Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

गरिबांची विटंबना
ऐक्य समूह
Saturday, March 06, 2010 AT 12:45 AM (IST)
Tags: editorial

अध्यात्म, परमार्थ आणि धर्माच्या नावाखाली साधू-बुवांच्याकडून गरिबांची सुरू असलेली क्रूर विटंबना थांबायला हवी. दोन वेळच्या अन्नाला महाग असलेल्या गरिबांना सत्‌संग, भजन-कीर्तन, दर्शन सोहळ्यासाठी बोलवायचे, त्यांना जेवणाबरोबरच भेटवस्तूंचे आमिष दाखवायचे आणि आपल्या उदारतेचे प्रदर्शन घडवायचे, ही असली दानशूरतचा गरिबांच्या जीवावर उठते. उत्तर प्रदेशातल्या प्रतापगड जिल्ह्यातल्या कृपालू महाराजांच्या आश्रमात नेमके असेच घडले आहे. कुंडा शहराजवळच्या मानगड गावात पंधरा एकर परिसरात असलेल्या कृपालू महाराजांच्या आश्रमात त्यांच्या पत्नीच्या वर्षश्राध्दानिमित्त परिसरातल्या हजारो स्त्री पुरुषांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. प्रत्येकाला जेवणाबरोबरच तांब्या, ताट आणि वस्त्रेही भेट मिळणार होती. जेवणाच्या आणि भेटवस्तूच्या आमिषाने या परिसरातल्या हजारो गोरगरिबांनी मठात प्रवेश मिळवायसाठी गर्दी केली होती. दुपारी अडीच वाजता सुरु होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमासाठी, सकाळपासूनच स्त्री पुरुषांच्या रांगा आश्रमाच्या प्रवेशद्वारावर लागल्या होत्या. आश्रमात दहा हजारांच्यावर स्त्री पुरुष गेले होते. उरलेल्या पाच हजारांनी आश्रमात प्रवेश मिळवायसाठी प्रवेशद्वारावर गर्दी केलेली असतानाच, आश्रमाचे लोखंडी प्रवेशद्वार भाविकांच्या अंगावर कोसळले. महिला आणि लहान मुले या जड प्रवेशद्वाराच्या वजनाने चेंगरून गेली. प्रवेशद्वार कोसळताच प्रचंड चेंगराचेंगरी झाली. जीव वाचवायसाठी लोक सैरावैरा धावत सुटले. पळापळ करणाऱ्या जमावाने महिला आणि मुलांना पायदळी तुडवल्याने 26 महिला आणि 37 मुलांसह 63 जण ठार झाले. आश्रमाच्या लोखंडी प्रवेशद्वाराबरोबरच सिमेंटचे कठडेही कोसळले. त्या दगडमातीच्या, सिमेंटच्या ढिगाऱ्या-खालीही काही लोक अडकले. गुरुवारी सकाळी झालेल्या या दुर्घटनेतल्या शंभर जखमींना जवळपासच्या मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुग्रास अन्न मिळेल, अशा आशेने आलेल्या गोरगरीब महिलांना, मुलांना अन्न तर  मिळाले नाहीच. पण त्यांच्यावर दु:खाचा डोंगर मात्र कोसळला. गरिबांचे प्राण हे काही सरकार आणि श्रीमंतांना मोलाचे वाटत नसावेत. त्यामुळेच गरिबांच्या नावानेच रोज सकाळपासून संध्याकाळ-पर्यंत गळा काढून रडणाऱ्या मायावतींनी या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींना कोणतीही आर्थिक मदत अद्यापही जाहीर केली नाही. उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी बहुजन समाज पक्षाच्या सरकारचा मंत्रीही घटनास्थळी फिरकला नाही. मायावतींनी या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करायचे आदेश तेवढे तातडीने दिले. जी  मुले आणि महिला या दुर्घटनेचे बळी ठरले, त्यांच्या कुटुंबियांना असे काही घडेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. जेवण आणि भेटवस्तू  मिळवायसाठी सकाळीच पोटात अन्नाचा कण नसताना, उपाशीपोटीच हे हजारो गरीब स्त्री, पुरुष आपल्या मुलाबाळांसह कृपालू महाराजांच्या त्या आश्रमाकडे धाव घेत होते. आश्रमाच्या गैरव्यवस्थापनानेच ही दुर्घटना घडली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आणि तो वास्तवही असावा. कृपालू महाराजांच्या पत्नीच्या श्राध्दासाठी इतक्या प्रचंड संख्येने गोरगरीब येतील, याची कल्पना आपल्याला नव्हती, अशी कबुली राम जानकी मंदिराच्या व्यवस्थापकानेच दिल्यामुळे, जेवणासाठी बोलावलेल्या या गरिबांना भिकाऱ्यापेक्षा जास्त  किंमत हा बुवा आणि त्याचे भगतगण देत नसावेत, हेही स्पष्ट झाले आहे.
दानशूरतेचा बाजार
भोजनासाठी आलेल्या हजारो गोरगरिबांचे अत्यंत शिस्तबध्दपणे स्वागत करून, आश्रमाच्या व्यवस्थापनाने तातडीने जादा आलेल्या लोकांची भोजन आणि
भेटवस्तूंचीही सोय केली असती. पण, या आश्रमात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. लोखंडी प्रवेशद्वारावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. एवढ्या मोठ्या संख्येने लोक येणार हे माहिती असतानाही बंदोबस्तासाठी व्यवस्थापनाने पोलीसही बोलवलेले नव्हते. भर उन्हात बिचारे गोरगरीब घासभर अन्नाच्या आशेने आश्रमात प्रवेश करायसाठी धडपडत होते. त्यातल्याच काहींची ही धडपड अशी शांत झाली. पोलिसांनी आश्रमाच्या व्यवस्थापकावर बेफिकिरीने ही घटना घडल्याबद्दल गुन्हा नोंदवला असला, तरी ज्यांच्या घरचे माणूस गेले, ते नुकसान काही या चौकशीने कधीच भरून येणार नाही. उत्तर प्रदेशातल्या बहुतांश मठ आणि आश्रमात असे वीस पंचवीस हजारांच्या जमावाचे धार्मिक मेळावे आणि सत्‌संगाचे आयोजन केले जाते. आपण अत्यंत दानशूर आहोत, असा आव आणणारे काही श्रीमंत लोक या मेळाव्यात कपडे आणि अन्य भेटवस्तूंचेही दान करतात. कृपालू महाराजांसारखे साधू जनतेकडूनच मिळालेल्या पैशावर दानशूरतेचा आव आणून आपल्या पत्नीच्या वर्षश्राध्दाचेही धार्मिक स्तोम माजवतात. हे धार्मिक गुरु आणि साधूंच्याकडे काही त्यांनी स्वत: मिळवलेली मालमत्ता आणि संपत्ती नाही. धर्माच्या नावाखालीच लोकांना भुरळ पाडून लाखो रुपयांची संपत्ती हे बुवा साधू जमा करतात. मोठमोठे धार्मिक मेळावे घेवून आपल्या मोठेपणाचा डांगोरा पिटतात. भोंदू बुवा-साधूंचे भगतगण आपल्या गुरुच्या आदेशानुसार, त्याच्याच आरत्या ओवाळतात. त्याची भजने गातात. गुरुदेवांच्या कृपेने सर्वांचे कल्याण होईल, असा प्रचार करतात. गेल्या काही वर्षात बुवाबाजी आणि पंथांचे असे धार्मिक मेळावे सुध्दा प्रचाराचे नवे साधन झाले आहे. अत्यंत आधुनिक व्यवस्थापनशास्त्राच्या मदतीने, पंथांचे बुवा आपला गाजावाजा आधुनिक तंत्राने करायला, भक्तांना भाग पाडतात. मोठमोठ्या पोस्टर्सपासून ते उपग्रह वाहिन्यांपर्यंत काही मोठ्या बुवांच्या जाहिरातीसह त्यांच्या कार्याचा डांगोरा पिटला जातो. आपण गोरगरिबांचे तारणहार असल्याचा आव आणत यातले काही बुवा पध्दतशीरपणे अन्नदान सोहळ्यासाठी श्रीमंतांच्याकडून प्रचंड रकमेच्या देणग्या उकळतात. उत्तर प्रदेशात अशा धार्मिक मेळाव्यांचा प्रचार  'भंडारा' म्हणजे महाप्रसादाच्या नावाने केला जातो. बहुतांश बुवा आणि साधू भंडाऱ्याद्वारे आपले शक्तिप्रदर्शन घडवतात. ज्याच्या भंडाऱ्याला अधिक भक्त तो बुवा अधिक लोकप्रिय, असे समाजाला वाटते. ज्या बुवाचे-पंथाचे भक्त अधिक, त्याच्या मठांचा विस्तारही झपाट्याने होतो. एका राज्यात सुरु झालेला बुवाच्या आश्रमाच्या अन्य राज्यात झपाट्याने शाखा सुरु होतात. हे आश्रम आलिशान तर आहेतच, पण भक्तांच्याकडून उकळलेल्या देणग्यांवरच त्यांची उभारणीही झालेली आहे. अध्यात्माच्या या मानसिक रोगाची दरिद्री आणि गरीब माणसाला लवकर लागण होते. नेमकी हीच मानसिकता हेरुन भंडारे घेणाऱ्या बुवांनी अशी गोरगरिबांची विटंबना सुरु केली आहे. धर्माचा आणि मानवतेचा हा घोर अपमान होय!
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: