Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चिखलफेक नितेश राणेंच्या अंगलट;
ऐक्य समूह
Wednesday, July 10, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: mn3
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : राणेपुत्र आमदार नितेश राणेंच्या चिखलफेक चांगलीच अंगलट आली आहे. नितेश राणेंच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 9 जुलैपर्यंत नितेश यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र, राणेंच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी झाली. त्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
नितेश राणेंसह त्यांच्या 18 कार्यकर्त्यांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 23 जुलैपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. राणेंच्या वकिलांकडून नितेश राणेंना जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणेंनी चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. या प्रकारानंतर नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला. नितेश राणे आणि त्यांच्या 40 ते 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(-), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. नितेश राणेंनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. कणकवली शहरातील महामार्गाच्या दुरवस्थेबाबत गुरुवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथून आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, संजय कामतेकर, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, शहराध्यक्ष राकेश राणे, नगरसेवक अभिजित मुसळे, संदीप नलावडे, युवक स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, बबन हळदिवे, गटनेते संजय कामतेकर, विठ्ठल देसाई, सभापती सुजाता हळदिवे, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, पंचायत समिती  सदस्य मिलिंद मेस्त्री, निखील आचरेकर, सचिन पारधीये, किशोर राणे आदी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहणी सुरू केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: