Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार : मुख्यमंत्री
ऐक्य समूह
Wednesday, July 10, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबतचा आदेश तातडीने काढण्यात येईल. तसेच रिक्षाचालकांच्या विविध योजनांबाबत अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येईल व त्यात सरकारी अधिकार्‍यांसोबतच रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींचाही समावेश असेल. अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक शहरात तातडीने भरारीपथकांची नेमणूक करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती शशांक राव यांनी दिली. रिक्षाचालकांचा संप आधीच मागे घेण्यात आला असून मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेने आपण समाधानी असल्याचेही त्यांनी सांगितले.
विविध मागण्यांबाबत रिक्षा चालकांनी संपावर जाण्याची हाक दिली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा चालक संघटनेला चर्चेला बोलाविल्यानंतर संप मागे घेण्यात आला. मंगळवारी मंत्रालयात रिक्षाचालक-मालक संघटनांची संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र या संघटनेला चर्चेला बोलाविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शशांक राव यांनी पत्रकारांना माहिती दिली. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय येत्या दहा दिवसात निघणार असल्याचे सांगून ते म्हणाले, राज्यातील अवैध वाहतुकीचा फटका सगळ्यांनाच बसतो. एकट्या मुंबईत 30 हजार अवैध रिक्षा आहेत. रिक्षा, खासगी प्रवासी वाहने या अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात येणार आहे. तसेच हकिम समितीच्या सूत्रानुसार भाडेवाढीसाठी ग्राहक निर्देशांकात झालेल्या वाढीनुसार रिक्षा भाडेवाढीचे सूत्र ठरविण्यात यावे ही आमची मागणी आहे. ग्राहक निर्देशांकात जर वाढ झाली असेल तर भाडेवाढ करावी इतकी सरळ आमची मागणी आहे. तसेच रिक्षांचे मुक्त परवाने ताबडतोब बंद करण्यात यावे. कारण सरसकट मुक्त परवाने देण्यात आल्याने रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जेव्हा भविष्यात आवश्यकता वाढेल तेव्हा त्यांचे वाटप पुन्हा सुरू करावे, या आमच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखविली. ओला-उबेरवर बंधने आणण्याची मागणी आपण केली पण सध्या हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत निर्णय झाला नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: