Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बालाकोटच्या दणक्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानात हलवला ‘जैश’चा तळ
ऐक्य समूह
Wednesday, July 10, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : भारतीय वायुसेनेने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केल्यानंतर जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गटांचे तळ अफगाणिस्तानात हलवण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीमुळे काबूल आणि कंदहारमधील भारतीय दूतावासाच्या सर्व कार्यालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
26 फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेच्या मिराज फायटर विमानांनी बालाकोटमधील जैशच्या तळावर बॉम्बफेक करुन पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले होते. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदने अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्कबरोबर हातमिळवणी केली आहे. त्यामुळेच मोदी सरकारने पाकिस्तानने हाफीज सईद आणि काही दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईला महत्त्व दिले नाही. भारताच्या मते पाकची ही कारवाई डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे.
फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने काळ्या यादीत टाकू नये यासाठी पाकिस्तानने या दहशतवादी गटांचे तळ अफगाणिस्तानात हलवले आहेत. सध्या पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये आहे. या दहशतवादी गटांमुळेच काबूल आणि कंदहारमधील भारतीय दूतावासाच्या कार्यालयांना धोका आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: