Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

सापळ्यात अडकलेला कोल्हा
ऐक्य समूह
Tuesday, March 02, 2010 AT 10:29 PM (IST)
Tags: bodhkatha

एका शेतकऱ्याकडे खूप कोंबड्या होत्या. पण एक कोल्हा नेहमी त्याच्या कोंबड्या पळवी. म्हणून शेतकऱ्याने त्याला पकडण्यासाठी सापळा लावून ठेवला. येण्याजाण्याच्या वाटेवर सापळा असल्याने एका रात्री कोल्हा नेमका सापळ्यात अडकला. त्याने सुटण्यासाठी खूप प्रयत्न केले पण व्यर्थ! पहाटे पहाटे त्याची धडपड ऐकून एक कोंबडा तेथे आला. कोंबड्यास पाहताच कोल्हा म्हणाला, "बघ, तुझ्यामुळे मी या सापळ्यात अडकलो. पहाटे तुझा आवाज ऐकून तुला भेटायला म्हणून आलो नि या संकटात सापडलो. निदान या सापळ्याचा तो खटका तरी दाब, म्हणजे माझा अडकलेला पाय सुटेल!' असं म्हणून कोंबडा खटका दाबतोय की काय ते मोठ्या आशेने कोल्हा पाहू लागला. कोंबड्याने कोल्ह्याच्या बोलण्याकडे सरळ दुर्लक्ष केले आणि तो तडक शेतकऱ्याकडे गेला. कोल्हा सापळ्यात अडकल्याचे ऐकून शेतकरी एक मोठी काठी घेऊन निघाला व दोन-चार सणसणीत रट्ट्यातच त्याने कोल्ह्यास ठार मारले. तात्पर्य : एखाद्यास मदत करताना आपला शत्रू कोण नि मित्र कोण याचा विसर  पडू देऊ नये.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: