"जोडी तुझी माझी'तील नृत्याविष्काराने रसिक श्रोते मंत्रमुग्ध
ऐक्य समूह
Tuesday, March 09, 2010 AT 01:06 AM (IST)
सातारा, दि. 8 ः "बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभलं का...बाई मी पतंग उडवीत होते...भीगे होटं तेरे...एक लडकी भीगी भागी सी...' या हिंदी-मराठी गीतांच्या तालावर प्रॉपर्टीच्या आधारे "जोडी तुझी माझी' तील कलाकारांनी नृत्याविष्कार करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने साताऱ्यातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विवाहित जोडपी व इतर जोड्यांसाठी "जोडी तुझी माझी' नृत्य स्पर्धा घेण्यात येत असून या स्पर्धेची प्राथमिक चाचणी फेरी दि. 14 फेब्रुवारी रोजी झाली. त्यातून पात्र ठरलेल्या 6 विवाहित जोड्या व इतर जोड्यांची पहिली फेरी रविवारी शाहू कलामंदिर येथे झाली. यामध्ये एकूण 31 जोड्या सहभागी झाल्या होत्या त्यामधून 5 जोड्या वगळण्यात आल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते, नगरसेवक सुनील जाधव, प्रकाश बडेकर यांच्या उपस्थितीत झाले.
"बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभलं का, बाई मी पतंग उडवीत होते, या टोपीखाली दडलंय काय? नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली, जय जय शिवशंकर, बीना पायल के बजे घुंगरू, कमबख्त इश्क हो गया दिल, एक लडकी भीगी भागी सी, गोरी तेरे अंग अंग पे, डफली वाले डफली बजा' घागर, मोबाईल, घुंगरू, टोपी, ओढणी, बॅडमिंटन, गिटार, गॉगल, आरसा इ. वस्तू घेऊन "जोडी तुझी माझी' तील कलाकारांनी नृत्य सादर केले.
या प्रॉपर्टी राऊंडनंतर दि. 14 मार्च रोजी होणाऱ्या दुसऱ्या राऊंडसाठी लोकनृत्य हा विषय देण्यात आला आहे. अंतिम फेरी दि. 28 मार्च रोजी होणार असून त्यामध्ये विवाहितांसाठी लोकनृत्य व इतर जोड्यांसाठी वेस्टर्न डान्स हे विषय देण्यात येणार आहेत. याच दिवशी निकाल जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
या स्पर्धेच्या दि. 7, 14 व 28 मार्चच्या फेऱ्या शाहू कलामंदिर येथे दुपारी 4 पासून सुरू झाल्या आहेत. ही स्पर्धा सर्व रसिकांसाठी खुली असून जास्तीत जास्त रसिकांनी या स्पर्धेस प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.
दि. 28 रोजी अंतिम फेरीचा निकाल जाहीर होऊन त्यामध्ये प्रथम येणाऱ्या विवाहित जोडीसाठी 10 हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय विजेत्यासाठी 7 हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तर तृतीय विजेत्या जोडीसाठी 5 हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असून अशीच बक्षिसे इतर जोड्यांमधील विजेत्या स्पर्धक जोडीलाही देण्यात येणार आहेत.
सूत्रसंचालन सुजित शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधुकर फल्ले, पृथ्वीराज आहेरराव यांनी परिश्रम घेतले.