विद्यार्थ्यांना शुभेच्छा!
ऐक्य समूह
Thursday, March 04, 2010 AT 12:19 AM (IST)
महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा मंडळातर्फे आजपासून सुरु होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुभेच्छा! पहिल्या विषयापासून ते शेवटच्या विषयाच्या पेपरापर्यंत कोणताही मानसिक ताण, दडपण मनावर न ठेवता, परीक्षार्थिंनी अत्यंत शांतपणे प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. एका विषयाचा पेपर दिल्यावर, दुसऱ्या विषयाचा अभ्यास करताना, दिलेल्या पेपरमध्ये किती गुण मिळतील, कोणता प्रश्न लिहायचा राहिला, याची चिंता अजिबात करू नये. अमुक लिहिले असते तर बरे झाले असते, अधिक गुण मिळाले असते, असली काळजी करण्याने काहीही साध्य होणार नाही. पालकांनीही परीक्षा देवून आपली मुले-मुली घरी आल्यावर लगेचच, तू काय काय सोडवलेस?, पेपर कसा गेला? अमक्या प्रश्नाचे उत्तर असे लिहिले असतेस तर अधिक चांगले झाले असते. हा विषय स्कोअरिंगचा होता, असे सतत बोलून आपल्या पाल्यांच्या मनात चलबिचल निर्माण होणार नाही, याची दक्षता आवर्जून घ्यावी. दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या मुला-मुलींचे वय 15/16 चे असते. पौगंडावस्थेतल्या या मुलांचे मनही अधिक हळवे आणि संवेदनशील असते. त्यांच्या मनाचा विचार करूनच पालकांनी त्यांच्याशी अधिक आपुलकीने आणि समजुतीने वागायला हवे. दहावीच्या परीक्षेचे कसलेही दडपण मनावर घेवू नकोस, किती गुण मिळतील याची चिंता करू नकोस. निकालाची काळजी आतापासून करू नकोस, असे विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी समजावून सांगायला हवे. काहीही झाले तरी आपल्या आई- वडिलांचा विश्वास आपल्यावर आहे, ते या परीक्षेत कमी गुण -टक्केवारी मिळाल्यास आपल्याला रागावणार नाहीत, याची खात्री विद्यार्थ्यांना वाटायला हवी. मुलांची ही मानसिकता जपली तरच, दहावीच्या परीक्षेची भीती त्यांच्या मनावर मुळीच राहणार नाही. अत्यंत आत्मविश्वासाने विद्यार्थी परीक्षेचे पेपर सोडवतील. आम्ही दहावी-अकरावीला होतो तेव्हा, रात्रीचा दिवस करून अभ्यास करीत होतो. आमच्यावेळी टी. व्ही. वगैरे असले काही नव्हते. अभ्यास एके अभ्यास, हेच आमचे शालेय जीवन होते. अभ्यासाशिवाय आम्हाला काही सुचतच नव्हते, ते असले उपदेश आणि सल्ले पालकांनी विद्यार्थ्यांना द्यायची काहीही गरज नाही. ही पिढी तंत्रज्ञानाच्या नव्या युगात जन्माला आली. तिचा बुध्द्य़ांकही गेल्या पिढीपेक्षा अधिकच आहे. टी. व्ही., मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट, ई. मेल, ब्लॉग हे दहावीत शिकणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना माहितीच आहे. माहिती तंत्रज्ञानाचे हे नवे क्षेत्र या विद्यार्थ्यांनी अल्पवयातच काबीज केले आहे. ही सारी वैज्ञानिक-तंत्रज्ञानाची प्रगती लक्षात घेता, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही आपण काय अभ्यास करावा आणि तो कसा करावा, याचे भान आलेले आहेच, हे पालकांनी लक्षात ठेवायला हवे. परीक्षा सुरु असताना तुला टी. व्ही. बघायचे कसे सुचते? आता परीक्षेत काय दिवे लावणार? ते निकालानंतरच दिसेलच! ही असली आपल्या मुलांना हताश आणि निराश करणारी वाक्ये पालकांनी अजिबात उच्चारु नयेत. खुद्द परमेश्वराला स्तुती आवडते. दहावीची मुले आणि मुली या तर उमलत्या कळ्या आहेत. त्या अलगद कशा उमलतील? त्या उमलत्या फुलांचा सुगंध पालकांना हवा असेल तर, आपल्याला मेरिट हवे, की मूल हवे याचा गंभीर विचार करायलाच हवा !
तणावमुक्ती
गेल्या तीस वर्षात पहिलीपासून ते पदवी आणि पदव्युत्तर पदवीपर्यंत मेरिट आणि परसेंटेज हा समाजातला परवलीचा आणि पालकांचा अत्यंत प्रिय शब्द झाला आहे. या शब्दानेच आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे वाटोळे केले. परीक्षेत मिळालेल्या कमी टक्केवारीने, अपयशाच्या भीतीने शेकडो विद्यार्थ्यांनी आपले जीवनच संपवले. या आत्महत्त्येमागची कारणे पालकांनी समजून घ्यायलाच हवीत. यावर्षी महाराष्ट्रात सोळा लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले आहेत. या साऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुला-मुलीला नव्वद टक्क्यांच्यावर गुण मिळायलाच हवेत, मेरिटमध्येही आपले मूल यायलाच हवे, असा अट्टाहास धरल्यास ते कधी तरी शक्य होईल काय?, याचा गंभीर विचार पालकांनी करायला हवा. सारेच विद्यार्थी काही अधिक बुध्द्य़ांकाचे नसतात. साऱ्यांनाच नव्वद टक्क्यांच्यावर गुण मिळणे सर्वथैव अशक्य अशीच बाब आहे. अमक्याचा मुलगा-मुलगी खूप हुशार आहे, पहिलीपासून त्याने-तिने वर्गातला नंबर कधी सोडला नाही. आमच्या घरात बघा, सारे काही आहे. चांगली शाळा, चांगले शिक्षक आणि चांगला क्लास हे सारे आमच्या चिरंजीवांना मिळालेले असतानाही, ते कधी साठ टक्क्यांच्यावर मजलच मारीत नाहीत. आमचे नशिबच फुटके, त्याला काय करणार? असा त्रागा आई-वडिलांनी सतत मुलासमोर केल्यास, त्याची मानसिक स्थिती चांगली कशी राहील? आपल्या मुलांनी अभ्यास करताना मानसिक तणावातून सतत मुक्तच राहायला हवे, हे पालकांनी लक्षात घेतलेले नसल्यामुळेच, शिक्षणाच्या क्षेत्रात भीतीचे हे नवे वातावरण निर्माण झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनीही पालक आणि समाजातले लोक दहावीच्या परीक्षेबद्दल काय बोलतात, याकडे काहीही लक्ष न देता आपले ध्येय साकार करायसाठी जिद्दीने पुढे जायचा निर्धार करावा. दहावीची परीक्षा म्हणजे जीवनाची परीक्षा नव्हे. या परीक्षेवर आपल्या भावी जीवनाचे सारे यश अवलंबून आहे, ही समजूत मनातून पूर्णपणे काढून टाकावी. डॉक्टर आणि इंजिनिअर या दोन विद्याशाखांशिवाय जगात विविध क्षेत्रातले अक्षरश: हजारो जीवनाभिमुख अभ्यासक्रम आहेत. आपल्या आवडीनुसार हव्या त्या अभ्यासक्रमाचे शिक्षण आपण घेणार आहोत, असे विद्यार्थ्यांनी निर्भयपणे सांगायला हवे. सततच्या परीक्षा आणि चाचणी परीक्षांच्या चक्रव्यूहातून आपल्या मुलांना मुक्त करायसाठी पालकांनीही आपल्या अपेक्षांचे जड ओझे मुलांच्या डोक्यावर सक्तीने मुळीच लादू नये. "तारे जमीन पर' या चित्रपटात बाल विद्यार्थ्यांचे भावविश्व आणि त्यांच्या अफाट कल्पना-शक्तीच्या अविष्काराचेच दर्शन अमिर खान याने दाखवले होते. हा चित्रपट पाहूनही मेरिटच्या वेडाने झपाटलेल्या बहुतांश पालकांच्या मनोवृत्तीत काही फरक झाला नाही, हे दुर्दैव होय! ग्रामीण भागातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनीही आपण शहरी भागातल्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहोत, ही समजूतच मनातून पूर्णपणे काढून टाकावी. ग्रामीण भागातही बुध्दीचे देणे लाभलेले लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेतच. शेतकऱ्यांच्या या मुला-मुलींनी अभ्यासावरच पूर्णपणे लक्ष केंद्रित करून, क्लास नसला तरीही आपण यश मिळवणारच, अशा जिद्दीनेच उत्तरपत्रिका लिहाव्यात. ते शिकत असलेल्या शाळाही उत्तम आणि गुणी विद्यार्थ्यांना घडवणाऱ्याच आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात ग्रामीण आणि शहरी असा भेदच अयोग्य! उद्याच्या आव्हानांना आणि खुणावणाऱ्या क्षितीजांना सामोरे जायसाठी दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुयश मिळावे, याच
पुन्हा शुभेच्छा!!!