भाऊसाहेब केळकर
ऐक्य समूह
Thursday, March 04, 2010 AT 11:47 PM (IST)
अत्तरांच्या निर्मितीत जागतिक क्षेत्रात, भारतीय अत्तरांचा दबदबा निर्माण करणारे, गोविंद दामोदर उर्फ भाऊसाहेब केळकर यांच्या निधनाने सर्वार्थाने सुगंधी माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. केळकर मुळचे कोकणातले. त्यांचे वडील आणि काकांनी 1922 मध्ये एच. एस. केळकर कंपनीची स्थापना करून अत्तर उद्योगात पाऊल टाकले. हा उद्योग पूर्णपणे नवखा असतानाही, या दोघांनी संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या अत्तरांच्या निर्मितीचा ध्यास घेतला. बंगलोरमध्ये सुगंधी वनस्पतींची लागवडही केली. मुंबईच्या मुलुंड विभागात 35 एकर जागेवर, त्यांनी या उद्योगाचा विस्तार केला.
मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून भूगर्भशास्त्राची पदवी घेतल्यावर भाऊसाहेबांनी आपल्या वडिलोपार्जित उद्योगात प्रवेश केला. अथक परिश्रम आणि प्रयोगाच्या बळावर त्यांनी संपूर्ण भारतीय बनावटीच्या पन्नास प्रकारच्या अत्तरांची निर्मिती केली. एच. एस. केळकर आणि कंपनीची ही ब्रॅंड नेम असलेली अत्तरे जगातल्या पहिल्या पन्नास अत्तरात दर्जेदार म्हणून प्रसिध्द आहेत. शतकानुशतके जागतिक क्षेत्रात फ्रान्सची असलेली मक्तेदारी भाऊसाहेबांनी भारतीय अत्तरांच्या निर्मितीने मोडून काढली. विलक्षण राष्ट्रप्रेम असलेल्या भाऊसाहेबांनी आपल्या उद्योगाची भरभराट तर केलीच. पण उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौमध्येही कंपनीचे अत्तराचे मोठे दुकान काढले. याच राज्यात केळकर कंपनीच्या गुलाबाच्या स्वत:च्या बागाही आहेत. "कनौजी' हे भारतातले अत्तर परंपरेने जगप्रसिध्द होते. भाऊसाहेबांनी नव्या जागतिकी-करणाच्या युगात ते सर्वार्थाने जगभर लोकप्रिय केले.
अत्तरे, परफ्यूम आणि इसेन्सच्या क्षेत्रात भाऊसाहेबांची कंपनी देशात अग्रेसर तर आहेच, पण हा उद्योग अत्तरासाठी लागणाऱ्या सर्व कच्च्या मालाची निर्मितीही करतो. सुगंधी द्रव्यांचे उत्पादन करतानाच भाऊसाहेबांनी दालचिनीपासून युर्जिनल, यारा वारा अशी नवी सुगंधी द्रव्ये निर्माण केली. सर्वोत्कृष्ठ आणि दर्जेदार अत्तरे म्हणजे केळकर आणि कंपनीचीच, असा अत्तराच्या क्षेत्रात लौकिक आहे. इंडोनेशियातून आयात होणाऱ्या "पचौली' या सुगंधी वनस्पतीची किंमत प्रचंड वाढली, तेव्हा भाऊसाहेबांनी गुजरात आणि कर्नाटकच्या किनारी भागात, तिची लागवड करून हजारो शेतकऱ्यांना समृध्दीचा नवा मार्ग दाखवला. टर्पेंनटाईन पासून विविध सुगंधी द्रव्येही त्यांनी तयार केली. इंडियन केमिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशने पी.सी.रे पुरस्काराने त्यांचा अत्तराच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरवही केला होता.
वडिलोपार्जित अत्तराच्या व्यवसायाचे भाऊसाहेबांनी अथक परिश्रमाने उद्योग समूहात रुपांतर केले. आपल्या घराण्याच्या उद्योगाची भरभराट करतानाच, घरही एकत्र ठेवले. आता केळकर घराण्यातली तिसरी पिढी हा उद्योग पुढे चालवते आहे. उद्योगातून मिळालेल्या नफ्यातून भाऊसाहेबांनी विविध सामाजिक कार्यासाठीही निधी खर्च केला. देवगड आणि मुलुंडमध्ये त्यांनी महाविद्यालय सुरु केले. केळकर एज्युकेशन ट्रस्टची स्थापना करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या निधनाने देशाच्या सुगंधी द्रव्याच्या निर्मितीच्या क्षेत्रातील "सुगंधी पर्व' संपले आहे.