|
|
|
हेमलताताई पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजात आगळावेगळा ठसा निर्माण केला
ऐक्य समूह
Tuesday, March 09, 2010 AT 01:58 AM (IST)
सातारा, दि. 8 ः प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हेमलताताई पाटील यांनी समाजात आपल्या कार्याचा आगळावेगळा ठसा निर्माण केला होता. त्यांचे व्यक्तिमत्व संस्कारक्षम होते, असे उद्गार राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी काढले. सदरबझार येथील श्री. छ. सुमित्राराजे भोसले निर्मल वॉर्ड स्पर्धांतर्गत स्वच्छ सुंदर वॉर्ड क्र. 7 साठी नगरसेविका सौ.अनुसया गायकवाड यांना मिळालेल्या निधीतून विकसित केलेल्या उद्यानाचे हेमलताताई पाटील उद्यान असे नामकरण करण्यात आले असून हा नामकरण व लोकार्पण सोहळा सोमवारी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ऍड. धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, अशोक मोने, सौ. रंजना रावत, सौ. अनुसया गायकवाड, उपनगराध्यक्षा सौ.सुजाता राजेमहाडिक, संभाजीराव पाटणे, जाल कूपर, जयवंत गुजर, प्रा.डॉ.सौ. विमलाताई पाटील, किरण माने आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. विमलाताई पाटील म्हणाल्या, हेमलताताई पाटील यांचे आणि माझे नाते मायलेकीसारखे होते. त्यांचे फूल, फुलपाखरे आणि लहान मुले हे आवडते विषय होते. त्या फुलपाखरासारखे जीवनही जगल्या. त्यांनी जीवनाला आदर्श वळण घालून दिले होते. त्यांच्यामुळेच आमचे शिक्षण झाले. त्यांचे आचारविचार, वागणे हे सर्व काही खानदानी होते. त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले होते. उपेक्षित महिलांना त्यांनी न्याय मिळवून दिला होता. झोपडपट्टीत राहणाऱ्या उपेक्षितांना घर मिळावे ही त्यांची इच्छा होती. त्यांच्यामुळेच महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्हा अग्रेसर राहून आज स्काऊट गाईड चळवळीत सातारा पॅटर्न झाला आहे. खांद्यावर लाल झेंडा घेऊन त्या मोर्चाच्या नेहमीच अग्रभागी असत. वेळप्रसंगी संघर्षामधून सभ्यपणा जपून त्यांनी राजकारण आणि समाजकारण केले. यावेळी नगरसेविका सौ.अनुसया गायकवाड, कॉ.किरण माने, संभाजीराव पाटणे यांनी मनोगते व्यक्त केली.
फोटो गॅलरी
|