Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्नाटकच्या फुटीर आमदारांना मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच!
ऐक्य समूह
Thursday, July 11, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: mn1
आमदारांना भेटायला आलेल्या काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले, सोडले
5मुंबई, दि.10 (प्रतिनिधी) : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी आलेले काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा व नसीम खान यांना मुंबई पोलिसांनी आज ताब्यात घेतले व काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार बंडखोर आमदारांनी नोंदवल्यामुळे हॉटेलभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यांची अनुमती असल्याशिवाय कोणालाही भेटायला दिले जात नाहीय.
कर्नाटकातील कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस व जनता दल (से) आघाडीचे सरकार संकटात आहे. राजीनामे देऊन बंड पुकारणार्‍या बंडखोर आमदारांचा मुक्काम सध्या मुंबईच्या पवई भागातील ‘रेनेसाँन्स’ या पंचतारांकित हॉटेलात आहे. या आमदारांची मनधरणी करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी व काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार आज मुंबईत येणार अशी चर्चा होती. डीके शिवकुमार यांनी ‘रेनेसाँन्स’ हॉटेलमध्ये आपल्यासाठी एक रूम आरक्षितही केली होती. परंतु याची कुणकुण लागताच बंडखोर आमदारांनी आपल्याला धोका असून या दोघांना आपल्याला भेटण्याची परवानगी देऊ नये, असा अर्ज मुंबई पोलीस आयुक्तांकडे केला होता. त्यामुळे हॉटेलभोवती मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने त्यात आणखी वाढ करून आजूबाजूच्या परिसरात संचारबंदी देखील लागू केली होती. तणाव वाढल्याने ‘रेनेसाँन्स’ च्या व्यवस्थापनाने शिवकुमार यांचे आरक्षण रद्द केले.
दुपारी डीके शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेस आमदार नसीम खान हॉटेलमध्ये जाण्यासाठी येत असताना पोलिसांनी त्यांना रोखले.   
यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेऊन जवळच्या कलिना गेस्ट हाऊसला नेले.
कर्नाटकात काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांचे राजीनामे
कर्नाटकत सुरू अलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता अधिकच भर पडत आहे. अगोदर काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी बंडखोरी करत मुंबई गाठलेली असताना आता काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. के. सुधाकर आणि एमटीबी नागराज या आमदारांनी काँग्रसकडे राजीनामे सोपवल्यानंतर हे दोघेही राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाले आहेत. आज सकाळी मुंबईतील काँग्रेस आमदारांची मनधरणी करण्यासाठी आलेल्या डीके शिवकुमार यांच्यासह मिलिंद देवरा व अन्य काँग्रेस नेत्यांना मुंबई पोलिसांनी आमदारांची भेट घेऊ न देता ताब्यात घेतले आहे. याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजपसह महाराष्ट्र सरकारवर टीका करत म्हटले, की मुंबईत कर्नाटक सरकारचे मंत्री व आमदारांबरोबर पोलिसांनी केलेली धरपकड चुकीची आहे. महाराष्ट्र सरकारचे हे पाऊल या शंकेला अधिक वाव देते, की भाजप घोडेबाजारास प्रोत्साहन देत आहे. हा देशाच्या लोकाशाही व्यवस्थेवर काळा डाग आहे. या अगोदर विधानसभा सभापती केआर रमेश कुमार यांनी म्हटले आहे, की मी कोणाचाही राजीनामा स्वीकरलेला नाही. मी अचानक असे काही करू शकत नाही. मी त्यांना 17 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. मी नियमानुसार कार्यवाही करत निर्णय घेईल. यामुळे कर्नाटकच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा सभापतींविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिवकुमार यांना पोलिसांनी पुन्हा बेंगळुरूत धाडले. पोलिसांनी त्यांना विमानतळावर
नेऊन सोडले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: