Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

व्यासंगी इतिहासकार
वासुदेव कुलकर्णी
Monday, March 01, 2010 AT 01:27 AM (IST)
Tags: Lolak


अलिकडच्या काही वर्षात  "समर्पण' हा शब्द दुर्मीळ झालेला असतानाच, आपले सारे जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचार आणि कार्यासाठी समर्पित करणारे श्रीपती शास्त्री हे नेतृत्व होते. वयाच्या बाराव्या वर्षी आपल्या बंधूंचे बोट धरून तेे संघाच्या शाखेवर गेले आणि त्यांनी पुढची 62 वर्षे संघाद्वारे समाजसेवा केली. श्रीपती शास्त्री मुळचे कर्नाटकातल्या हरिद्वारचे. हरिहरचे शिक्षणासाठी ते म्हैसूरला आले. त्यांना इंग्रजी साहित्याची खूप आवड होती. पण, विद्यार्थी दशेत इतिहासाच्या अभ्यासाने त्यांना भारतीय इतिहासाची गोडी लागली. बी. ए. आणि एम. ए. या दोन्ही पदव्या त्यांनी विशेष गुणवत्तेसह मिळवल्या. याच विषयात संशोधन करायसाठी ते पुण्याला आले. पुणे विद्यापीठातून  "जगातल्या घटनांचा इतिहास' या विषयावर संशोधन करून त्यांनी पीएच. डी. पदवी मिळवली. त्यानंतर वाडिया महाविद्यालयात 18 वर्षे ते इतिहासाचे प्राध्यापक होते. पुणे विद्यापीठाचे 16 वर्षे इतिहास विभाग प्रमुख होते. याच पदावरून निवृत्त झाल्यावर शास्त्री यांनी देशभर संघाच्या प्रचारासाठी अखंड
भ्रमंती केली.
हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाचा त्यांचा अभ्यास प्रचंड होता. त्यासाठी त्यांनी हजारो ग्रंथांचा धांडोळा घेतला. ऐतिहासिक शहरांनाही भेटी दिल्या. तीन हजार वर्षाचा हिंदुस्थानचा इतिहास त्यांना मुखोद्‌गत होता. या विषयावर व्याख्याने देताना ते इतिहासाचे हजारो संदर्भ श्रोत्यांना देत असत. चिकित्सक ऐतिहासिक अभ्यासाची नवी दिशा त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिली. इंग्रजी इतिहासकारांनी एकांगीपणे लिहून ठेवलेल्या ऐतिहासिक ग्रंथावर विसंबून न राहता, त्या काळातील पुराव्यांची छाननी करूनच ऐतिहासिक घटनांचे अन्वेषण करायला हवे, असा त्यांचा आग्रह असे. पुणे विद्यापीठात शिकवत असताना शास्त्रीजींनी आपल्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक संशोधनासाठी सहाय्यही केले.
 जगातल्या धार्मिक संघर्षामागची पार्श्वभूमी आणि कारणमिमांसा शोधल्याशिवाय त्या घटनामागचे सत्य शोधता येत नाही आणि येणारही नाही, असे ते पुराव्यानिशी श्रोत्यांना पटवून देत. हिंदुस्थानच्या विजीगिषु इतिहासाचा त्यांना सार्थ अभिमान होता. ऐतिहासिक काळात भारतीय संस्कृती अफगाणिस्तानपासून ते थायलंड, जपान, इंडोनेशियापर्यंत कशी पोहोचली होती, याचाही धांडोळा त्यांनी
घेतला होता.
पुण्यात कायमच्या वास्तव्यासाठी आल्यावर कन्नड मातृभाषा असलेल्या शास्त्रीजींनी मराठी भाषा शिकून घेतली. या भाषेवर त्यांनी विलक्षण प्रभुत्वही मिळवले. मराठ्यांच्या इतिहासाचा व्यासंगी अभ्यासही केला. छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य  निर्मितीमागच्या प्रेरणा आणि स्वराज्याची निर्मिती, या विषयावर ते तासन्‌तास सहज बोलत असत. इतिहासाच्या अभ्यासकाने विविध भाषा शिकायलाच हव्यात, असा त्यांचा आग्रह असे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे 16 वर्षे सहकार्यवाह, पश्चिम क्षेत्राचे सहकार्यवाह, अखिल भारतीय संपर्क प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. इतिहासाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी ते पाश्चात्त्य देशातही गेले होते. भारतातल्या अनेक ऐतिहासिक परिषदात त्यांनी केलेली मूलगामी भाषणे गाजली होती. पुण्याच्या दिना लिब्रीटी कॉलेजच्या ज्ञानदीप विद्यापीठात ख्रिश्चन धर्म विषयक संघाची भूमिका, हे त्यांनी केलेले भाषणही गाजले होते. याच विषयावरचे हिदुंस्थानातील ख्रिस्ती संप्रदाय : संघाची भूमिका, हे त्यांचे पुस्तकही प्रसिध्द झाले.
पुण्यातल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थाच्या स्थापनेतही शास्त्री यांचा वाटा मोलाचा होता. 1857 चे स्वातंत्र्य समर आणि भारताची फाळणी या विषयांवर त्यांनी केलेले ऐतिहासिक संशोधन या काळाच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरले. देशाच्या विविध भागात त्यांनी भारताच्या इतिहासावर अक्षरश: हजारो व्याख्याने दिली. इतिहासातल्या अनेक गूढ घटनांचा उलगडा केला. 1857 चे स्वातंत्र्य समर हे अपयशी ठरले तरी, याच युध्दाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा दिली, असे ते पुराव्यानिशी सांगत असत. इंग्रजी, मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड अशा अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. शास्त्रीजींनी इतिहासावर खूप व्याख्याने दिली, पण ऐतिहासिक ग्रंथांचे
लेखन मात्र फारसे केले नाही. याची हळहळ त्यांच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना नक्कीच वाटत राहील!
- वासुदेव कुलकर्णी
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: