Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

चंद्रावर पाणी
वासुदेव कुलकर्णी
Thursday, March 04, 2010 AT 12:22 AM (IST)
Tags: lolak

होय! चंद्रावर पाणी आहे. हा शोध लावला भारताच्या चांद्रयान-1 वर बसवलेल्या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या उपकरणाने! सिंथेटिक अँपचेर रडारने चंद्राच्या उत्तर ध्रुवाच्या भागाच्या केलेल्या सर्वेक्षणात, चंद्राच्या पृष्ठभागावर थोडा थोडका नव्हे, साठ कोटी मेट्रिक टन इतका प्रचंड बर्फाचा साठा आढळला. दोन ते तीन किलो मीटर व्यासाच्या खड्ड्यात हा बर्फ असल्याचा नासाच्या शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे. केवळ बर्फच नव्हे, तर प्रवाही स्वरुपाचे पाणीही चंद्रावर असावे, असे नासाला वाटते.
चंद्राचा वेध घ्यायसाठी अमेरिकेच्या "नासा' ने जगात सर्वप्रथम चांद्रयान सोडले. त्यापाठोपाठ रशियाही या स्पर्धेत उतरला. दोन्ही देशांनी शेकडो चांद्रयाने चंद्रावर पाठवली. अमेरिकेचे ईगल हे चांद्रयान चाळीस वर्षांपूर्वी चंद्रावर उतरले.  निल आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर उतरणारा पहिला मानव ठरला. आकाशातला चंद्र मानवाच्या कवेत आला. पण, चंद्रावर जीवसृष्टी आणि पाणी आहे की नाही, याचा शोध मात्र अमेरिका आणि रशियाच्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांना घेता आला नाही. अत्यंत प्रगत तंत्रज्ञान विकसित केलेल्या या राष्ट्रांना चंद्राचे हे कोडे कायमच राहिले.
या पार्श्वभूमीवर भारताने प्रथमच पाठवलेल्या चांद्रयानाने मात्र, जे अमेरिकन चांद्रयानांना शक्य झाले नाही, त्याचा वेध अचूकपणे घेण्यात यश मिळवले. चंद्रावर उतरलेल्या छोट्याशा यंत्र गाडीवर नासाचीही अतिसूक्ष्म उपकरणे होती. त्याच उपकरणाने हा पाण्याचा शोध लावला. भारताच्या अवकाश संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्षेपकांच्या संशोधनाच्या कार्यात कोलदांडे घालणाऱ्या अमेरिकेला, भारतीय चांद्रयानाचेच सहाय्य घ्यावे लागले. संपूर्ण भारतीय बनावटीच्या प्रक्षेपकानेच अत्यंत अचूकपणे चांद्रयानाचे प्रक्षेपण केले होते आणि हे चांद्रयान चंद्रावर पोहोचलेही! भारतीय शास्त्रज्ञांच्या बुध्दिमत्तेचा चमत्कार तेव्हा साऱ्या जगाला पहायला मिळाला. आमचे संशोधन हे साऱ्या जगासाठी आणि मानवी कल्याणासाठी असल्याची घोषणा देत भारतीय अवकाश संशोधन संस्थेने  (इस्त्रो) या चांद्रयानाबरोबर चंद्राच्या पृष्ठभागाचे त्रिमिती नकाशे तयार करणारी उपकरणेही पाठवली होती. चांद्रयान चंद्रावर उतरताच अवघ्या काही क्षणात चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रेही इस्त्रोच्या  नियंत्रण कक्षाला मिळाली होती. अमेरिका आणि रशियाच्या चांद्रयान मोहिमांनी  मिळवलेल्या माहितीपेक्षाही चंद्राची अधिक तपशीलवार माहिती मिळवणे नासाच्या शास्त्रज्ञांनाही शक्य झाले.
इस्त्रोने हे चांद्रयान चंद्रावर पाठवले तेच, चंद्राच्या सतत अंधाऱ्या असलेल्या उत्तर ध्रुवीय प्रदेशाचे संशोधन करायच्या उद्देशानेच. आतापर्यंत चंद्राचा हा भाग संशोधनासाठी दुर्लक्षितच राहिला होता. याच भागात पाण्याचे साठे असावेत, असा भारतीय शास्त्रज्ञांचा अंदाज होता. काही महिन्यांपूर्वी चांद्रयानाकडून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे, चंद्राच्या माती आणि खडकाचे पृथ:करणही भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. चंद्रावर काही लक्ष वर्षांपूर्वी पूर येवून गेला असावा, असा अंदाजही या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता. त्याला आता नासाच्या संशोधनाने अधिक भक्कम दुजोरा मिळाला.
चंद्रावर बर्फाचे साठे असलेला  हा भाग पृथ्वीवरून दिसत नाही. या भागात सूर्यप्रकाश अत्यंत कमी आहे. सतत अंधाऱ्या असलेल्या या भागातच तीन ते चार मीटर उंचीचे हे हिमनग असावेत, असा नासाच्या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. चंद्रावर बर्फ असल्यामुळे तेथे आता प्राणी जीवनासाठी आवश्यक असलेला प्राणवायूही मिळवणे शक्य होईल. प्राणवायू मिळवायची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर चंद्रावरच्या मानवी वसाहतीचेही स्वप्न साकार होईल. अमेरिका आणि रशियाने चंद्रावरच्या स्वाऱ्या सुरु केल्या तेव्हा, चंद्र नेमका कसा असेल? याची प्रचंड उत्सुकता जगाला होती. पण, मूलभूत पाण्याचा शोधच या मोहिमांना लागला नव्हता. तो आता लागला आणि चांद्र मोहिमांना नवी दिशा मिळाली, ती भारतीय शास्त्रज्ञांच्या चांद्रयानामुळेच!
पौर्णिमेच्या मोहक आणि सुंदर चंद्राचे प्रेमिकांना कोण आकर्षण! माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे की, मी तुला आकाशीचा चंद्रही आणून देईन, असे सांगणाऱ्या प्रेमिकांना आता, तुला चंद्रावर नेईन, असे सांगता येईल. बालकांचा, प्रेमात धुंद झालेल्या प्रेमी जोडप्यांचा अशा या चंद्राचे वेगवेगळे पैलू, शास्त्रज्ञांच्यामुळे समजायला लागले. आकाशीचा चंद्र आता, भारतीय शास्त्रज्ञांच्या पूर्णपणे कवेत आला आणि सारे जगही
थक्क झाले!
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: