|
|
|
लोकनेत्यांचा जन्मशताब्दी महोत्सव राज्य शासनाने साजरा करावा : ना. देशमुख
ऐक्य समूह
Thursday, February 11, 2010 AT 01:46 AM (IST)
पाटण, दि. 10 : लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान आहे.लोकनेते मोठ्या मनाचा माणूस म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित होते. त्यांचा दरारा सर्वांना माहिती होता. त्यामुळेलोकनेत्यांचा जन्मशताब्दी महोत्सव राज्याच्या सुवर्ण महोत्सवाबरोबर महाराष्ट्र शासनाने साजरा करावा असे आपण शासनाला सुचवू, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री ना. विलासराव देशमुख यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या प्रांगणात आयोजित केलेल्या लोकनेते जन्मशताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलताना केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 10 फेब्रुवारी ते 10 मार्च अखेर आयोजित केलेल्या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर झाले. प्रारंभी ना. देशमुख यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर लोकनेत्यांची दुर्मीळ छायाचित्रे व हस्तलिखितांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर दीपप्रज्वलन करून उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संदीप जंगम यांनी चित्रित केलेली दौलत महाराष्ट्राची या चित्रफितीचे प्रकाशन व लोकनेत्यांच्यावरील पोवाड्याच्या सिडीचे प्रकाशन ना. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ही चित्रफीत लोकनेत्यांच्या कन्या सौ. मंगलताई थोरात यांना तर पोवाड्याच्या कॅसेट श्रीमती विजयादेवी देसाई यांना वितरित करण्यात आल्या. ना. विलासराव देशमुख यांचे शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, श्रीफळ व चांदीचा नारळ देवून स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर लोकनेत्यांच्या कन्या सौ. मंगलताई थोरात व श्रीमती विजयादेवी देसाई यांचेही स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना माजी आ. शंभूराज देसाई म्हणाले, लोकनेत्यांच्या जन्मगावापासून न भूतो न भविष्यती अशा दिंडी सोहळ्याने जन्मशताब्दी महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. लोकनेत्यांच्या कार्याची आजच्या तरूण पिढीला माहिती व्हावी म्हणून साहेबांचे कर्तृत्व दाखविणारी दौलत महाराष्ट्राची ही चित्रफित प्रकाशित करण्यात येत आहे. त्याचबरोबर लोकनेत्यांच्याबरोबर काम केलेले व त्यांच्याबरोबर राजकीय जीवन व्यतित केलेले मान्यवर यांना पाचारण करून त्यांचे विचार मी अनुभवलेले साहेब या व्याख्यानमालेद्वारा महिनाभराच्या कालावधीत ऐकविण्यात येणार आहेत. लोकनेत्यांनी त्यांच्या काळात घेतलेले महत्वपूर्ण निर्णयाची माहिती व त्यांची दुर्मीळ छायाचित्रे यांचे प्रदर्शनही तालुक्यातील जनतेला पाहण्यासाठी खुले ठेवले आहे. याच दरम्यान 127 स्टॉल्स उभारून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेत्यांच्या महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याची दखल घेवून केंद्र शासनाने त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पोष्टाचे तिकीट प्रकाशित करावे, अशी मागणीही शंभूराज देसाई यांनी केली. दिंडी सोहळ्यात ज्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली ती प्रतिमा मेघडंबरीमध्ये ठेवण्यात येणार असून त्या मेघडंबरीचे उद्घाटन पॉलिटेक्निक व महाविद्यालयासाठी बांधलेल्या इमारतींचे उद्घाटन हे देखील याच कालावधीत घेत असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. लोकनेत्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत जिल्हा लोकल बोर्डापासून सुरूवात केली. सलग सातवेळा त्यांनी या तालुक्याचे प्रतिनिधित्व करत एकवेळा बिनविरोध निवडून गेले. त्यांच्यासारखा गृहमंत्री महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही. शिक्षणमंत्री असताना त्यांनी 1200 रुपये आर्थिक उत्पन्न असणाऱ्या घटकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. ज्या निर्णयाची तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली. जातीच्या आधारावर नाही तर आर्थिक निकषावर गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण देण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रातील गरीब कुुटुंबातील मुलाला पोलीस अधिकारी होता यावे म्हणून त्यांनी कायद्यात बदल केला. त्यांनी घेतलेले निर्णय हे सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे आहेत. कायदे लोकांसाठी असतात, लोक कायद्यासाठी नसतात. हे ठणकावून सांगणारा पोलादी पुरूष म्हणून त्यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख होती. त्यांच्या कामातून प्रेरणा, मार्गदर्शन व प्रोत्साहान घ्यावे असा बलशाली नेता म्हणून ते सर्वपरिचित होते. आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीमधील ते मैलाचे दगड होते. म्हणूनच महाराष्ट्राला घडविणाऱ्या महापुरूषांची ओळख शासनाने सुवर्ण महोत्सवी वर्षात घेतली पाहिजे. प्रगतशील महाराष्ट्र घडविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात लोकनेत्यांचे स्थान अढळ आहे. 1960 साली जेव्हा भूकंप झाला तेव्हा शेकडो लोक मृत्युमुखी पडले. हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यावेळी लोकनेते या तालुक्यात तळ ठोकून बसले व त्यांच्या पुनर्वसनाच्या मदतीचे कार्य युध्दपातळीवर सुरू ठेवले. त्याकाळी त्यांनी केलेले कार्य येथील लोक कधीच विसरू शकणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राला पाटण तालुक्याने कोयनेची वीज दिली. केंद्राच्या ऊर्जा मंत्रालयाने व वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या अवजड यंत्रांची निर्मिती करणाऱ्या अवजड उद्योग मंत्रालयाने ज्या जिल्ह्यात वीजनिर्मिती प्रकल्प आहेत ते जिल्हे भारनियमन मुक्त करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून 2012 पर्यंत संपूर्ण जिल्हा भारनियमन मुक्त करण्याचा आपला प्रयत्न राहिले, असे स्पष्ट करून ना. देशमुख म्हणाले, लोकनेत्यांचे विचार व त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांचे नातू माजी आ. शंभूराज देसाई हे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आमची सदैव साथ राहील, असेही ते शेवटी म्हणाले. माजी आ. शंभूराज देसाई यांनी पोष्टाचे तिकीट प्रकाशित करण्याच्या मागणीचा आपण पाठपुरावा करु, अशी ग्वाही ना. देशमुख यांनी दिली. कारखान्याचे चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले. पंचायत समितीतील विरोधी गटनेते ऍड. डी. पी. जाधव यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी रविराज देसाई, देसाई कुुटुंबिय व स्वकिय, बशीर खोंदू, सुनील पुजारी, मिलिंद पाटील, सौ. सावित्रा लाहोटी, सौ. सुवर्णा जाधव, अशोकराव पाटील, जयवंतराव शेलार, बाळासाहेब जाधव यांच्यासह आजी-माजी संचालक, सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही आमच्या सोबत या माजी आ. शंभूराज देसाई यांच्याकडे कटाक्ष टाकत बायपास करून जाणारे यांच्यासारखे नेतेही आहेत. मुख्य रस्त्यात गर्दी असल्याचे बघून बायपास करून पुढे गेले. आता त्यांनी मुख्य रस्त्यावर आले पाहिजे. पाटण तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार असायलाच पाहिजे अशी बाब नाही. आमदार असा अथवा नसा तालुक्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाणे आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी जावू. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही आमच्या सोबत या. नव्या प्रवासात सहभागी होण्याचे निमंत्रण जन्मशताब्दी वर्षानिमित्त मी पाटण तालुक्यातील जनतेच्या साक्षीने शंभूराज देसाई यांना देतो, असे ना. विलासराव देशमुख यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सखोल ज्ञान व प्रभावी मांडणी यामुळे शंभूराज देसाई यांची छाप माजी आ. शंभूराज देसाई यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांवर सभागृहात अत्यंत प्रभावीपणे प्रश्न मांडले. त्यांच्या भाषणाने विधानसभेत जबरदस्त छाप पडली. त्याचबरोबर राज्याच्या पाणीप्रश्न, धरणाचे प्रश्न, विजेचा प्रश्न, उसाचे भाव, अतिरिक्त उसाचा प्रश्न, कापूस याबाबत देखील सखोल अभ्यास करून त्यातील अचूक बाबींची अत्यंत प्रभावीपणे मांडणी त्यांनी विधानसभेत करून आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. सखोल ज्ञान व मुद्देसूद मांडणी यामुळे त्यांनी सभागृहात आपला अल्पावधीतच दबदबा निर्माण केला होता. दिंडी सोहळ्याचे आयोजन दरम्यान, सकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शुभारंभ हजारो वारकरी, सजवलेले घोडे, बैलगाडी, माऊलींची पालखी, लोकनेत्यांच्या प्रतिमेचा चित्ररथ आणि सनई चौघड्यांच्या मंगल सुरात तब्बल नऊ किलोमीटरची पायी दिंडी सोहळ्याने करण्यात आला. पाटण तालुक्यात प्रथम सुमारे दहा हजार वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भक्तिमय वातावरणामुळे अवघी दुमदुमली नगरी असे वातावरण निर्माण झाले होते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करून शताब्दी सोहळ्याचे अध्यक्ष शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत लोकनेत्यांच्या प्रतिमेच्या चित्ररथ यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी हजारो वारकरी, ग्रामस्थ, महिला तसेच माऊलींची पालखी अशा भक्तिमय वातावरणात सुरूवात झाली. दरम्यान, मल्हारपेठ येथे 9.45 वाजता या भव्य दिंडीचे आगमन झाल्यानंतर त्याठिकाणी उभ्या रिंगणाचा कार्यक्रम झाला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारामच्या गजरात टाळमृदगांच्या तालावर या दिंडी सोहळ्याने अर्धा तास भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर 11 वाजता नवारस्ता येथे दिंडीचे आगमन झाल्यानंतर पुन्हा रिंगणाचा कार्यक्रम झाला. हजारो वारकऱ्यांना पंढरीच जणू दुमदुमल्याचा भास झाला. या दिंडी सोहळ्यातील तब्बल 9 तासांच्या पायी प्रवासात वारकऱ्यांसाठी विहे, मल्हारपेठ, नवारस्ता, गव्हाणवाडी या ठिकाणी चहा, नाष्टा, सरबत याची सोय करण्यात आली होती. सर्व वारकरी आपल्या पारंपरिक वेशात दिसत होते. महिलांच्या डोक्यावर तुळशी, वारकऱ्यांच्या सोहळ्यात सर्वात पुढे सजवलेले घोडे त्यामागे वारकरी स्त्रिया, पुरूष, माऊलींची पालखी, लोकनेत्यांचा चित्ररथ असा क्रम लावण्यात आला होता. वारकऱ्यांच्या 6 तासांच्या व 9 किलोमीटर अंतराच्या प्रवासात जन्मशताब्दी सोहळ्याचे अध्यक्ष शंभूराज देसाई यांनी देखील पायी प्रवास करून दिंडीत उपस्थिती दाखविली. एकंदरीत प्रथमच तालुक्यात इतक्या भव्य स्वरूपात वारकऱ्यांची तब्बल नऊ तासांची निघालेल्या पायी दिंडीमुळे तालुक्यातील वातावरण भक्तीरसात न्हाऊन गेल्याने भक्तिमय वातावरण तयार झाले होते. या दिंडीत पाटण, कराड तालुक्यातील हजारो वारकरी सांप्रदायातील भक्तगण सहभागी झाले होते. दरम्यान या दिंडी सोहळ्याची सांगता दुपारी 1.15 वाजता अध्यक्ष शंभूराज देसाई यांच्या व हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर करण्यात आली.
फोटो गॅलरी
|