या चिमण्यांनो...
वासुदेव कुलकर्णी
Saturday, March 06, 2010 AT 12:47 AM (IST)
या चिमण्यांनो परत फिरा रे
घराकडे आपुल्या...
अशी आर्त हाक चिमण्यांना महानगरी मुंबईतल्या पक्षीमित्र आणि पर्यावरणप्रेमींना घालायची वेळ, पर्यावरणाच्या ऱ्हासाने आणि वाढत्या औद्योगीकरणाने आली. एक काळ मुंबई हिरवीगार होती. गिरगाव, पारले, दादर या भागात झाडे होती. तीन चार मजली जुन्या चाळी होत्या. हजारो चिमण्यांची घरटी या चाळीतल्या खोल्यात होती. चाळकरी आणि चिवचिव करणाऱ्या चिमण्यांचे अतूट नाते होते. मुंबईकरांची पहाट चिमण्यांच्या चिवचिवटानेच सुरु होई. चिमण्यांच्या बरोबरच कावळे, पोपट, कबुतरे आणि अन्य पक्ष्यांचे थवेही मुंबईचे वैभव वाढवित होते. गेल्या चाळीस वर्षात मुंबईच्या चाळ संस्कृतीला ग्रहण लागले. हळूहळू चाळी पडल्या. त्या जागांवर वीस पंचवीस मजली सिमेंट कॉंक्रिटच्या इमारती बांधल्या गेल्या. शंभराच्यावर कापड गिरण्या जमीनदोस्त झाल्या. त्या जागांवर मॉल आणि व्यापारी संकुलांच्या इमारती उभ्या राहिल्या. चिमण्या आणि पक्ष्यांचे नैसर्गिक आश्रयस्थान म्हणजे झाडे. ती त्या आधीच संपली होती. चाळी पडल्यामुळे त्यांची चिमणी-चिमणी घरटीही उद्ध्वस्त झाली. बिचाऱ्या चिमण्या निर्वासित झाल्या. त्यांना पुनर्वसनासाठी म्हणजेच घरट्यासाठी सिमेंट कॉंक्रिटच्या जंगलात छोट्या जागाही शिल्लक राहिल्या नाहीत. बघता बघता महानगरी मुंबईतल्या चिमण्यांचे थवे हळूहळू नाहीसे झाले. त्यांचा चिवचिवाट तर दुर्मिळ झाला. रडणाऱ्या बाळाला, "ती बघ चिऊ!' असे बोट करून दाखवायला चिऊ दिसेनाशी झाली. चिमणीच्या आणि कावळ्याच्या घराच्या गोष्टीतली चिऊ आणि काऊ तथाकथित समृध्दीच्या संस्कृतीत हद्दपार झाली. दिसेनाशी झाली. आता पुढच्या पिढ्यांना चिमणी आणि कावळे फक्त चित्रातच दाखवायला लागतील, अशी भीती पर्यावरण आणि पक्षीमित्रांना वाटते आहे. त्यासाठीच त्यांनी संघटितपणे चिऊला सन्मानाने परत बोलवायसाठी, येत्या 20 मार्च रोजी "चिमणीदिन' पाळायचे ठरवले. चिऊ हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्यामुळे, तिला तिच्या हक्काचे घर मिळवून द्यायलाच हवे, यासाठी बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि पक्षीमित्र संघटनांनी, पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी मुंबईत आता "चिऊ वाचवा' जनजागरण मोहीम सुरु केली आहे. शाळा, महाविद्यालयातून आणि घराघरातून या स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते, आपल्या वसाहतीत चिऊसाठी नैसर्गिक घरटी बांधा, ती बांधायसाठी अनुरुप व्यवस्था करा, असे कळकळीचे आवाहनही करत आहेत.
निसर्गप्रेमींच्या या नव्या मोहिमेला, अमेरिकेतल्या कॉर्नेल लॅब ऑफ आँथॉलॉजी, फ्रान्समधल्या इको सेस ऍक्शन फौंडेशन आणि इंग्लंड मधल्या ऍव्हॉन वाईल्ड लाईफ ट्रस्ट या आंतरराष्ट्रीय संस्थांचेही सहकार्य मिळाले आहे. अमेरिकेतल्या टाइम साप्ताहिकाने 2008 मध्ये "हिरोज ऑफ एनव्हॉयर्मेंट' या सन्मानाने गौरवलेले नाशिकचे मोहंमद दिलावर, याने मनुष्यनिर्मित धोक्यामुळेच मुंबईतल्या चिमण्या निघून गेल्याचे सांगितले. सिमेंट कॉंक्रिटचे जंगल, मोबाईल फोनचे टॉवर्स, प्रदूषणामुळे हजारो चिमण्या मरून गेल्या, असेही त्यांचे म्हणणे आहे. बेसहारा झालेल्या चिमण्यांना वाचवायसाठी तेव्हाच प्रयत्न व्हायला हवे होते. पण, तसे घडले नाही. मुंबईतून बाहेर गेलेल्या चिमण्या कीटक नाशके फवारलेल्या धान्याचे कण खाऊन पटापट मरून गेल्या. मुंबईत चिमण्या दिसेनाशा झाल्या. आता पुन्हा चिमण्यांना मुंबईत बोलावतानाच, त्यांच्यासाठी विविध भागात घरटीही बांधायची मोहीम संस्थेने सुरु केली. लाकडी फळ्यांची छोटी छोटी घरटी फ्लॅटच्या बाहेर आणि फ्लॅटमध्ये ठेवली जात आहेत. शहरातल्या 300 उद्यानात चिमण्यांसाठी ही छोटी आश्रयगृहे ठेवली जात आहेत. यासाठी येणारा खर्च कार्यकर्त्यांनी उचलला तर काही पक्षी मित्रांनीही त्यांना मदत केली. चिमण्यांना मनुष्यवस्ती आवडते. त्यांचा काही त्रास होत नाही. उलट त्यांच्या चिवचिवाटाने वातावरण जिवंत राहते. त्यासाठीच चिमण्यांना जपा, त्यांना खायला घाला, त्यांना घरटी द्या, असे कळकळीचे आवाहन पक्षीमित्रांनी मुंबईकरांना केले आणि या धावपळीच्या जीवनाला रुळलेल्या मुंबईकरांनीही चिऊताईला तिचा हक्काचा निवारा द्यायसाठी हजारो हात पुढे केले आहेत!