विश्वसनीय नेता
वासुदेव कुलकर्णी
Thursday, March 04, 2010 AT 11:46 PM (IST)
नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांच्या जयंती आणि पुण्यतिथी समारंभात आमचे मंत्री, पुढारी या नेत्यांचा आदर्श समाजाने घ्यावा, अशा उपदेशाचे डोस आवर्जून जनता आणि विद्यार्थ्यांना पाजतात. समाजात आता पूर्वीसारखे आदर्श उरले नाहीत, असे गळा काढून सांगतात. पण यातला एकही मंत्री, पुढारी समाजाला आदर्श वाटत नाही, हे कटू सत्य आहे. लोकांनी त्यागी नेत्यांचा आदर्श घ्यावा, असे सांगणारे हे बहुतांश पुढारी-मंत्री लोकांनी काय करावे, राष्ट्रासाठी त्याग कसा करावा, हे आवर्जून सांगतात. पण त्यांचे विचार आणि कृतीत मात्र अंतर पडल्यानेच, जनतेला हे नेते आदर्श वाटत नाहीत. जे आदर्श नेते वाटतात त्यांनी आपल्या नावाने काही संस्था उभ्या केल्या नाहीत. रस्त्यांना नावे दिली नाहीत. जिवंतपणी स्वत:चे पुतळेही उभारले नाहीत. काळाच्या विशाल पडद्यावर कोणत्याही पाऊलखुणा न उमटवताच हे महामानव काळाच्या पडद्याआड गेले. पण त्यांच्याच पाऊलखुणा मागे राहिल्या.
विद्यार्थ्यांना, सुशिक्षितांना सध्याच्या काळातल्या चार नेत्यांची नावे कोणती? असे विचारल्यास निराशाजनक उत्तर येते. राजकारण्याबद्दल तर बहुतांश लोक, पूर्वीसारखे आदर्श नेते आता राहिलेत कुठे? असा प्रतिसवाल करतात. या पार्श्वभूमीवर "रिडर्स डायजेस्ट' या आंतरराष्ट्रीय मासिकाने भारतात केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात, देशातल्या दहा विश्वसनीय व्यक्ती आणि नेत्यांची नावे विचारली होती. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या बहुतांश लोकांनी, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हेच भारतातले एकमेव विश्वसनीय नेते असल्याचे मत नोंदवले आहे. अन्य राजकारणी जनतेला विश्वसनीय वाटत नाहीत. या सर्वेक्षणात कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींना सहावा, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सातवा, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अकरावा, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींना तेरावा, राहुल गांधींना पंचविसावा क्रमांक मिळाला. मायावतींना सर्वात शेवटचा म्हणजे 76 वा क्रमांक मिळाला. इस्त्रोचे माजी संचालक
डॉ. माधवन नायर, अर्थतज्ञ डॉ. अमर्त्य सेन, इन्फोसेसचे नारायण मूर्ती, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण, टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या व्यक्ती जनतेला राजकारणी नेत्यापेक्षा अधिक विश्वसनीय वाटतात. पोलीस खात्यात आमूलाग्र सुधारणा घडवून आणणाऱ्या किरण बेदी, शेतकरी, शास्त्रज्ञ हे ही विश्वसनीय आहेत, अशी मतेही लोकांनी नोंदवली.
आपल्या विदुषी चाळ्यांनी आणि बिहारी ढंगाच्या भाषणबाजीने सतत चर्चेत असलेल्या लालूप्रसाद यादवांच्यावर देशातल्या जनतेचा मुळीच विश्वास नाही. त्यांना शंभराव्या क्रमांकावर लोकांनी ढकलून दिले.
सत्तेचा सूर्य असेपर्यंतच राजकारण्यांना जन मानसात प्रतिष्ठेचे स्थान असते. पण, ते त्यांच्या अंगावर असलेल्या सत्तेच्या झुलीमुळेच! ही झूल उतरल्यावर मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा सूर्यास्त होतो. त्यांना सत्तेमुळे मिळालेली तात्पुरती लोकप्रियताही चक्रीवादळासारखी संपते. पण, सत्ता असताना आणि नसतानाही लोकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान व्हायचे भाग्य फारच थोड्या नेत्यांना मिळते, ते त्यांच्या कर्तृत्वामुळेच! डॉ. कलाम हे काही राष्ट्रपतिपद मिळाल्यामुळे मोठे झाले नाहीत. ते राष्ट्रपती झाल्यामुळे त्या पदाचा सन्मान वाढला. आपले सारे जीवन त्यांनी राष्ट्रासाठी समर्पित केले. राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाल्यावरही 2020 पर्यंत आपली मातृभूमी जगात बलशाली-महासत्ता व्हायचे स्वप्न पाहणारे डॉ. कलाम साऱ्या देशभर विविध जनसमूहात प्रेरणेचा-चेतनेचा मूलमंत्र देत फिरत आहेत. भारताची नवी पिढी हीच आपले स्वप्न साकार करील, असा आत्मविश्वास त्यांना वाटतो. विद्यार्थ्यांशी सहजपणे त्यांच्याच भाषेत सुसंवाद करीत हा नव्या युगातला ऋषी, आपले स्वप्न साकार होणारच याची ग्वाही देतं. देश विदेशातले शेकडो सन्मान त्यांना मिळाले. देशाच्या सर्वोच्च नागरी "भारतरत्न' सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले. पण, अत्यंत विनम्र वृत्तीच्या या महापुरुषाने हा सन्मानही आपले गुरुजन आणि देशवासियांना अर्पण केला. देश, देशाची जनता, विद्यार्थी हेच त्यांच्या जीवनाचे सर्वस्व आहे. त्यांच्या कृती आणि उक्तीत कुठेच फरक नाही. त्यामुळेच डॉ. कलाम नावाच्या "वन मॅन आर्मीचे' आकर्षण भारतवासियांना वाटते. तेच सर्वात विश्वसनीय नेते वाटतात!