पाक प्रश्नाचे भिजत घोंगडे
- वा. दा. रानडे
Tuesday, March 02, 2010 AT 10:27 PM (IST)
भारत आणि पाकिस्तानदरम्यान नुकतीच परराष्ट्र सचिव पातळीवरची चर्चा झाली. या चर्चेत उभयपक्षी चर्चेसंबंधात पाकिस्तानने घेतलेली भूमिका दहशतवादाचे आणि विविध प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवणारी ठरलीे. पाकिस्तानविरुद्धची ध्येयधोरणे अधिक ठोस करण्यासाठी भारताने या घटनेचा उपयोग करून घेतला पाहिजे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या देशात दहशतवादी नाहीतच आणि मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबचा पाकिस्तानशी काहीच संबंध नाही असा कांगावा केला होता. नुकत्याच झालेल्या पुण्यातील स्फोटानंतर पाकिस्तानी अतिरेकी संघटना भारतात दहशतवादाचे थैमान घालत आहेत हे स्पष्ट झाले आहे. भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही या संघटनांनी घातलेला धुडगूस पाहता ही समस्या केवळ भारताची राहिली नसून भारताला त्रास देणाऱ्या पाकिस्तानचीही झाली आहे, हे स्पष्ट होते. भारत-पाकिस्तान दरम्यानची कोंडी फोडण्यासाठी त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर सामोपचाराचे मार्ग अवलंबण्यासाठी भारताने पाकिस्तानबरोबर परराष्ट्र सचिव स्तरावरील बैठकीचे आयोजन केले होते. परंतु, उभयपक्षी चर्चेेस आम्ही उतावीळ नाही, असे घमेंडखोर उत्तर पाकिस्तानने दिले. भारतानेही त्याच पद्धतीने उत्तर देत आम्हाला चर्चेेचीही घाई नसल्याचे खडसावले आहे. सर्व पुरावे पाकिस्तानच्या विरोधात असताना सुरू असलेली घमेेंड त्याचबरोबर भारताने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या हाफिज सईदची मागणी केल्यावरही पाकिस्तानने गिळलेले मूग याचा विचार करता भारताने या चर्चेचा उपयोग आपली भूमिका कणखरपणे स्पष्ट करण्यासाठी उपयोगात आणली पाहिजे.
धर्मांध दहशतवादी
पुणे बॉम्बस्फोट प्रकरणाचा छडा लावण्यात शासकीय यंत्रणेला अद्याप यश आले नसले तरी या मागे पाकिस्तानी दहशतवादी किंवा पाकिस्तानने वरदहस्त ठेवलेल्या दहशतवादी संघटनाच आहेत यात काही शंका नाही. आत्तापर्यंत ज्या संघटनांनी याची जबाबदारी घेतली आहे या सर्व संघटना पाकिस्तानप्रणित आहेत. बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी अल अलामी या संघटनेने पाकिस्तानमधून प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोट आपणच केल्याचे म्हटले होते. या सर्वांचा गोषवारा काढल्यास पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना भारतातील धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या केंद्रांवर हल्ला करत आहेत. या केंद्रांवर हल्ले केल्यामुळे आपल्या देशाच्या स्थैर्याला सुरुंग लागेल असा त्यांचा विश्वास आहे. साहजिकच पाकधार्जिण्या दहशतवाद्यांच्या टोळ्यांनी भारतावर वारंवार असे हल्ले केले आहेत.
भारतासाठी वापरण्यात येणारे हे अतिरेकी आज धर्मांधतेच्या पगड्याने पाकिस्तानमध्येही असाच उतमात घालू लागल्यावर पाकिस्तानला चर्चेची उपरती झाली असे म्हणावे लागेल. पाकिस्तानमध्ये लष्कर किंवा जमातच्या दहशतवाद्यांनी ठिकठिकाणी बॉम्बस्फोट केल्यावर पाकिस्तान सरकारचे डोळे उघडले आहेत. आपण निर्माण केलेल्या भस्मासुराने आपल्याच डोक्यावर हात ठेवल्याचे लक्षात आल्यावर दहशतवाद ही जागतिक समस्या असल्याचे मान्य करून त्यांनी सचिव पातळीवरील चर्चेत सहभागी होण्याचे ठरवले आहे. परंतु, यातही त्यांचे अंत:करण स्वच्छ नव्हते आणि त्यांना दहशतवादाच्या मुद्याला हात घालायचा नव्हता हे समजून येते. उभयपक्षी चर्चेसाठी आम्ही उतावीळ नाही या त्यांच्या वक्तव्याचा अर्थ अजून काही काळ दहशतवाद्यांना धुडगूस घालण्याचा परवाना देणे हाच आहे. हा परवाना पाकिस्तानमध्ये दहशतवादी चालवतील त्यावेळी पुन्हा एकदा ते ताळ्यावर येतील. परंतु, आता एकीकडे समस्या गंभीर असताना चर्चा करण्यास उत्सुकता न दाखवणे हे त्यांचे दुटप्पीपणाचे धोरण दहशतवाद निपटवण्याच्या मूळ भूमिकेस
तडा देणारे आहे.
ठोस कार्यवाहीची अपेक्षा
दोन्ही देश दहशतवादाने ग्रासले असताना केवळ चर्चा आणि परिसंवादावर त्यांनी वेळ काढावा आणि दहशतवादावर ठोस कार्यवाही होऊ नये अशी अपेक्षा अमेरिकेशिवाय कोणाची असू शकते ? अमेरिकेला भारताचा विकास सहन न होणारा आहे. 2020 मध्ये भारताने महासत्ता म्हणून आपल्या छातडावर नाचू नये यासाठी काही तरी कुरापती काढून देशातील स्थैर्य संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू असतात. दहशतवादाच्या एका फटक्याने हादरलेल्या अमेरिकेने दुसऱ्यांच्या देशात दहशतवादाची पेरणी केली आहे. प्रत्येक खंडामध्ये दहशतवादाचा प्रश्न निर्माण झाला असताना दोन्ही देशांना किंवा दहशतवादी संघटनांच्या तळांना संरक्षण देत बोलणी करण्याचे नाटक अमेरिकेच्याच दिग्दर्शनाखाली सुरू आहे. पाकिस्तान हे अमेरिकेचे असेच कठपुतळे असल्यामुळे अमेरिकेच्या परवानगीनेच पाकिस्तान भारताबरोबर बोलत आहे.
काही दिवसांपूर्वी भारताबरोबर काश्मीरच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी चीन मध्यस्थ असावा अशी भूमिका पाकिस्तानने मांडली होती. वास्तविक पाहता, या भूमिकेवर यापूर्वीही भारताने आपले स्पष्ट आणि ठाम मत मांडले आहे. प्रश्न दोघांमधला आहे. तो दोघांनी सोडवला पाहिजे आणि भारताला मध्यस्थाची हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यकता नाही. परंतु, आंतरराष्ट्रीय दबाव अमेरिकेबरोबरच चीनचा भारताविरोधातला असलेला दृष्टिकोन यामुळे पाकिस्तान किंवा अमेरिका भारत-पाक चर्चेत मध्यस्थ असावा अशी सूचना किंवा मागणी वारंवार करत असते. चीनलाही भारताची काही प्रमाणात भीती आहे. महासत्तेच्या स्पर्धेत आपल्या पाठोपाठ भारत वाटचाल करत आहे याची त्यांना रास्त जाणीव आहे. त्याचबरोबर वेळ पडल्यास अमेरिका भारताकडे आपले झुकते माप टाकेल याबद्दलही त्यांना संशय नाही. अमेरिकेला आशिया खंडात चीनवर लक्ष ठेवण्यास भारताइतका प्रभावी देश नाही हेही चीनला माहीत असून भारताला स्थैर्य लाभू न देण्याचा विडा त्यांनी यासाठीच उचलला आहे. पाकिस्तानला अमेरिका उघडउघड मदत करत आहे तर चीन गुपचूप मदत करत आहे. यावेळी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही रणनीती त्यांनी अवलंबली आहे.
मस्ती कायम
अलीकडेच पाकिस्तानचे सचिव बशीर यांनी चर्चेनंतर आक्षेपार्ह विधाने केली. भारताविरुद्ध द्वेषाची भावना पसरवणाऱ्या हाफिज सईद याच्यासह 34 दहशतवाद्यांना ताब्यात देण्याची मागणी करताना त्याच्यासंबंधी तीन सविस्तर टिपणे भारताने सादर केली होती. त्या टिपणांचीही बशीर यांनी खिल्ली उडवली आहे. ही टिपणे म्हणजे वाङमयाचे वाचन असून त्यात ठोस माहिती नाही अशी भाषा त्यांनी वापरली. एका अर्थाने पाकिस्तानची मस्ती अद्यापही कायम असून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आयोजित केलेली ही बैठक बशीर यांच्या वक्तव्यांमुळे नवे पेच निर्माण करणारी ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाने या चर्चेत अर्थ नाही असे सांगितले आहे. ज्या सरकारचे म्हणणे जनता मानत नाही अशा देशाच्या सरकारशी वाटाघाटी करणे निरर्थक आहे, अश देशाच्या सरकारशी वाटाघाटी करणे म्हणजे कालापव्यय आहे. अर्थात हा कालापव्यय म्हणजे भारताच्या दृष्टीने पालथ्या घड्यावर पाणी असले तरी आपली ठाम भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा हा ठाशीव प्रयत्न आहे असेच म्हणावे लागेल.
पाकिस्तानात काश्मीरमध्ये दहशत-वादी संघटनांची पन्नास प्रशिक्षण शिबिरे अद्यापही सुरु असल्याचे संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी जाहीरपणे सांगितले. पण त्याचा काही उपयोग पाकिस्तानवर झालेला नाही. भारत पाक यांच्यातली सचिव पातळीवरची चर्चा पुन्हा सुरु झालेली असतानाच, जमात उल दावाचा सूत्रधार महंमद हाफिज सैद, हा पाकिस्तानने भारताशी युध्द केले पाहिजे, असा प्रचार करीत होता. पुण्यात बॉंबस्फोट होण्यापूर्वी याच सैदने लाहोरच्या सभेत पुणे, कानपूर येथे बॉंबस्फोट घडवायची चिथावणी दिलेली होती. काबूलमध्ये अलीकडेच झालेल्या बॉंबस्फोटात बारा भारतीय ठार झाले. हा आत्मघातकी हल्लाही पाकिस्तानच्या आय. एस. आय. या गुप्तहेर संघटनेच्या मदतीनेच झाल्याचे धागेदोरे सापडत आहेत.
- वा. दा. रानडे