Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुण्यात पीक विमा योजनेच्या आढावा बैठकीत ‘स्वाभिमानी’चा राडा
ऐक्य समूह
Thursday, July 11, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: mn3
5पुणे, दि. 10 (प्रतिनिधी) : पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या कार्यशाळेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी राडा घातला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बोलत असताना आक्रमक होत या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने कार्यशाळेत गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुण्यातील वैकुंठभाई मेहता संस्थेत पीक विमा योजनेबाबत आढावा बैठक सुरू होती. बैठकीला कृषिमंत्री अनिल बोंडे, सदाभाऊ खोत व मान्यवर उपस्थित होते. बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली होती. सदाभाऊ खोत यांचे भाषण सुरू झाले आणि हे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे, त्याचे काय, असा सवाल त्यांनी केला. मराठवाड्यातील भागात 19 कोटी शेतकर्‍यांनी केंद्र आणि राज्य असे मिळून पीक विम्यासाठी एकूण 177 कोटी रुपये भरले. परंतु, त्याचा परतावा म्हणून त्यांना फक्त 30 कोटी रुपये मिळाले. बाकीचे 143 कोटी कुठे गेले? हे पैसे कंपन्यांच्या घशात गेले आहेत, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. अखेर पोलीस या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले.
घोषणा देण्यापेक्षा
मैदानात या : सदाभाऊंचे आव्हान
स्वाभिमानीच्या या राड्यामुळे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेदेखील चांगलेच आक्रमक झाले. मी पण चळवळीतून आलो आहे. घोषणा देणार्‍यांना शेतकर्‍यांशी काही देणे- घेणे नाही. प्रसिद्धीची हवा त्यांच्या डोक्यात शिरली आहे. घोषणा काय देता.  
तुमच्यात हिंमत असेल तर मैदानात या, तारीख सांगा, मैदान सांगा. मी तिथे एकटा यायला तयार आहे, असा इशारा त्यांनी अप्रत्यक्ष स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांना दिला. तुमची जागा
हातकणंगले मतदारसंघात दाखवून दिली आहे. तुमची ही मस्ती सदाभाऊ खोत आणि कार्यकर्ते चालू देणार नाहीत. तुम्ही शेतक़र्‍यांच्या विरोधात आहा, हे जनतेने दाखवून दिले आहे. घोषणा देऊन आम्हाला कोणी रोखणार असेल, तर आम्हाला लढायचे माहिती आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
खिळ घालण्याचा संघटनांचा डाव;
अनिल बोंडेंचे मीडियावरही टीकास्त्र
शेतकर्‍यांच्या बाजूने काही करताना त्यात खीळ घालण्याचे काम काही संघटना करत आहेत. कार्यशाळेत पटकन दोन मुले उठली आणि मीडियाकडे धावत गेली. कुठे घाण पडली असेल, तर माशा धावतात. पण तसे व्हायला नको, अशा शब्दात त्यांनी मीडियावर टीकास्त्र सोडले. मीडियाने शेतकर्‍यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्याचे काम करावे. आपल्याला मिठाईकडे जायचे आहे. मिठाईकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. ही मिठाई आपल्याला शेतकर्‍यांसाठी वाढायची आहे, असेही ते म्हणाले. मात्र, नंतर त्यांनी मीडियाविषयीच्या आपल्या वक्तव्याबद्दल
घूमजाव केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: