Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

पिसाळलेले पोलीस
ऐक्य समूह
Monday, March 08, 2010 AT 01:47 AM (IST)
Tags: Vishesh Lekh
 
शांततेच्या मार्गाने न्याय्य हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या वसई-विरारमधल्या, शेकडो निरपराध्यांची डोकी फोडणाऱ्या सैतानी वृत्तीच्या संबंधित पोलीस आणि अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशीच करायला हवी. पोलीस खात्याची खाकी वर्दी अंगावर चढली म्हणजे, लोकांना मरेपर्यंत बदडून काढायचा, गंभीर जखमी करायचा, महिलांची विटंबना करायचा अधिकार पोलीस खात्याला नाही. आपण जनतेचे सेवक आहोत, याचा विसर पडलेल्या पिसाळलेल्या पोलिसांनी विरारमध्ये घातलेला धुमाकूळ, पोलीस खात्याच्या प्रतिमेलाही डांबर फासणारा आहे. वसई-विरार महापालिकेतून 53 गावे आणि वसई नगरपालिकेची हद्द वगळावी या मागणीसाठी गेले वर्षभर सुरू असलेले आंदोलन पोलिसांच्या बळावर चिरडून टाकायचा हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्र सरकारला शोभणारा नाही.
आपली मागणी मान्य व्हावी, यासाठी वसईचे आ. विवेक पंडीत यांनी सरकारला रितसर नोटीस पाठवून बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू असताना, पोलिसांनी त्यांना सक्तीने ताब्यात घेऊन रुग्णालयात डांबायचा कट रचला. शुक्रवारी पंडीत यांना पोलिसांनी सक्तीने ताब्यात घ्यायचा प्रयत्न करताना, वसई जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विरोध करताच, मस्तवाल पोलिसांनी कार्यकर्त्यांना त्यांची हाडे मोडेपर्यंत चोपून काढले. महिलांच्या अंगाशीही निर्लज्जपणे झोंबाझोंबी केली. महिलांची डोकी फोडली. अनेक कार्यकर्त्यांना रक्तबंबाळ केले. हातपाय मोडलेल्या या कार्यकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.
पोलिसांनी अत्याचाराचा कळस केल्यामुळेच वसईत आंदोलनाचा भडका उडाला. पोलिसांवर दगडफेक झाली. पोलिसांनी दिसेल त्याला चोपून तर काढलेच, पण घराघरात घुसून महिलांना आणि पुरुषांनाही बदडून काढले. डोक्यात खून चढलेल्या पोलिसांनी राखीव पोलिसांच्या तुकड्या मदतीला बोलावून वसई परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण लागले ते पोलिसांच्या आततायीपणामुळेच! लोकांना अमानुष मारहाण करायची आणि आंदोलन मोडून काढायचे, ही जबाबदारी काही पोलिसांची नाही. शांतता आणि सुव्यवस्था ठेवायसाठी नेमलेल्या पोलिसांनीच दंगलीला चिथावणी दिली, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. काहीही करून हे आंदोलन मोडून काढायचेच, अशी तयारीच तिथल्या पोलिसांनी केलेली होती. अन्यथा, अग्निशामक दलाच्या बंबातून निदर्शकांवर फवारे, अश्रूधूर आणि राखीव पोलिसांच्या तुकड्या ही सारी जमवाजमव कशासाठी केली होती? पोलिसांनी आपल्या या लाठीमाराचे निर्लज्जपणे समर्थन करावे, ही बाब संतापजनक आहे. दहावीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या मुला-मुलींनाही या सैतानी पोलिसांनी बेदम मारहाण केली. या घटनेची चौकशी करायचे आदेश, आर. आर. पाटील यांनी कोकण विभागाचे महानिरीक्षक परमबीर सिंह यांना दिले असले तरी, तेवढ्याने भागणारे नाही. निरपराध लोकांच्यावर लाठीमार करणाऱ्या पोलिसांना शिक्षा व्हायलाच हवी. अन्यथा, हे पिसाळलेले पोलीस अधिकच अनियंत्रित होतील, हे आर. आर. पाटील यांनी गांभीर्याने लक्षात घ्यायला हवे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: