Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

आगलावे थरुर
ऐक्य समूह
Tuesday, March 02, 2010 AT 01:28 AM (IST)
Tags: editorial

आपल्याच घराला आग लावायला सोकावलेल्या थरुर यांना तडकाफडकी केंद्रीय मंत्रिमंडळाबाहेर हाकलल्याशिवाय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासमोर आता अन्य काहीही पर्याय राहिलेला नाही. केंद्रात परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाल्यापासून थरूर यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करीत केंद्र सरकारला कोंडीत आणण्याशिवाय अन्य काहीही केलेले नाही. देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत पंतप्रधान किंवा परराष्ट्र मंत्र्याशिवाय अन्य कुणी मंत्र्याने बोलू नये, असा नियम असतानाही थरूर यांनी तो थेट धुडकावून लावत, सौदी अरेबियातल्या रियाधमध्येच वादग्रस्त वक्तव्य करून केंद्र सरकारला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अन्य कोणत्याही देशाची लूडबूड चालणार नाही, असे केंद्राचे पारंपरिक धोरण असताना थरूर यांनी मात्र, या दोन्ही देशातले संबंध सुधारायसाठी सौदी अरेबिया मध्यस्थाची भूमिका चांगली वठवू शकेल, असे सांगून टाकले. परराष्ट्र खात्याच्या मंत्र्याने  विशेषत: परदेश दौऱ्यावर असताना प्रत्येक शब्द जपूनच उच्चारावा लागतो. त्यांच्या प्रत्येक शब्दाचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात वेगवेगळा अर्थ काढला जातो. पण, आपण परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री आहोत, याचे भान, सौदीतले भारतीय राजदूत तलमीज अहमद यांनी दिलेल्या मेजवानीत थरूर यांना राहिले नाही. सौदी अरेबियाचे पाकिस्तान बरोबर मैत्रिपूर्ण आणि घनिष्ठ संबंध असल्याने दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी या मैत्रीचा चांगला उपयोग होवू शकतो, असे ते म्हणाले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या बरोबरच सौदीच्या दौऱ्यावर असलेल्या थरूर यांनी बेलगाम विधाने केल्यामुळे केंद्र सरकारची बदनामी तर झालीच, पण आता या आगलाव्या, भंपक मंत्र्यामुळे बचावात्मक भूमिकाही घ्यावी लागली. डॉ. सिंग यांनी कान उपटल्यावर सारवासारव करीत थरूर यांनीच, लगेचच कोलांटी उडी मारत, भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वादात सौदीने मध्यस्थाची भूमिका घ्यावी, असे आपण म्हटलेच नाही. केवळ सौदीने संवाद साधावा, असा आपल्या म्हणण्याचा अर्थ होता, असा खुलासा तडकाफडकी केला. आपण पत्रकारांशी बोललो तेव्हा  "इंटरलोक्युटर' या शब्दाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळेच हा घोळ झाल्याचे थरूर आता सांगायला लागले आहेत. या असल्या दुतोंड्या, ऐषआरामात लोळणाऱ्या थरूर यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाशी, संबंधाशी काहीही देणे-घेणे नाही. तोंडाला येईल ते बडबडण्याशिवाय हा तथाकथित अतिविद्वान माणूस काहीही करू शकत नाही, शकणारही नाही. त्याचे केंद्र सरकारच्या धोरणाशीही देणे-घेणे नाही. सतत वादग्रस्त विधाने करायची आणि प्रसिध्दी माध्यमांच्या प्रकाशझोतात राहायचे, एवढेच थरूर यांचे एकमेव ध्येय आहे. या असल्या बोगस माणसाला केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी काही काळ ठेवल्यास तो भारताच्या मित्रराष्ट्रांचे शत्रू राष्ट्रात रुपांतर करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. जिथे जाईल तिथे उचापती करत राहायच्या आणि नंतर पुन्हा मी तो नव्हेच, असा पवित्रा घ्यायचा, या असल्या वागण्याने थरूर यांची विश्वासार्हता केव्हाच संपली आहे. डॉ. सिंग यांनी हा अस्तनीतला निखारा तडकाफडकी काढून टाकायला हवा अन्यथा सरकारला तो चांगलाच महागात पडेल.
तारतम्याचा अभाव
संयुक्त राष्ट्र संघात महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या थरूर यांनी, या संस्थेच्या सरचिटणीसपदाची निवडणूकही लढवली होती. त्यात ते पराभूत झाले. नोकरी सोडून भारतात आले. कॉंग्रेस पक्षाने त्यांना केरळ राज्यात लोकसेभेची उमेदवारी दिली. निवडून आल्यावर परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्रिपद दिले. भारत आणि भारतातल्या समस्यांशी या उपटसुंभ नेत्याला काहीही माहिती नाही. ती करून घ्यावी असे त्याला वाटत नाही. दिल्लीत मंत्र्यांसाठीचा अलिशान बंगला मिळाला नाही, अशी सबब सांगत हा माणूस दररोज लाख- दोन लाख रुपये भाड्याच्या हॉटेलात चार महिने राहिला होता. या कृतीचे समर्थनही करीत होता. उधळपट्टी रोखायसाठी डॉ. सिंग यांनी, सर्व मंत्र्यांनी सामान्य श्रेणीने  विमान प्रवास करावा, असा आदेश काढताच, थरूर यांनी मुक्ताफळे उधळली. या श्रेणीने प्रवास करणे त्यांना अपमानास्पद वाटले. शेळ्या-मेंढ्यांसारखा प्रवास मंत्र्यांना विमानातल्या सामान्य श्रेणीने करावा लागत असल्याबद्दल त्यांनी "'ट्विटर' मध्ये ब्लॉग लिहून सांगून टाकले. त्यांच्या या वक्तव्यावर तेव्हाही प्रचंड वादळ उठले होते. सरकारनेच त्यांना पाठीशी घातले. प्रत्येक वेळी वादग्रस्त वक्तव्ये करायची आणि नंतर त्याचा चुकीचा अर्थ लावला असे सांगत हात वर करायचे, असा थरूर यांचा धंदा आहे. भारतात येणाऱ्या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या व्हिसाची प्रक्रिया अधिक कडक करायचा इरादा परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी बोलून दाखवताच थरूर यांनी या विधानाची टिंगल-टवाळी ब्लॉगमध्ये करून टाकली. व्हिसा कडक केल्यामुळे भारतातील दहशतवादी कारवायांना पायबंद कसा बसणार? असा त्यांचा सवाल होता. आपण ज्या मंत्रिमंडळात आहोत, त्याच सरकारच्या विरोधी वक्तव्ये करायची, थरूर यांना कसलीही शरम वाटत नाही. आपण उच्च विद्याविभूषित असल्याच्या अहंकाराने पछाडलेला हा माणूस, प्रशासनातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनाही कमी लेखतो. आपल्या एवढे हुशार आणि विद्वान मंत्रिमंडळात कुणीही नाही, अशी मस्ती त्यांना चढली आहे. डॉ. सिंग आणि कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी या अतिविद्वानाला पाठीशी घातल्यामुळेच, त्याचा मर्कट खेळ अधिकच वाढायला लागला. थरूर आता पंतप्रधानांनाही जुमानित नाहीत. आपल्या वक्तव्याने सरकारच्या परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होतील, याचीही पर्वा त्यांना नाही. अलिकडेच भारत आणि पाकिस्तान या देशांच्या सचिवात राजधानी दिल्लीत चर्चा झाली. पाकिस्तानच्या सचिवाने काश्मीरचा मुद्दा उकरून काढला. पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना दिला जाणारा आश्रय बंद व्हावा, ही भारताची मागणी पाकिस्तानने अद्याप मान्य केलेली नाही. भारतात दहशतवादी कारवाया होवू नयेत, अशी दक्षताही आपण घेवू शकत नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांचे म्हणणे आहे. मुंबई स्फोटातल्या म्होरक्यांना पाकिस्तानने वारंवार मागणी करूनही भारताच्या ताब्यात दिलेले नाही. कधी अमेरिकेने तर कधी चीनने काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करायची मागणी पाकिस्तानने केली तेव्हा, भारताने तडकाफडकी ती फेटाळून लावली. 1971 मध्ये उभय राष्ट्रात झालेल्या सिमला करारातही, दोन्ही राष्ट्रांनी आपल्या प्रश्नावर थेट चर्चाच केली पाहिजे, मध्यस्थ चालणार नाही, अशी मान्यताही दिली आहे. परराष्ट्र खात्याच्या धोरणाचा कसलाही अभ्यास न करता थरूर बेताल बडबड करतात, त्यांचा हा अतिशहाणपणा देशाला खड्ड्यात घालील, हे लक्षात घेता त्यांना आता इंग्रजीचे साहित्य लेखन करायसाठी डॉ. सिंग यांनी मंत्री पदातून मुक्त करावे, हेच राष्ट्राच्या हिताचे आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: