मुंबईत पोलीस भरतीत चेंगराचेंगरी
PTI ---
Tuesday, March 09, 2010 AT 01:30 AM (IST)
मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : मुंबईतील कलिना मैदानावर सोमवारी पोलीस भरतीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन भरतीसाठी आलेल्या रमेश आम्रे या युवकाचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले. दरम्यान, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाला असेल तर कारवाई केली जाईल असे सांगितले.
मुंबईतील 3 हजार 600 रिक्त जागांसाठी सोमवारी मुंबईतील पाच ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू झाली. वरळी, दादर-नायगाव, अंधेरीतील मरोळ, मरीन ड्राईव्ह आणि कलिना येथील कोले कल्याण मैदानात पोलीस भरतीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार असल्याने रविवारी रात्रीपासूनच हजारो युवकांनी या भरती केंद्राच्या बाहेर रांगा लावल्या होत्या. कलिना येथे जवळपास 10 हजार तरुण रात्रीपासूनच रांगेत उभे होते. सकाळी 6 वाजता मैदानाचे प्रवेशद्वार उघडल्यानंतर सर्व उमेदवारांनी एकाचवेळी आत शिरण्यासाठी गर्दी केली. प्रत्येकाला दुपारी 12 च्या आत अर्ज भरण्याची घाई झाली होती. त्यामुळे आपला अर्ज लवकर सादर करण्यासाठी उमेदवार एकेमकांना ढकलू लागले. त्यानंतर झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या चेंगराचेंगरीत काही उमेदवार तेथे असलेल्या नाल्यात पडले. नगर जिल्ह्यातील लिंगदेव (ता. अकोला) या गावचा रमेश गोपीनाथ आम्रे हा तरुण मृत्युमुखी पडला. तर निलेश चौधरी (नाशिक), विनायक चौधरी (कल्याण), किरण मल्हार (शहापूर) हे जखमी झाले.
त्यांना सांताक्रूझच्या व्ही. एन.देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमी झालेल्या अमोल जाधव, दिलीप राठोड, विकी जाधव, विनायक चव्हाण, दिलीप खरात, रूपेश चौधरी, प्रसाद सूर्यवंशी, गणेश वाघ आदी 8 जणांना औषधोपचार करुन घरी सोडून देेण्यात आले.
रात्रभर गर्दीत उभे राहून कंटाळलेल्या उमेदवार तरुणांची अर्ज सादर करण्यासाठी चढाओढ झाली. त्यातूनच पोलिसांनी भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कलिना ग्राऊंडमध्ये उभ्या केलेल्या बॅरिकेट्ची पर्वा न करता अनेक युवकांनी उड्या मारल्या. त्यात एकजण मरण पावला. अन्य तरूण जखमी झाले. चेंगराचेंगरीनंतर भरती प्रक्रिया काही काळ थांबविण्यात आली होती. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
जखमी झालेल्या दीपक राठोड या युवकाने मात्र पोलिसांनी व्यवस्थित गर्दी नियंत्रित करून विद्यार्थ्यांना रांगेने आत सोडले असते तर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली नसती, असा आरोप केला आहे.
या घटनेनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या चेंगराचेंगरी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. ही दुर्घटना का घडली? यात कोणी हलगर्जीपणा केला आहे का? याचा अहवाल तीन दिवसात मागवण्यात येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान, वरळी पोलीस कॅम्प येथे कुंपणावरून मैदानात उडी मारून प्रवेश करणाऱ्या महिला उमेदवारांना पोलिसांनी सौम्य लाठीमार करून बाहेर काढले आणि त्यानंतर तेथील भरती प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. तसेच पोलीस भरतीसाठी मरीन ड्राईव्ह येथे पोलीस शिपाई पदासाठीचा अर्ज सादर करून नाशिकला परतणाऱ्या विनायक सानप हा उमेदवार मरीन ड्राईव्ह रेल्वेस्थानकाजवळील कठड्यावरून उडी मारताना जखमी झाला. त्याला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.