आरक्षणाने प्रश्न सुटणार का ?
PTI ---
Tuesday, March 09, 2010 AT 01:15 AM (IST)
मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : संसदेत महिला आरक्षण संमत करण्यासाठी गोंधळ सुरू आहे; पण महिलांना केवळ आरक्षण देऊन त्यांचे प्रश्र्न सुटणार आहेत का? महिलांवरील अत्याचार, बलात्कार आणि हल्ले सुरूच आहेत. त्यांना संरक्षण कोण देणार? असा सवाल शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला.
राजकारणातल्या राखीव जागांपेक्षा महिलांना खरी गरज आहे ती महागाईपासून संरक्षणाची. त्यांच्यावर होणाऱ्या शारीरिक अत्याचारापासून रक्षणाची. मात्र, या सगळ्याच पातळ्यांवर सरकार अपयशी आहे. महिला विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा दिला असला तरी 33 टक्के मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्यापेक्षा राजकीय पक्षांवर 33 टक्के महिलांना उमेदवारी देण्याचे बंधन घालावे, अशी भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट
केली आहे.
राहुल गांधी आणि शाहरूख खानच्या संरक्षणासाठी हजारो पोलीस रस्त्यावर उतरवले होते. त्याच पोलिसांनी 9 वर्षांच्या अंजली जैयस्वाल या कोवळ्या मुलीचे संरक्षण का केले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
कुर्ला-नेहरूनगर येथील पोलीस वसाहतीच्या गच्चीवरच अंजलीचा मृतदेह आढळला होता. पोलीस वसाहतीतच ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा पोलीस कुठे होते? मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे आदेश पाळत ते शाहरूख खानच्या बंगल्याचे संरक्षण करण्यासाठी थांबले आहेत का? चित्रपटाच्या निर्जीव पडद्याच्या संरक्षणासाठी हजारो पोलीस ठेवले जातात. पण, एका कोवळ्या मुलीचा जीव जातो. त्याचे राज्यकर्त्यांना दु:ख नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.