मूर्खपणातून हुशारी
ऐक्य समूह
Thursday, March 04, 2010 AT 12:29 AM (IST)
सिंह, लांडगा व कोल्हा यांनी यापुढे एकत्र शिकार करायची व जे काय मिळेल ते आपसात वाटून घ्यायचं असं ठरवलं. पहिल्याच खेपेला त्यांना एक खेचर चरताना दिसले. सिंह एका झुडपाआड दबा धरून बसला. लांडग्याने व कोल्ह्याने मिळून खेचराला झुडपाच्या बाजूने हुसकत नेले. सिंहाने या आयत्या सावजावर एकदम झडप घातली व त्याला ठार मारले.
खेचराला मारल्यावर सिंह बाजूस झाला व त्याने लांडग्यास शिकारीचे वाटे करावयास सांगितले. ठरल्याप्रमाणे त्या मूर्ख लांडग्याने खेचराचे तीन सारखे वाटे केले व तो सिंहास म्हणाला, "महाराज यातला कुठलाही वाटा आपण घ्या!' अगदी एकसारखे वाटे केल्यामुळे सिंह मनातल्या मनात संतापला होता. त्याने लांडग्यास जवळ बोलावले. सिंह लांडग्यास म्हणाला, "मला हा वाटा काही पुरणार नाही, म्हणून मी आणखी मांसाची काही सोय करतो.' असे म्हणून त्याने लांडग्यास एका फटक्यात लोळवले. नंतर त्याने कोल्ह्यास खेचराचे वाटे करावयास सांगितले. कोल्ह्याने जवळजवळ सर्व मांसाचा एक ढीग केला व स्वत:साठी अगदी थोडासा भाग ठेवून घेतला. त्या मोठ्या ढिगाकडे हात दाखवून कोल्हा मोठ्या अदबीने सिंंहास म्हणाला, "हा घ्या आपला वाटा, महाराज!' तात्पर्य : हुशार माणसे इतरांच्या मूर्खपणातून शहाणपणा शिकत असतात.