Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

एन. डी. कडाडले
ऐक्य समूह
Tuesday, March 09, 2010 AT 12:52 AM (IST)
Tags: vishesh lekh
शेतकरी कामगार पक्षाच्या सोळाव्या राज्य अधिवेशनात डॉ. एन. डी. पाटील यांनी अत्यंत आक्रमक शैलीत, अखंड महाराष्ट्राची फाळणी करायसाठी उतावळ्या झालेल्या नतद्रष्ट विदर्भवाल्यांना फटकारले, ते योग्य झाले. वयाच्या 83 व्या वर्षीही हा वृध्द युवा  कर्नाटकच्या जोखडात अडकून पडलेल्या पंचवीस लाख मराठी भाषिकांची मुक्तता करायसाठी झुंंजतो आहे. सेनापती बापट, एस. एम. जोशी, जयंतराव टिळक, मधु दंडवते हे सीमा लढ्यातले नेते काळाच्या पडद्याआड गेले. सीमा भागातली मराठी भाषिक जनता पोरकी झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या सीमावासियांना तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, अशी ग्वाही दिली. डॉ. एन. डी. पाटील तर   सीमावासियांच्या लढ्यात गेली पन्नास वर्षे आघाडीवर आहेत. बेळगाव-कारवार हा मुळचा मराठी मुलुख! तो महाराष्ट्रातच सामील व्हायला हवा. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा, कर्नाटकात डांबला गेलेला हा मराठी भाग, महाराष्ट्रात विलीन झाला नाही. हा सीमा भाग महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने आंदोलन करणे आवश्यक आहे. पण केवळ स्वार्थासाठी विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्यांना, विदर्भातल्या जनतेनेही थारा दिलेला नाही. त्यांना वारंवार पायदळी तुडवले आहे. त्याची जाणीव या उपटसुंभ नेत्यांना नाही. अखंड महाराष्ट्राचा घात करायला निघालेल्या या मूठभरांना वैदर्भीय जनता धडा शिकविल. विदर्भाची मागणी कराल, तर याद राखा, अशा शब्दात डॉ. एन. डी. पाटील स्वतंत्र विदर्भवाद्यांवर कडाडले. त्यांचा सात्विक संताप अनाठायी नाही. संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आणि राजकीय पक्ष सीमावासियांच्या पाठीशी संघटितपणे उभे राहिले असते तर, कर्नाटकच्या जुलमी सरकारला मराठी भाषिकांचा छळ करायचे धाडसही झाले नसते. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. काही राजकीय पक्षांनीच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. वैदर्भीय जनतेची इच्छा असल्यास, ते राज्य स्वतंत्र व्हावे, असा धूर्त पवित्रा राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला, तर भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेसने या स्वतंत्र राज्याच्या मागणीला पाठिंबा दिला. आपण म्हणजे वैदर्भीय जनतेचे नेते अशा थाटात विलास मुत्तेमवार यांच्यासह पाच-दहा जणांची टोळी, स्वतंत्र विदर्भाचे बावटे नव्याने नाचवायला लागली. 105 हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. त्या हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव विदर्भवाद्यांना नाही. आपल्याला सत्तेची पदे मिळावित, या संकुचित-स्वार्थी विचारानेच या लोकांनी विदर्भ राज्याची मागणी पुढे रेटायचा खटाटोप सुरू केला. त्यांच्या या मागणीला वैदर्भीय जनतेने पाठिंंबा दिलेला नाहीच. विदर्भाचा विकास आणि वैदर्भीय जनतेचे हित हे फक्त संयुक्त महाराष्ट्रात राहिल्यानेच आहे, याची जाणीव त्या स्वाभिमानी जनतेला आहे. नेमके त्यावरच डॉ. पाटील यांनी बोट ठेवले. स्वतंत्र विदर्भासाठी उठसूठ पत्रके काढणाऱ्या या पुढाऱ्यांच्या टोळीला, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी मात्र काही देणे-घेणे नाही. त्यांच्या या दुटप्पी आणि ढोंगी राजकारणावर डॉ. पाटील यांनी जोरदार हल्ला चढवून, त्यांना त्यांचे राजकीय स्थान दाखवून दिले आहे. त्यांच्या या महाराष्ट्र हिताच्या भूमिकेला विदर्भासह महाराष्ट्रातील जनतेचाही पाठिंबा आहेच!
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: