Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

अभागी माय-मराठी
वासुदेव कुलकर्णी
Tuesday, March 02, 2010 AT 01:30 AM (IST)
Tags: lolak
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी....
कविवर्य सुरेश भट यांनी माय मराठीची
ही अशी महती गायली असली तरी, इंग्रजीचे भूत मानगुटीवर बसलेल्या माय मराठीच्या करंट्या लेकरांनीच तिची घोर विटंबना आणि उपेक्षा सुरु ठेवली, याची शरम मराठी भाषिकांना वाटायला हवी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन "मराठी भाषादिन' म्हणून मुंबईत साजरा झाला. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी माय मराठीचे गोडवे गायले. आपल्याला ही भाषा बोलता, लिहिता येते, याबद्दल आनंद सोहळाही साजरा केला गेला. पण, अन्य राजकीय पक्षांना मात्र हा दिन साजरा करावा, असे वाटले नाही. मुंबई पलिकडे असा काही दिन, साजरा केला जातो, याची गंधवार्ताही माय मराठीच्या कोट्यवधी सुपुत्रांना नव्हती.
जाहीर सभा-समारंभातून मराठीचे गोडवे गायचे आणि व्यवहारात मात्र घरातल्या वृध्द माणसाला अडगळीच्या खोलीत फेकून द्यायचे, असाच प्रकार महाराष्ट्रात माय मराठीच्या बाबत घडतो आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, समर्थ रामदासांच्या मराठी भाषिकांचा "संयुक्त महाराष्ट्र' स्थापन झाला त्याला, पन्नास वर्षे झाली. या काळात मराठीला राजभाषेचा दर्जा तेवढा राज्यकर्त्यांनी दिला. तिचा अभिमान आपल्याला असल्याचे छाती बडवत सांगण्यापलिकडे अन्य काही केले नाही. शासन आणि न्याय व्यवहारात मराठी  भाषेची सक्ती करायचे आदेश मंत्रालयातून निघाले आणि सरकारी कार्यालयांच्या फायलीत ते बंदही झाले. प्रशासनात अद्यापही इंग्रजीचा वापर अधिक प्रमाणात सुरुच आहे. न्याय व्यवहारात या राजभाषेचा वापर फक्त बारा टक्के इतकाच होतो. महाराष्ट्राबरोबरच स्थापन झालेल्या शेजारच्या कर्नाटक राज्यात मात्र शासन व्यवहाराचे शंभर टक्के कन्नडीकरण झाले. या राज्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या दुकानांचे, व्यापारी संस्थांचे फलकही कानडीच आहेत. पण, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या महानगरी मुंबईत मात्र मराठीची जवळजवळ हकालपट्टीच झाली. या शहरातल्या पाट्या इंग्रजी. व्यवहाराची भाषा हिंदी आणि इंग्रजीचे प्रचंड स्तोम माजले. मुंबईत राज्याच्या अन्य भागातून जाणाऱ्या मराठी भाषिकांशी तिथला टॅक्सीवाला, भाजी  विक्रेता, दुकानदार, व्यापारी मराठीत बोलत नाही, तो हिंदीतूनच त्याच्याशी संवाद साधतो. ही अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक स्थिती मुंबईत निर्माण झाली ती, आमच्या राज्यकर्त्यांनी राजभाषा मराठीची अखंडपणे अवहेलना केल्यामुळेच!
मराठी ही राजभाषा झाली आणि डोक्यावर सोन्याचा किरीट घातलेली फाटक्या कपड्यातली दिनवाणी मायमराठी मंत्रालयात न्याय मागत उभी आहे, अशी माय मराठीची दुर्दशा तिच्या मुलांनीच आणि राज्यकर्त्यांनी केल्याचे कुसुमाग्रजांनी लिहून ठेवले आहे. या  स्थितीत अद्यापही काही बदल झालेला नाही.
जागतिकीकरणाच्या लाटेत इंग्रजीशिवाय पर्याय नाही, अशा समजुतीने मुंबईसह महाराष्ट्रातल्या कोट्यवधी लोकांना पछाडले. मराठीत बोलायची या उच्चभ्रूंना लाज वाटायला लागली. बरीच वर्षे मुंबईत राहिल्याने माय मराठी विसरल्याचेही हे लोक ढोंगीपणे सांगायला लागले. मराठीत संवाद साधने हे या तथाकथित उच्चभ्रूंना गावंढळ वाटते. आपला मुलगा-मुलगी कॉन्व्हेंटमध्ये, इंग्लिश मीडियममध्ये शिकते, असे सांगताना या इंग्रजाळलेल्या आई-बापांचे चेहरे कसे फुललेले असतात. इंग्रजी माध्यमाची ही मुले स्कूलमध्ये जातात, त्यांना मिस किंवा मॅडम शिकवते, ही मुले अभ्यास नव्हे, स्टडी करतात. त्यांचे होमवर्क असते, त्यांची एक्झाम होते, हे सारे पालकच सांगतात. आपल्या मुलांना इंग्रजी येते, म्हणजे त्याने सारे जग जिंकले, अशा भ्रमात असलेल्या या उच्चशिक्षितांनीच मराठीचा पदोपदी अवमान आणि अपमान सुरुच ठेवला आहे. चंगळवादाच्या लाटेत बुडालेल्या आणि इंग्रजीच्या प्रभावाने भुललेल्या या नव्या हाय फाय कल्चरमधल्या काही मूठभरांना तर आपल्याला मराठी येते, हे सांगायचीही लाज वाटते. या असल्या कुलांगारांना महाराष्ट्रात जन्म मिळाल्याची खंत नक्कीच माय मराठीला वाटत असेल.
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी।
असे अभिमानाने सांगणारी कोट्यवधी माय मराठीची लेकरे अद्यापही ग्रामीण भागात आहेत. अमृताते पैजा जिंकी, असे सांगणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलीचे वारकरी आहेत. तेच माय मराठीचा गेलेला सन्मान परत मिळवून देतील, तीच पांग फेडतील!
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: