Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तिवरे धरणग्रस्तांचे माळीणप्रमाणे पुनर्वसन करा
ऐक्य समूह
Thursday, July 11, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: mn2
खा. शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. यामध्ये लोकांची घरे, पिकं आणि शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. राज्य सरकारने पीडितांना दिलेली 4 लाखांची मदत तुटपुंजी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील माळीण गावाप्रमाणे इथल्या लोकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तिवरे धरणफुटी प्रकरणाचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पवार यांनी आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहून वस्तुस्थिती विशद केली.
शरद पवार यांनी 8 जुलै रोजी तिवरे धरणग्रस्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दुर्घटनेत झालेल्या जीवित आणि वित्तहानीबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर पीडितांशी संवादही साधला. यावेळी पीडितांनी त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बाधित कुटुंबांचे योग्य पुनर्वसन करून त्यांना सार्वजनिक मूलभूत सुविधा वेगाने पुनर्स्थापित करून द्याव्यात, अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.
 मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की या दुर्घटनेमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला असून 45 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पिकं, जनावरांचे गोठे यांसह शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. त्याचबरोबर रस्ते, पूल, पाणी पुरवठा योजना आणि विद्युत व्यवस्था या प्रमुख गरजांसह इतरही सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. तिवरे, फणसवाडी, कुंभारवाडी, भेंदवाडी गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने सानुग्रह अनुदान दिले आहे. मात्र, यामुळे नुकसान भरून निघण्यासारखे नाही. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीतील पीडितांना मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतूनही अनुदान मिळावे. पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय करावी. कमावत्या पीडित वारसांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेच्या वेळी मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व इतर मार्गाने मदत देण्यात आली होती तसेच राज्य सरकारच्या योजनाही यावेळी प्राधान्याने राबवण्यात आल्या होत्या. याच धर्तीवर तिवरे धरणग्रस्तांचेही पुनर्वसन व्हावे, अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: