नवऱ्याचं प्रेम
वासुदेव कुलकर्णी
Tuesday, March 02, 2010 AT 10:24 PM (IST)
काय ग!, तुझा नवरा तुला खूप बडवतो तरी तू ते सहन कशी करतेस? असल्या बडवणाऱ्या नवऱ्याला धडा शिकवायला हवा. तू अजिबात सहन करू नकोस.
अगं, माझ्यावर त्यांचं खूप खूप प्रेम आहे. ते काही मला रोज मारत नाहीत. कधी तरीच मारतात. पण तेही प्रेमानंच बरं! त्यांचा मार खाल्ल्यावर मलाही खूप खूप बरं वाटतं. इतकी वर्ष लग्नाला झाली तरी माझ्यावरचं त्यांचं प्रेम तीळभरही कमी झालेलं नाही. माझा नवरा दुसऱ्या कुठल्या बयेच्या नादाला लागलेला नाही, हे ही मला समजतं आणि नवऱ्याकडनं बायकोनं मार खाल्लाच पाहिजे. बायकोच्या मुठीतला नवरा, बायलोबा मला नाही आवडत!
मैत्रिणीनं आपुलकीनं दिलेल्या सल्ल्याला ही अशी उत्तरं काही वेळा मिळतातच.
अगदी सुशिक्षित, उच्च पदवीधर आणि उच्च पदावर नोकरी करणाऱ्या काही विवाहित युवतींनाही आपल्याला नवरा मारतो, म्हणजे त्याचं आपल्यावर प्रेमच आहे, असं वाटतं.
स्वातंत्र्यानंतर मुलींना शिकायची संधी मिळाली. गेल्या काही वर्षात तर अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासह अन्य क्षेत्रातही मुली शिकायला लागल्या. यशाची शिखरं त्यांनी काबीज केली. शिकता शिकता काही युवक युवतींचे प्रेम विवाह झाले. पण, अगदी सुशिक्षित नवराही काही वेळा आपल्या शिकलेल्या बायकोला चोपत असल्याच्या घटना पहायला मिळतात.
अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नवविवाहित जोडप्यांची अशी भांडणं अधून मधून होतात, तेव्हा शेजारची वयोवृध्द माणसं आणि बायका दोघांना समजावायला जातात. काहीवेळा त्यांनाच तोंडघशी पडायची वेळ येते. मार खाणारी युवती सांगते, आमच्या दोघांच्या भांडणात तुम्ही पडू नका. आमचं आम्ही बघून घेवू. माझ्या नवऱ्यानंच तर मला मारलं ना!
नवरा बायकोचा भांडणाचा तमाशा बघून आनंद लुटणाऱ्यांनाही निराश होवून परतावे लागते. दारुड्या नवऱ्याकडून मार खाणाऱ्या बायका अशिक्षित कुटुंबात आहेतच, पण भारतीय समाजातल्या वीस टक्के विवाहित महिलांना बडवणारे नवरे आवडतात. बायकोला बडवणे हा नवऱ्याचा जन्मसिध्द अधिकार आहे, असेही या मार खाणाऱ्या विवाहित महिलांना वाटते.
स्त्री पुरुष समानता, स्त्री मुक्ती चळवळ, समान अधिकार, महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून कायदेशीर संरक्षण, अशा सुधारलेल्या स्थितीतही भारतीय महिलांची सामाजिक-पारंपरिक मानसिकता मात्र जुन्या काळातलीच राहिली आहे. "युथ इन इंडिया' या संस्थेने देशातल्या सहा राज्यातल्या विवाहित जोडप्यांच्या सर्वेक्षणानंतर दिलेल्या अहवाला-तले असे हे धक्कादायक
निष्कर्ष आहेत.
लग्न झाल्यावर पतीच्या आज्ञेतच राहावे, त्याला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेवू नये, त्याला विचारल्याशिवाय बाहेर जावू नये, पती हा परमेश्वर आहे, ही भारतीय विवाह संस्थेची प्राचीन परंपरा. नव्या जगात स्त्री पुरुष समानतेचे वारे वाहायला लागले. पुरुषाइतकेच विवाहित महिलांनाही हक्क असल्याचे जागरुक महिला संघटना सांगायला लागल्या. अत्याचार पीडित महिलांना न्याय मिळवून द्यायसाठी या संघटना चळवळी करायला लागल्या. पती हा परमेश्वर नव्हे, तो ही माणूसच आहे. संसार दोघांचा असल्यामुळे प्रत्येक गोष्ट नवऱ्याला विचारायची काहीही गरज नाही. स्त्रीलाही स्वतंत्र विचार आहेत. तिलाही मन आहे, असे जनजागरण स्त्री मुक्तीवादी चळवळीने केले. पण त्याचा फारसा परिणाम परंपरावादी भारतीय महिलांवर झालेला दिसत नसल्याचे या अहवालातल्या निष्कर्षाने स्पष्ट झाले. आपल्या चुकीबद्दल नवऱ्याने मारणे हे योग्य असल्याचे 58 टक्के विवाहित महिलांना वाटते. बायकोला मारणे हा पतीचा जन्मसिध्द अधिकार असल्याचेही, या पती आज्ञेत राहणाऱ्या महिलांना मान्य आहे. त्यांची मार खाण्याबद्दल काही तक्रार नाही.
32 टक्के महिला नवऱ्याला न विचारता बाहेर गेल्याबद्दल, पतीवर घेतलेल्या संशयामुळे 38 टक्के महिला नवऱ्याचा मार खातात. दोघांचे अजिबातच पटत नसल्यामुळे वारंवार दोघात भांडणे होतात आणि पत्नीला मार खावा लागतो, अशा जोडप्यांची संख्या 34 टक्के आहे. उच्चशिक्षित विवाहित महिलाही हरतालिका, वटसावित्री आणि अन्य व्रतवैकल्ये परंपरेनुसार करतात. उत्तर भारतात नवऱ्यासाठीच "करवा चौथ' व्रत विवाहित महिला करतात. भारतीय स्त्रीच्या अशा पारंपरिक मानसिकतेमुळेच, भारतीय
समाजात अद्यापही पुरुषी अहंकार टिकून
राहिला आणि मारकुट्या नवऱ्याचे असे
लाड करणाऱ्या विवाहित महिलांच्यामुळे,
ही असली राक्षसी प्रेमाची परंपरा अद्यापही टिकून आहे.