रणशिंग फुंकणारा
ऐक्य समूह
Friday, March 05, 2010 AT 01:01 AM (IST)
सैन्याच्या अग्रभागी रणशिंगे फुंकणारी काही माणसे असतात. त्यातल्या एकाला शत्रूकडील सैनिकांनी पकडून आपल्या सेनापतीकडे नेले. सेनापतीने त्यास कैदेत टाकण्याचा हुकूम दिला. त्यावर त्या शिंग फुंकणाऱ्याने गयावया करीत म्हटले, "महाराज, माझ्यावर दया कर.मी कोणालाही मारलेले नाही, कोणाला दुखापत केलेली नाही. इतकेच काय, मला शस्त्रदेखील चालवता येत नाही! केवळ हे शिंग फुंकण्यापलीकडे मला काहीच येत नाही. हे शिंग वाजवण्याबद्दल मला कैद करणे, हा माझ्यावर अन्याय आहे.'
सेनापती म्हणाला, "तू प्रत्यक्षात लढाई केली नाहीस हे खरे, पण हे रणशिंग फुंकून, तू हजारो सैनिकांना लढण्यास प्रवृत्त केलेस, त्यांच्यात वीरश्री निर्माण केलीस, हाच तुझा महान अपराध आहे. तुझ्यामुळेच हे इतके जन लढाईत जखमी झालेत. म्हणून तुला दिलेली शिक्षा योग्यच आहे.
तात्पर्य : प्रत्यक्ष भांडण्यापेक्षा ते भांडण लावून देणारा अधिक दोषी असतो.