन पौंडाच्या जागी एक पौंड पगार घेणे तुम्हाला पसंत आहे काय? एका देखील पठाणाने हे कबूल केले नाही आणि पठाणांची सर्व फौजची फौज कमी करण्यात आली. सर्व पठाण बेरोजगार झाले. भोळ्या शिखांनी हे पाहिले नाही, की काही झाले तरी हे पठाण आपल्याच देशाचे आहेत. यांच्या पोटावर आपण पाय आणले याबद्दल त्या शिखांना काहीच दु:ख वाटले नाही. आपल्या बंधूंचा गळा कापताना त्यांना काही दया आली नाही. अरेरे! कोण हा मत्सर आणि काय देशातील फूट! ते भुकेने मरणारे पठाण रोजगार शोधत शोधत आफ्रिकेत गेले आणि सोमाली लॅंडमधील मुल्लाच्या नोकरीत राहून याच शिखांशी ते लढले. या लढाईमध्ये लढण्यावाचून हवापाण्याच्या त्रासामुळे वगैरे शीख लोकांचे इतके हाल झाले, की शिव शिव! त्यांची तोंडे वाकडी झाली, माना मोडल्या, शरीरे सुकून गेली, तापाने वगैरे तेे अर्धमेले झाले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: